मॉन्सून आला आला म्हणत्यात पण तो आलाय कुठे? कळना झालंय.

यंदा लवकर मान्सून दाखल होण्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिले. त्यानुसार २९ मे ला तो केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याची वाटचाल देशभर होत असते. महाराष्टात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येईल, असा अंदाजही देण्यात आला होता. मात्र त्यात अपडेट आली की काही करणास्तव त्याला विलंब होणार आहे.

गोव्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर महाराष्ट्रात प्रवेश करायला मान्सूनने १० दिवस घेतले आणि अखेर ११ जूनच्या दरम्यान मुंबई, डहाणू, पुण्यासहीत बहुतांश कोकण किनारपट्टी भागात मान्सून दाखल झाला, असं हवामानशास्त्र विभागानं सांगितलं. पुढच्या दोन दिवसात मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असंही सगळ्यात आलं.

मात्र या मान्सूनने परत दोन दिवसांपासून विश्रांती घेतली असल्याचं बोललं जातंय. म्हणजे मॉन्सून आलाय असं म्हणत आहेत, मात्र तो आलाय कुठे? कळना झालंय.

यासंदर्भात काही प्रश्न पडत आहेत. ज्यांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बोल भिडूने हवामानतज्ज्ञ उदय देवळाणकर आणि हवामानशास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. 

सुरुवात करूया मुख्य प्रश्नावरून…

मॉन्सून आलाय म्हणजे काय?

मॉन्सून आलाय म्हणजे काय तर समुद्रावर दाब जास्त आहे आणि भारतीय उपखंडावरील दाब कमी आहे. पण किती कमी आहे तर? समुद्रावरचा दाब वाढलेला असला तरी आपल्याला अशी स्थिती हवी आहे की, पोर्ट ब्लेअर किंवा मालदीव बेटांवर हवेचा दाब साधारण १००९, १०१० असा असेल. तर हिमालयाच्या पायथ्याशी ९९४ च्या आसपास दाब हवा आहे.

राज्यात तो १००२ असा हवा आहे. एकंदरीत हवेच्या दाबाचा एक उतार तयार होणं गरजेचं आहे. तो उतार तयार झाला की मॉन्सून सेट झाला, असं आपण म्हणतो. 

यासाठी काही कालावधी लागतो. मात्र मध्यंतरी उष्णतेमुळे काही बाष्प जे रेंगाळत असतात ते आपल्याकडे खेचलं जात आहेत. त्याला पूर्व मान्सून गतिविधी म्हणतात. ते सध्या राज्यात आहे आणि त्यामुळे जो पाऊस होतो तो मॉन्सूनचा नसतो. 

एखाद्या ठिकाणी जर विजांसहित, गारांसहित पाऊस पडताना दिसला, दिसत असेल तर तो मॉन्सून नाही हे लक्षात घ्यावं लागेल. कारण मॉन्सूनचं लक्षण आहे की तो सर्वदूर पडतो, झिमझिम सुरु असते. 

सध्या कोल्हापूर भागात जो पाऊस सध्या होतोय तो मॉन्सूनचा पाऊस नाही, मॉन्सून पूर्व सारखा आहे. तो पाऊस असा आहे की, एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो आणि त्याच्या दोनच किलोमीटरवर पाऊस पडत नाही. हा पाऊस मॉन्सून नव्हे. 

म्हणून मॉन्सून राज्यात आलाय पण तरी पूर्ण आलेला नाही, असं म्हणत आहेत.  

मॉन्सूनला विलंब होणं म्हणजे काय?

साधारणपणे दरवर्षी १ जूनला मॉन्सून केरळमध्ये आल्यानंतर ७ जूनपर्यंत मुंबईत दाखल होतो. आणि १५ जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. यात ४-५ दिवसांचा फरक पडत असतो. उशीर झाला तरी २० जूनपर्यंत राज्य व्यापणं अपेक्षित असतं.

मात्र सध्या तसं चित्र दिसत नाहीये. १६ जून उजाडला तरी केवळ निम्मा महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे.  पाऊस दोन दिवस झाले शांत झाला आहे, त्याचा प्रवास पुढे होत नाहीये. राज्यात उष्णतेची जाणीव होतीये. म्हणून मॉन्सूनला विलंब झाला, असं बोललं जातंय.

मॉन्सूनला विलंब होण्याचं कारण काय आहे?

मॉन्सून जेव्हा येतो तेव्हा पूर्णपणे कमी दाबाचं क्षेत्र तयार व्हायला लागतं. दक्षिण गोलार्धात जास्त दाबाचं क्षेत्र असतं, तिथून वारे पुढे ढगांना ढकलतात तेव्हा पाऊस पडतो. सध्या महाराष्ट्रात एप्रिल – मे मध्ये ‘वरून खाली वारे येत असतात’ तशी स्थिती निर्माण झालीये, जी मॉन्सूनसाठी अनुकूल नाहीये. याने मॉन्सून पुढे सरकायला अडथळा निर्माण होत आहे.

दुसरं म्हणजे… अरबी समुद्रावर एक ‘ऑफ शोर ट्रफ’ नावाचा कमी दाबाचा पट्टा तयार होत असतो, तो देखील तयार झाला नाहीये. म्हणून ढगांची निर्मिती अरबी समुद्रावरच होतीये, तीही त्याच्या पश्चिमेच्या भागात. म्हणजे कोकण किनारपट्टीवर ढगांची निर्मिती नाहीये. यामुळे पावसाची निर्मिती मंदावली आहे आणि पुढे सारकण्याचा वेग देखील मंदावला आहे.

विशाखापट्टणम आणि ओडिसाकडून जे ढग येतात त्यांनी प्रगती केली पाहिजे, जो प्रेशर ग्रेडिअंट (हवेच्या दाबातील अनुकूल बदल) कमी व्हायला हवा, तो झालेला नाहीये. मधल्या वादळांमुळे तो वाढलेला आहे, अजून कमी झालेला नाही, हवा कोंडलेली आहे.

तेव्हा वारे आणि हवेचा दाब अनुकूल नाही म्हणून मॉन्सूनला विलंब झाला असं म्हणत आहेत.

आता कधीपर्यंत पाऊस राज्य व्यापेल अशी अपेक्षा आहे?

ही परिस्थिती फार काळ राहणार नाही. आठवड्याभरात परिस्थिती बदलू शकते. एखादं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं तर मान्सून झपाट्याने एका दिवसात राज्य व्यापू शकतो. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र कसं तयार होतं, याकडे हवामान विभागाचं लक्ष आहे.

मॉन्सूनच्या विलंबाचे परिणाम काय होऊ शकतात?

हवामानशास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी सांगतात… 

१. पेरणी खोळंबणं

पहिल्या पावसाने जमिनीत ओलावा असतो. ढगांचं आच्छादन असल्याने तापमान देखील कमी होतं. अशी स्थिती पेरणीसाठी खूप उपयुक्त असते. यात पेरणी केली की दुसऱ्या पावसात बी उगवतं. आणि मग जुलैपासून पाऊस रेग्युलर झाला की पिकं वाढतात.

मात्र आता पाऊस नसल्याने, जमिनीत आद्रता नसल्याने पेरणीसाठी ‘प्रतिकूल’ परिस्थिती झाली आहे. ज्यांनी पेरणी केली असेल, त्यांचं नुकसान होऊन दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.

२. उष्णेतेची लाट येऊ शकते

पाऊस थांबला असल्याने आताच दोन दिवसांत अप्रिलसारखी अवस्था झाली आहे. जर हा विलंब राहिला तर उत्तरेत जशी उष्णतेची लाट असते, तशीच महाराष्ट्रात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्णतेची लाट आपण तेव्हा म्हणतो, जेव्हा सरासरी तापमानापेक्षा ५ डिग्रीने तापमान वर असेल.

३. या उष्णतेच्या लाटेने अनपेक्षित रोगांची लागण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. 

धरणाच्या साठ्यावर याचा परिणाम होणार नाही. कारण आताच्या पावसाने नाही तर जुलै – ऑगस्टच्या पावसाने धरण भरत असतात. जूनमध्ये १५% , जुलै-ऑगस्टमध्ये ७०% आणि परत सप्टेंबरमध्ये १५% असं चार महिन्यांच्या पावसाचं वितरण असतं. तेव्हा जुलै-ऑगस्टचा पाऊस धरणांवर परिणाम करतो.

अशात शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी?

हवामानतज्ज्ञ उदय देवळाणकर यांच्या सांगण्यानुसार… 

मका आणि सोयाबीन २५ ते ३० जूनच्या दरम्यान पेरावा. कारण उशिरा पाऊस पडला की, हार्वेस्टिंगच्या वेळी मजुरांची किंमत वाढते. आणि पाऊस पडत राहिला तर शेतकऱ्यांना भीती वाटते की, पीक खराब होऊन जाईल का? त्यावेळी वाढीव दराने त्यांना खर्च करून पीक काढावं लागतं.

मात्र उशिरा पेरणी केली तर पीक सुरक्षितरित्या निघतं, त्याला जास्त नुकसान होत नाही. शिवाय पूर्ण उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरात पडेल. 

कापसाबद्दल सांगायचं तर गेल्यावर्षी कापसाचे भाव १० हजार रुपये क्विंटलच्या वर होते. 

तर यावर्षी जे बियाणे विकल्या गेली आहेत त्यावरून महाराष्ट्रात कापूस ४० लाख हेक्टरचा टप्पा गाठेल, असा अंदाज आहे. औरंगाबाद, यवतमाळ सारख्या जिल्ह्यांत तर चार-सव्वा चार लाख हेक्टरच्या वर पेरणी जाईल, असं दिसतंय. या दोन्ही जिल्ह्यांत हवा तसा पाऊस झालेला नाहीये. मात्र १० हजारांच्या प्रेमामुळे मध्यंतरी जो पाऊस झाला त्यात शेतकऱ्यांनी प्रचंड पेरणी करून ठेवली आहे.

तेव्हा आता सल्ला आहे की, कापसाची उगवण झाल्यानंतर त्याला काही दिवस ताण द्या, पाणी देऊ नका. म्हणजे त्यांची मूळं पाण्याच्या शोधात खोलवर जातात. 

१५ जुलैपर्यंत लागवड करता येईल, असं कृषी विभागाने सांगितलं आहे. २ जुलै ते ७ जुलै दरम्यान पेरणीसाठी सुयोग्य कालावधी आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितलं आहे. तेव्हा जरा आरामात पेरणी करावी. 

मान्सून हा निश्चित चांगला आहे, तेव्हा ८० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करा, घाई करू नका. 

हवामानतज्ज्ञ, कृषी विभाग आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचा हा सल्ला आहे… 

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.