भारताचं कौतुक करतो पण कंपनी घेवून भारतात यायचं म्हणलं की प्रोब्लेम येतोय..

जगाची एक रीत आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार घालनं. अशीच प्रचिती साध्य इलॉन मस्कला येत असणाराय. आधीच तो आजचा जगातला सर्वात श्रीमंत माणूस. त्यात त्यानं ट्विटर विकत घेतलं आणि आता भाऊंचं एक ट्विट आणि जगात त्याचीच हवा.

आता हे प्रकरण भारतावर आलंय. काल त्यानं ताज महालवर ट्विट केलं.

“हे आश्चर्यकारक आहे. मी 2007 मध्ये भेट दिली होती आणि ताजमहाल देखील पाहिला होता, जो खरोखरच जगातील एक आश्चर्य आहे”

असं ट्विट मस्कने केलं. लाल किल्यावरील सुंदर कलाकृतीचा फोटो एका पेजवर टाकण्यात आला होता. त्या पेजला रिप्लाय देताना इलॉन मस्कने हे ट्विट केलं होतं. 

झालं! मग लगेच आपल्या लोकांच्या त्या ट्विटवर उड्या पडल्या. असं ही एकदा गोरा आपल्याबद्दल काही चांगलं बोलला की आपल्याला भरून येतं. त्यात आता जगातला सगळ्यात श्रीमंत गोरा आपल्या ताज महालला अमेझिंग म्हणतो म्हटल्यावर तर विषयच नव्हता. 

लागलीच त्याला भारत भेटीवर पुन्हा बोलवायची आमंत्रणं त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये धाडली जाऊ लागली. यामध्ये सगळ्यात जास्त विनवणी केली जात होती ती म्हणजे त्यानं त्याच्या टेस्ला कंपनीच्या गाड्या भारतात लाँच कराव्यात याच्या. यात आपली सामान्य लोकंच होती असं नाही. 

पेटीएमचा मालक असेलेले विजय शेखर सारखी मंडळी पण त्याच्याकडे टेस्ला भारतात आणण्याची मागणी करत होती.

 इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टेस्लाच्या गाड्यांची जबरदस्त क्रेझ आहे. भारतातही या गाड्यांबद्दल उत्सुकता आहे. 

बरं नुसती उत्सुकताच आहे असं नाही. जरी बिझनेससाठी नंबर्समध्ये जरी विचार केला तरी आज जगातल्या सगळ्यात आकर्षक बाजारपेठ भारताची आहे. जागतिक ईव्ही बाजारपेठेत भारत हा स्लीपिंग जायंट मानला जातो. 

भारताचं मार्केट जगातील पाचव्या क्रमांकाचे ऑटो मार्केट आहे. 

त्याचबरोबर देशात वाढतं उत्त्पन्न असलेला मध्यमवर्ग आहे. भारत सरकार मोठ्या प्रमाणात कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर देशात स्वस्त मजूर आणि कच्च्या मालाची उपलब्धता आहे. एवढं सगळं असताना देखील मस्क मात्र काय भारताच्या इव्ही सेक्टरमध्ये इंटर करत नाही. 

याआधी त्यानं एकदोनदा संकेत दिलेत जसं की  त्यानं भारतीय लोकांना कंपनीत घ्यायला सुरवात केली आहे.

 टेस्ला कंपनीची बेंगळुरूमध्ये नोंदणी देखील झाली आहे. 

त्याचबरोबर टेस्ला कारची ७ मॉडेल्स भारतात चालवण्या योग्य असल्याचंही सरकारच्या अधिकाऱ्यांनी  म्हटलंय. मात्र तरीही टेस्लाच्या गाड्यांचं भारतात ना उत्पन्न होतोय ना त्या बाहेरून आयात करून लाँच केल्या जातायेत. 

आता याचं खरं कारण स्वतः इलॉनभाऊच देऊ शकतोय. त्याला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याचं पाहिला उत्तर होतं. 

“अजूनही सरकारसोबत अनेक आव्हानांवर काम करत आहे.”

 

 तसं बघायला गेलं तर इलॉन मस्कच्या या बोलण्यात थोडं सत्य देखील आहे. भारतात बिझनेस चालू करण्यात अजूनही तशा अडचणी आहेतच. 

भारतात कार फॅक्टरी उभा कारण सोपी गोष्ट नाहीये.  तुम्हाला पहिलं तर सरकारी बाबूंच्या लाल फितीतून मार्ग काढावा लागतो. त्यानंतर जमीन संपादन करावी लागेल, मग कठोर लेबर लॉचं पालन करावे लागेल आणि जर टाटा नॅनो सारखी एवढं सगळं करून कुठं माशी शिकली नाही तर तुमची कंपनी चालू होईल.

मात्र भारतात तरी नवीन बिझनेस चालू करण्यासाठी लागणारी झंझट गेल्या काही वर्षात कमी झाली आहे.

भारताच्या इझ ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकिंगमध्ये देखील सुधारणा होत आहे. त्यातच इलॉन मस्कने चॅलेंजेस आहेत असं म्हटल्यावर त्याला पायघड्या घालण्यासाठी अनेक राज्ये पुढे आली होती. या राज्यांनी त्यांना मस्कला जमीन, पायाभूत सुविधा, सुलभ मंजूरी प्रक्रिया आणि अजून बरीच आश्वासन दिली होती. मात्र तरीही तो आला नाही कारण याच्या मागचं खरं कारण वेगळंच होतं.

तर गेल्या जुलैमध्येच त्यानं भारतात नं येण्यामागचं मेन कारण सांगितलं होतं. त्यानं ट्विटमध्ये म्हटलं होतं

 ”“आम्हाला भारतात टेस्ला लाँच करायची आहे पण भारतातली आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा सर्वाधिक आहे. शिवाय भारतात इलेक्ट्रिक वाहनांना डिझेल किंवा पेट्रोलच्याच कॅटेगरीत ठेवले जाते जे भारताच्या क्लायमेट गोलशी सुसंगत वाटत नाही.”

म्हणजे मस्कचं खरं दुखणं आहे भारतात बाहेरून गाड्या आयात केल्यास लावण्यात येणारी इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच आयात कर. 

इलॉन भाऊ म्हणतात तसं भारतात खरंच इंपोर्ट ड्युटी जास्त आहे. जेव्हा तुम्ही $40,000 पेक्षा कमी किंमतीची कार आयात करता तेव्हा भारत सध्या 60% कर आकारतो आणि $40,000 पेक्षा जास्त किंमत असलेल्या कारसाठी 100% म्हणजे जवळपास गाडीची किंमत दुप्पट होते.

याउलट, यूएस आणि कॅनडा सारखे बहुतेक पाश्चिमात्य देशात हा टॅक्स १०% पेक्षा कमी आहे. चीन आणि ब्राझील सारख्या उदयोन्मुख बाजारपेठांनी अनुक्रमे 22% आणि 35% ड्युटी ठेवली आहे. त्यामुळं एवढा जास्त कर असल्याने टेस्ला अगदी बेसिक मॉडेल ज्याची किंमत ₹60 लाखांपेक्षा जास्त असेल ते इम्पोर्ट करून भारतात विकणं परवडणारं नाहीये.

मग भारत सरकारने एवढी जास्त इंपोर्ट ड्युटी का ठेवली आहे?

भारताचं सरळ म्हणणं आहे कि तुम्हला जर भारतात गाड्या विकायच्या आहेत तर त्या भारतात बनवा. बाहेरून गाड्या आणून त्या इथं विकण्याच्या विरोधात भारत सरकार पहिल्यापासूनच आहे. त्यात सरकारच्या ‘मेक इन इंडिया ‘ या उपक्रमा अंतर्गत भारतातच कंपन्या स्थापन करायला प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यामुळं मग सरकार असा भरमसाठ टॅक्स लावतं.

“चीनमध्ये बनवायचं आणि इथं विकायचं हे चांगलं नाही” 

असं म्हणत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीच सरकारचा स्टॅन्ड क्लियर केला आहे. 

मग मस्कला भारतात टेस्ला कंपनी का स्थापन करायची नाहीये?

तर टेस्लाला सुरवातीला गाड्या आयात करून त्या विकायच्या आहेत. त्यामुळं मग कंपनीला मार्केटचा अंदाज येइल. शिवाय भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचं मार्केट अजून फक्त १%च आहे आणि टेस्ला आली तर एका रात्रीत हे वाढेल असं ही नाहीये. तसेच बाकीच्या अमेरिकेन कर उत्पादकांचा भारतातील अनुभव तेवढा चांगला नाहीय. 

फोर्ड आणि जनरल मोटर्सने गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यानंतर भारतातून गाशा गुंडाळला होता.

 त्यात भारतातल्या लोकांच्या बजेटनुसार गाडी बाजारात आणणं हे या कंपन्यांपुढील मोठं आव्हान असतं.

त्यामुळं टेस्ला भारतात कंपनीची स्थापना करण्यास उत्सुक नाहीये. आणि भारत सरकार पण झुकायला तयार नाहीये. हर्ले डेव्हिड्सन बाइकसाठी स्वतः ट्रम्प यांनी लॉबिंग केलं होतं तरी काय फरक पडला नव्हता.

त्यामुळं सध्या तरी कोणी माघार घेईल अशी शक्यता नाहीये. त्यामुळं टेस्लाच्या भारतात येण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार एवढं नक्की. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.