मागच्या तीन महिन्यात नेटफ्लिक्सचे २ लाख सबस्क्रायबर्स सोडून गेलेत, ही आहेत कारणे..

‘तुझ्याकडे कोणतं ओटीटी प्लॅटफॉर्म आहे?’ असं आपण आता म्हणायला लागलो बघा. साधारणतः कोरोनाच्या काळापासून. आधी तर मोबाईलवर सिरीज वगैरे ऑनलाईन बघायचं असेल तर एकच शब्द असायचा

‘नेटफ्लिक्स’

नेटफ्लिक्स हे एकमेव साधन होतं ज्यावर सिरीज आणि ओरिजिनल असा हटके कंटेन्ट लोक बघायचे. अर्थात आता असेही असतील की, जे म्हणतील ‘अहो, एकमेव नव्हता’. मात्र अशांनी आशय समजून घ्या बोलण्याचा. ‘सगळ्यात जास्त वापरला जाणारा आणि परिचयाचा असलेला’ असं इथे म्हणायचंय. मात्र नंतर कोरोना काळ आला. त्यात दरम्यानच्या काळात भारताने स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म्स बनवले.

तेव्हा आता नेटफ्लिक्सचं फॅड कमी होतंय की काय, अशा शंका उपस्थित होऊ लागल्या. मात्र किंग तर किंग असतो, हे नेहमीच नेटफ्लिक्स सिद्ध करत आलं. त्याचा ग्रोथ वाढताच राहिला. कुणीही या समोर, चालतंय.

मात्र ज्या नेटफ्लिक्सने गेल्या ३-४ वर्षांत खुपसारे कॉम्पिटिटर बाजारात येऊन सुद्धा आपला गड सोडला नाही, त्याचं मॉडेल गेल्या ३ महिन्यात भयानक गंडलंय. तेही इतकी की, जवळपास २५ टक्क्यांचा फटका कंपनीला बसलाय.

काय झालंय?

चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री असे  ग्राहकांना पुरवणाऱ्या नेटफ्लिक्स कंपनीचं गेल्या तीन महिन्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. रिपोर्टनुसार नेटफ्लिक्सचे लाखो सब्सक्रायबर्स घटले आहेत. गेल्या जवळपास १०० दिवसांमध्ये नेटफ्लिक्सचे दोन लाखापेक्षा जास्त सब्सक्रायबर्स कमी झाले आहे. 

ज्यामुळे त्याचे शेअर्स २५ टक्क्यांनी घसरले.

गेल्या १० वर्षांपासून जास्त काळानंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी ही सेवा चीनबाहेरील सर्वांसाठी उपलब्ध झाल्यापासून नेटफ्लिक्सचे ग्राहक इतके कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे,  असे कंपनीने म्हटले आहे.  इतकंच नाही तर पुढील तोटा अजून वाढण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीने १.६ अब्ज डॉलरचे निव्वळ उत्पन्न नोंदवले होते. वर्षभरापूर्वी याच काळात ती १.७ अब्ज डॉलर होती. कमाईचे आकडे जाहीर झाल्यानंतर नेटफ्लिक्सचे शेअर्स २५ टक्क्यांनी घसरून २६२ डॉलरवर आले आहेत.

यामागचं कारण काय?

सगळ्यात पहिलं कारण यामध्ये नेटफ्लिक्सने सांगितलं आहे ते म्हणजे ‘रशिया-युक्रेन युद्ध’. 

जसं या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु झालं तसं नेटफ्लिक्सने रशियातून माघार घेतली होती. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची घसरण झाली आहे. जवळपास यावर्षी ७,००,०००  ग्राहकांचं नुकसान झालं आहे, असं मंगळवार १९ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या कंपनीच्या तिमाही अहवालात म्हटलं आहे.

तर या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडामधील ६ लाख ग्राहक गमावले आहेत.

नेटफ्लिक्सने भागधारकांना इशारा दिला की, जुलैपर्यंतच्या तीन महिन्यांत आणखी २० लाख ग्राहक प्लॅटफॉर्म सोडण्याची शक्यता आहे.

नेटफ्लिक्सने शेअरहोल्डर्सना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “मंदावलेली आर्थिक वाढ, वाढती महागाई, रशियाने युक्रेनवर केलेलं आक्रमण यासारख्या घटना आणि कोव्हिडया घटकांचाही परिणाम झाला आहे.

दुसरं आहे कोरोना आणि त्यात झालेली पासवर्ड शेअरिंग.

साथीच्या रोगाच्या पहिल्या दोन वर्षांत लोक घरीच होते. तेव्हा नेटफ्लिक्सची कमाई वाढली होती. मात्र आता अनेक लोक त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सोडून इतर व्यक्तींना देखील त्यांच्या नेटफ्लिक्सच्या अकाऊंटचे डिटेल्स देत होते. त्यामुळे देखील नेटफ्लिक्सचं नुकसान झालं, असंही कंपनीनं सांगितलं.

कंपनीने सांगितलं की, सध्या सुमारे २२२ मिलियन कुटुंब हे नेटफ्लिक्सचा वापर करत आहेत. पण नेटफ्लिक्स खात्यांची संख्या १०० मिलियन आहे. स्वस्त इंटरनेट डेटा असल्यानं स्मार्ट टीव्हीवर देखील लोक नेटफ्लिक्स वापरत आहेत. परंतु टेलिव्हिजन स्ट्रीमिंग सेवेचे ते पैसे देत नाहीत.

तर अजून एक मुद्दा आहे वाढलेले रेट.

काही देशांमध्ये नेटफ्लिक्सने त्यांचे रेट देखील वाढवले होते, म्हणून देखील त्यांच्या व्यवहारावर परिणाम झाला होता. भारतासारख्या देशामध्ये तर किमतींचा जास्त विचार साहजिकरित्या केला जातो. ज्या पैशात नेटफ्लिक्स येतं त्या पैशात  इतर ३ प्लॅटफॉर्म वापरता येत असतील, तर भारतीय लोक तेच निवडणार. तेव्हा कंपनीचा हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

किंमत बदलल्यामुळे ग्राहकांनी त्यांचं सबस्क्रिप्शन बंद केलं आहे. मात्र अकाउंट शेअरिंगमुळे कंपनीच्या वाढीत मंदी आल्याचं कंपनीनं ठळकपणे नमूद केलंय.

तर तीव्र स्पर्धा हे देखील संभाव्य कारण असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

नेटफ्लिक्सने असंही म्हटलं आहे की इतर स्ट्रीमिंग सेवा आणि अगदी पारंपारिक टेलिव्हिजनकडून वाढती स्पर्धा हे तिमाहीतील त्याच्या सुस्त वाढीमागील संभाव्य कारण राहिलंय.

” टीव्ही तसेच यूट्यूब, अॅमेझॉन आणि हुलू असे प्लॅटफॉर्म पाहण्याची स्पर्धा गेल्या १५ वर्षांपासून जोरदार आहे. तरी गेल्या तीन वर्षांत, पारंपारिक करमणूक कंपन्यांना स्ट्रीमिंग हे भविष्य असल्याचे लक्षात येताच, अनेक नवीन स्ट्रीमिंग सेवा देखील सुरू झाल्या आहेत,” असं कंपनीने म्हटलं आहे.

यामध्ये उडी घेतली आहे टेस्लाचे मलिक एलोन मस्क यांनी.

एलोन मास्क यांनी ट्विट करत नेटफ्लिक्सच्या या परिस्थितीचं कारण सांगितलं आहे. 

 

हा “वोक माईंड व्हायरस” आहे ज्याने नेटफ्लिक्सची अशी हालत केली आहे, असं एलोन मस्क म्हणाले आहेत.

वोक हा अशा लोकांसाठी वापरला जाणारा एक अपशब्द आहे, ज्यांना महत्त्वपूर्ण तथ्ये आणि समस्यांबद्दल (विशेषत: वांशिक आणि सामाजिक न्यायाचे मुद्दे) माहिती आहे आणि सक्रियपणे लक्ष दिलं जातं. त्याच विषयावर ते सतत बोलत असतात.

अशा परिस्थितीत नेटफ्लिक्स पुढे काय करणारेय?

नेटफ्लिक्स आतापर्यंत त्यांच्या स्ट्रीमिंग सेवेसाठी सबस्क्रिप्शन आणि जाहिरात-मुक्त मॉडेलसाठी वचनबद्ध आहे. तरीही त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रीड हेस्टिंग्ज यांनी असे संकेत दिले आहेत की, कंपनी आपल्या सेवेच्या ॲड सपोर्टेड, कमी किंमतीच्या आवृत्तीचा प्रयोग करू शकते, हे मॉडेल एचबीओ मॅक्स आणि डिस्ने + सारख्या त्यांच्या काही प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी वापरले आहे.

हेस्टिंग्ज म्हणाले, “ज्यांनी नेटफ्लिक्सचे अनुसरण केलं आहे त्यांना माहित आहे की मी जाहिरातींच्या जटिलतेच्या विरोधात आहे आणि सबस्क्रिप्शनच्या साधेपणाचा एक मोठा चाहता आहे. पण, मी जितका त्याचा चाहता आहे तितकाच मी ग्राहकांच्या पसंतीचा मोठा चाहता आहे.”

म्हणून कंपनी आता इतर प्लॅटफॉर्मकडे ग्राहक का जात आहे? याचा अभ्यास करून उपाय काढण्याच्या तयारीत आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.