कैलास पर्वतावर आजवर एकाही माणसाला का जाता आलं नाही..?
जगातला सगळ्यात उंच पर्वत आहे तो म्हणजे माऊंट एव्हरेस्ट. त्याची उंची आहे ८८४८ मीटर. या पर्वतावर आजपर्यन्त ६ हजाराहून अधिक लोकांनी यशस्वी चढाई केली आहे. पण दूसरीकडे आहे कैलास पर्वत ज्याची उंची आहे ६७१४ मीटर. मॉऊंट एवरेस्टच्या तुलनेत २१३४ मीटरने कमी. पण या पर्वतावर यशस्वी चढाई करु शकणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या आहे शून्य.
नेमकं काय कारण आहे की कैलास पर्वतावर आजतागायत कोणीही चढाई करू शकलेलं नाही, यामागे नक्की गुढ कारण आहे की वैज्ञानिक ?
सर्वात पहिलं म्हणजे कैलास पर्वतावर कधीच कोणी यशस्वी चढाई करू शकलेलं नाहीए का? तर अस नाही. आजवर फक्त एक व्यक्ती कैलास पर्वतावर गेल्याचं सांगण्यात येतं पण ही एक दंतकथा आहे. बौद्ध धर्मगुरू मिलारेपा यांनी ११ व्या शतकात या पर्वतावर यशस्वी चढाई केली असल्याचं सांगण्यात येतं. पण तो काळ ११ व्या शतकाचा आहे.
ते एकटे या पर्वतावर जावून आले होते अशी आख्यायिका बौद्ध धर्मात प्रचलित आहे. त्यापलीकडे ते खरोखरच तिथे गेले होते का? याबाबतीत कोणतेच पुरावे नाहीत.
पण आधुनिक काळात मात्र एकाही व्यक्तीने कैलास पर्वतावर पाऊल ठेवलेलं नाही. कैलास पर्वत आहे तो सध्याच्या तिबेटमध्ये, तिबेटच्या बुरांग प्रांतात. चीनमध्ये या पर्वताचा उल्लेख कांग्रि बोक असा केला जातो. हे ठिकाण उत्तराखंड आणि नेपाळ यांच्या सीमेजवळ आहे आणि भारतीयांना विशेष परवानगी घेवून इथे जाता येतं.
कैलास पर्वताच्या दिशेने जाण्यासाठी उत्तराखंड राज्यातल्या पिथौरागढ जिल्ह्यातून अस्कोट, धारचूला, खेत, गब्यॉंग, कालापानी, लिपूलेख, तकलाकोट हे मार्ग आहेत.
५४४ किलोमीटर असणारा हा रस्ता डोंगराळ आहे. या मार्गातला शेवटचा प्रवास याक किंवा खेचर यांच्यावरुन पुर्ण करावा लागतो. तकलाकोटपासून पुढे तारचेन मार्गे तुम्ही पायथ्याला असणाऱ्या मानसरोवरापर्यन्त पोहचू शकता. पण तिथून पुढे असणाऱ्या कैलास पर्वतावर मात्र जावू शकत नाही. पर्यटक कैलास पर्वत यात्रेसाठी जातात ते मानसरोवरापर्यन्तच
याच सरोवरातून सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांचा उगम होतो. आणि इथूनच पर्यटक कैलास पर्वताचं दर्शनही घेतात. तसच कैलास पर्वताची परिक्रमा देखील करतात.
ही परिक्रमा खडतर असते. या भागाचं भौगोलिक महत्व आहेच पण त्याहून अधिक अध्यात्मिक महत्व आहे.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार कैलास पर्वत हे साक्षात भगवान शंकराचं निवासस्थान आहे. या पर्वताची परिक्रमा करण्याला हिंदू धर्मात महत्वाचं स्थान आहे. हिंदू धर्मात अशी आख्यायिका आहे की या पर्वताभोवती जो परिक्रमा करतो तो जिवनाचं एक चक्र पुर्ण करतो. संपूर्ण पृथ्वीचा मध्य हा कैलास पर्वतच असून या कैलासरुपी स्तंभावर पृथ्वी आहे.
पण फक्त हिंदू धर्मातच कैलास पर्वताचं महत्व आहे का? तर नाही. जैन धर्मात सुद्धा कैलास पर्वताचं अध्यात्मिक महत्व आहे.
जैन धर्मानुसार जैन धर्माचे पहिले तिर्थकार ऋषभदेव, कैलास पर्वतासमोरच्या अष्टपद पर्वताखाली मोक्ष प्राप्तीसाठी आले आणि इथेच त्यांना मोक्ष मिळाला.
अध्यात्मिक शक्ती मिळाल्यानंतर ऋषभदेव मागे येणार होते मात्र त्यांनी कैलास पर्वताला स्पर्श केला आणि आपली सर्व अध्यात्मिक शक्ती घेवून ते कैलास पर्वतात विलीन झाले.
असच महत्व बौद्ध धर्मात देखील आहे.
बौद्ध समाजात कैलास पर्वताला गुरू रिमपोचे नावाने ओळखलं जातं. याचा अर्थ बर्फाचं मौल्यवान रत्न असा होतो. तिबेट परिसरात, बौद्धधर्म प्रस्थापित करणाऱ्या रेम्पोचे यांचं हे निवासस्थान होतं अशी मान्यता बौद्ध धर्मात आहे.
बौद्धगुरू मिलारेपा हे एकमेव संत होते जे या पर्वतावर जावू शकले अशी आख्यायिका बौद्ध धर्मात आहे.
या सर्व गोष्टी सांगण्याचं मूळ हेच की कैलास पर्वत हा भारत-चीन-तिबेट-नेपाळ अशा सगळ्या देशातल्या नागरिकांसाठी पवित्र असा पर्वत मानला जातो.
पण फक्त याच कारणामुळे या पर्वतावर आजपर्यन्त कोणीही यशस्वी चढाई केली नाही का?.
कारण तुम्ही कैलास पर्वताच्या चढाईसंदर्भात जेव्हा गुगल करता, तेव्हा इथे गेल्यानंतर विचित्र अनुभव येतात, हेलिकॉप्टर भरकटतं, वेगवेगळे आवाज ऐकू येवू लागतात. काही जण गेले होते पण ते कधीच परत आले नाहीत, अशा अनेक गोष्टी येतात.
मग खरं काय, तर या संदर्भात आम्ही अधिक विश्वासू माहिती घेण्यासाठी गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्याशी संपर्क केला…
तेव्हा ते आम्हाला म्हणाले की, ‘सोशल मीडियावर बरेचदा अत्यंत चुकीची माहिती दिली जाते. गिर्यारोहकांनी प्रयत्न केला पण त्यांना पर्वत चढायच्या वेळी चक्कर आली, हात पाय गळून पडले, बीपी लो झालं, या आणि अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला जातो परंतु या सगळ्या अफवा आहेत.’
“हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की कैलास पर्वत हे भगवान शंकराचं घर आहे आणि हा पर्वत होली माउंटन म्हणूनच ओळखला जातो, त्यामुळे या पर्वताचं पावित्र्य जपण्यासाठी आणि धार्मिक भावनांचा आदर म्हणून चीनच्या सरकारने या पर्वतावर जाण्यास बंदी घातलीय. पण हा पर्वत सैर करण्यास अशक्य आहे, असं अजिबात नाही. कैलास पर्वतासोबतच हिमालयात असे अनेक पर्वत आहेत जिथे धार्मिक कारणांमुळे जाण्यास बंदी घालण्यात आलीये. परंतु ते सैर करणं मानवीक्षमते पलीकडे आहे अशातली गोष्ट नाही.”
अर्थात धार्मिक गोष्टींना असणारं महत्व म्हणून या पर्वतावर चढाई करण्याची उदाहरणं नाहीत, शिवाय चीनच्या सरकारने घातलेली बंदी हे देखील एक महत्त्वाचं कारण आहेच.
आत्ता तुम्ही म्हणाल बंदी घातली असली तरी जावू शकतोच की, पण तसं नसतं. जगातला सर्वात उंच पर्वत माऊंट एवरेस्ट सर करण्यास १९५३ साल उजाडावं लागलं. पण दोन व्यक्तींनी माऊंट एवरेस्ट सर करताच एकामागून एक अशा वेगाने माऊंट एवरेस्ट गिर्यारोहकांकडून सर केला जावू लागला.
याचं महत्वाचं कारण म्हणजे गिर्यारोहण करताना असलेल्या सुविधा, स्थानिक शेर्पा लोकांची मदत, उपलब्ध असणारे नकाशे, वातावरणात होणाऱ्या बदलांचा झालेला अभ्यास, त्यांच्या नोंदी अशा अनेक गोष्टी माऊंट एवरेस्टवर सर करणाऱ्यांना महत्वाच्या ठरतात.
मात्र कैलास पर्वतावर चढाईची असणारी बंदी झुगारून कोणी चढाई करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्याकडे ना स्थानिकांचं सहकार्य असणारे ना तिथले नकाशे…
अशा अनेक मर्यादांमुळे आणि त्याहून अधिक म्हणजे प्रत्येक धर्मात असणाऱ्या धार्मिक अधिष्ठानामुळे गिर्यारोहक कैलास पर्वतावर चढाई करत नाहीत.
हे ही वाच भिडू:
- सरखेल कान्होजी आंग्रेंच्या पराक्रमामुळं अंदमान निकोबार बेटं भारतात आहेत…
- बामणोली, ठोसेघर ते भंडारदरा : पुण्याच्या आसपास 5 पर्याय आहेत…!!!
- सातारची प्रियांका ठरली “मकालू सर करणारी पहिली भारतीय महिला.”