एवढा मोठा नोबेल जिंकला तरी विजेत्यांच्या फोटोऐवजी त्यांचं पोट्रेट का प्रदर्शित होतं..?

दिवसभर फेसबुक किंवा ट्विटर किंवा कुठलंही सोशल मीडिया बघत असाल, तर मागच्या काही दिवसांपासून एक गोष्ट तुमच्या सवयीची झाली असेल. दुपारच्या सुमारास आपल्या टाईमलाईनवर नोबेल विजेत्यांबद्दलची माहिती येते. त्यांनी केलेलं काम, त्यांना कुठल्या क्षेत्रात नोबेल मिळाला आहे याची माहिती आणि या सगळ्यासोबत त्यांचं काळ्या, पांढऱ्या आणि सोनेरी रंगातलं एक पोट्रेटही सोबत असतं.

आपल्याकडं साधा रिझल्ट लागला तरी आणि बड्डे असला तरी फ्लेक्सवर फोटो येतोय. हिरो हिरॉईनला एखाद दुसरं अवॉर्ड मिळालं तरी त्यांचा फोटो ट्रेंडमध्ये येतो. थोडक्यात काय ? तर कायतर भारी झाल्यावर फोटो झळकणं मस्ट असतंय. 

पण जागतिक दर्जाचा आणि प्रथितयश असा नोबेल पुरस्कार जाहीर होतो, तेव्हा मात्र या विजेत्यांचे फोटो प्रदर्शित होत नाहीत. म्हणजे एवढ्या मोठ्या नोबेल पुरस्काराची घोषणा विजेत्यांच्या फोटोशिवायच होते.

फोटोंऐवजी वापरलं जातं ते विजेत्यांचं पोर्टेट अर्थात चित्र

आता आपण ही नोबेल विजेत्यांची पोर्टेट बघितली, तर लक्षात येतं यावर अगदीच बारकाईनं आणि भारी काम केलं जातं. एखाद्या व्यक्तीचं असं भारी चित्र काढायला कधी कधी सगळा दिवस जातो, पण नोबेल विजेत्यांचं नाव गुलदस्त्यात असतं तरी हे चित्र इतक्या लवकर कसा तयार होतं ? आणि हे चित्र नेमकं काढतं कोण ?

२०१२ च्या आधी नोबेल विजेत्यांच्या नावाच्या घोषणेसोबत विजेत्यांचे साध्या कॅमेरातून काढलेले फोटो जाहीर व्हायचे. मात्र २०१२ नंतर ही पद्धत बदलण्यात आली आणि त्याला कारण ठरली एक घटना.

निकलास एल्मेहेड हा स्वीडिश आर्टिस्ट नोबेल विजेत्यांची पोट्रेट तयार करतो. तेही २०१२ पासून. त्याचं झालं असं की निकलासनं नोबेल प्राईजसाठी आर्ट डिरेक्टर म्हणून काम पाहायला सुरुवात केली. त्याच्याकडे नोबेल प्राईजशी निगडित व्हिज्युअल कंटेंटची जबाबदारी देण्यात आली. २०१२ चे नोबेल पुरस्कार जेव्हा जाहीर झाले, तेव्हा घोषणेसोबत देण्यासाठी एका विजेत्या शास्त्रज्ञाचा फोटोच उपलब्ध नव्हता.

तेव्हा निकलासनं एका काळ्या मार्करनं विजेत्या शास्त्रज्ञाचं पोर्टेट काढलं आणि ते जाहीर करण्यात आलं. तेव्हापासून मग हीच पद्धत कायम स्वरूपी वापरण्याचं ठरवण्यात आलं.

यामागे दुसरंही एक कारण होतं ते म्हणजे, बऱ्याचदा नोबेल विजेते शास्त्रज्ञ आणि संशोधक यांचे फोटोज उपलब्ध नसायचे. कधी ते शोधणं कठीण असायचं, कधी उपलब्ध असलेल्या फोटोंचं रिझोल्युशन चांगलं नसायचं त्यामुळं विजेत्यांच्या चेहरा ओळखणंही कठीण जायचं. बरं भेटून फोटो काढायचा म्हणलं तरी विजेत्यांनाही आपलं नाव जाहीर होणार आहे, हे माहीत नसतं. एखादा फोटो उपलब्ध असलाच, तरी त्याला कॉपीराईट असण्याचा धोकाही असायचा.

त्यामुळं या सगळ्यावर तोडगा म्हणून पोट्रेटची संकल्पना पुढं आली…

२०१२ पासून दरवर्षी हीच पद्धत वापरण्यात येते. पण निकलासही पोट्रेट काढण्यासाठी विजेत्यांचं नाव जाहीर होण्याच्या अगदी काही तास आधीच समजतं. त्यामुळं परीक्षकांसोबतच विजेत्यांचं नाव माहीत असलेला निकलास एल्मेहेड हा एकमेव माणूस असतो. विजेत्यांचं नाव लक्षात आल्यावर काही तासात पोट्रेट काढण्याचं काम निकलास करतो.

२०१४ ते २०१७ मध्ये या पोट्रेटसाठी निळा आणि पिवळा रंग वापरण्यात येत होता. मात्र २०१७ मध्ये यात बदल करण्यात आला आणि सोनेरी रंग हा मुख्य रंग असेल हे ठरलं.

त्यासाठी कुठला कृत्रिम सोनेरी रंग न वापरता निकलास अस्सल सोन्याचा वापर करतो…

आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीमध्ये त्यानं सांगितलंय की, ‘२०१७ मध्ये जेव्हा मला सोनेरी रंग ही थीम असेल हे सांगण्यात आलं, तेव्हा मी अनेक रंग ट्राय करुन पाहिले पण नंतर गोल्डन फॉईलचाच वापर करण्याचं ठरवलं.’ 

निकलास पांढऱ्या कॅनव्हासवर काळ्या रंगात आऊटलाईन तयार करतो, त्यानंतर सोन्याचा बारीक पत्रा एका विशिष्ट ग्लू ने त्या चित्रावर चिटकवून हे पोट्रेट काही तासात बनवलं जातं. 

निकालस एका मुलाखतीत सांगतो की, ‘मी या पोट्रेट्समध्ये डोळ्यांवर फार काम करतो. ज्यामुळं पोट्रेट बघणाऱ्याला असं वाटेल की चित्रातली व्यक्ती थेट आपल्याकडेच बघत आहे आणि हे चित्र बघून त्याला लगेचच नोबेल पुरस्कारांची आठवण होईल.’

नोबेल प्राईज जाहीर झाल्यावर पुढच्या काही मिनिटातच विजेत्यांच्या नावासोबतच ही पोट्रेट्स ही जगभरातल्या मोठमोठ्या माध्यमांच्या साईट्सवर झळकतात, पुढं जाऊन मॅगझीनमध्येही दिसतात आणि विजेत्यांसाठी तर तो अनमोल ठेवा असतो. पण निकालस एल्मेहेड ही पोट्रेट्स काही तासात बनवत असला, तरी त्याच्यासाठीची त्याची मेहनत कित्येक वर्षांची आहे हे विसरुन चालत नाही.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.