पारशी समाजानं भारताला क्रिकेट दिलं, पण हाच समाज क्रिकेटमधून आउट का झाला..?

मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते है, ना दिखाई देते है, बस एक मुल्क का नाम सुनाई देता है… इं-डि-या.

चक दे इंडियामध्ये शाहरुख खान हा डायलॉग मारतो, तेव्हा आजही आपल्या अंगावर काटा येतो. एवढंच नाही, तर भारताची क्रिकेट टीम मॅचसाठी मैदानात उतरली आणि राष्ट्रगीत वाजलं, तरी आपले डोळे नकळत ओले होतात. आपले जात, धर्म, आयुष्यातले टेन्शन्स या सगळ्या गोष्टी विसरुन आपण कशामुळं एकत्र येत असू, तर खेळ. भारतातल्या खेळांचा इतिहास तसा फार जुना आहे. लोकप्रियतेच्या लाटेवर इतर खेळ वरखाली होत असले, तरी एका खेळाचं स्थान मात्र अबाधित आहे ते म्हणजे क्रिकेट.

जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियमही भारतातच आहे आणि भारतातली पोरं अंगणात सोडा, घरातही क्रिकेट खेळू शकतात. कारण आपल्याकडचं क्रिकेटचं खुळच तितकं वाढीव आहे. पण भारताला क्रिकेटचं हे येड लागलं कुणामुळं?

आता तुम्ही म्हणाल, भिडू आम्ही लगान पिक्चर पाहिलाय, हे येड ब्रिटिशांमुळं लागलं. म्हणायला गेलं तर एका अर्थानं हे खरं आहे. ब्रिटिशांनी समाजातल्या हाय क्लास वर्गाला क्रिकेटची ओळख करुन दिली, पण सामान्य भारतीयांना त्याचं येड लागलं ते पारशी लोकांमुळं.

बाटलीवाला, दारुवाला, कल्याणीवाला असल्या नादखुळा आडनावांपासून टाटा, इराणी असली रॉयल लोकंही पारशी समाजात आहेत. याच पारशी लोकांनी भारतीयांना क्रिकेटचा नाद लावला आणि शंभरपेक्षा जास्त वर्ष उलटून गेली, तरी आपण तो जपलाय.

भारतावर ब्रिटिशांचा अंमल असताना, अनेक ब्रिटिश अधिकारी विरंगुळा म्हणून मुंबईच्या मैदानांवर क्रिकेट खेळायचे. त्यावेळी भारतात पारशी लोकांची लोकसंख्या ८० हजार होती. पारशी समाज आर्थिकदृष्ट्या सधन आणि सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेला होता. त्यांचं राहणीमान ब्रिटिश पद्धतींना साजेसं होतं. या दोघांची विण आणखी घट्ट झाली ती क्रिकेटमुळं.

आधी पारसी क्रिकेटर्स विरुद्ध ब्रिटिश अशा मॅचेस होऊ लागल्या. पारसींना क्रिकेटमधला सूर गवसत गेला आणि १८४८ मध्ये त्यांनी ओरिएंटल क्रिकेट क्लब स्थापन झाला. त्यानंतर १८७७ मध्ये पारसी क्रिकेटर्सचा संघ बॉम्बे जिमखान्याविरुद्ध खेळला आणि खरा अर्थानं भारतीय क्रिकेटचा बॅटन सामान्य लोकांच्या हातात सरकला.

भारतात क्रिकेट आणखी लोकप्रिय झालं, ते क्वाड्रँग्युलर सिरीजमुळं. सुरुवातीला हिंदू, पारसी, मुस्लिम आणि युरोपियन्स संघांचा या स्पर्धेमध्ये समावेश होता. ब्रिटिशांचा समावेश असलेल्या युरोपियन्स संघाला हरवून पारशी संघानं एका प्रकारे भारतीयांनाच विजय मिळवून दिला होता.

पण याहीपेक्षा मोलाचं योगदान होतं, ते म्हणजे पारसी संघाचा इंग्लंड दौरा

ही गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातली, तेही १८८६ मधली आहे. १५ पारशी खेळाडूंनी इंग्लंडचा दौरा केला. तिकडे हा संघ काही प्रदर्शनीय मॅचेस खेळणार होता. विशेष म्हणजे या संघात खेळाडूंची निवड त्यांच्या क्रिकेटमधल्या गुणवत्तेवरुन नाही, तर ज्याला इंग्लंड-भारत प्रवासाचा खर्च परवडतोय तो गडी संघात, अशा पद्धतीनं झाली. खरंतर, त्यावेळेस क्रिकेट शिकणं, खेळणं आणि लोकांमध्ये रुजणं जास्त महत्त्वाचं होतं.

या पारसी खेळाडूंच्या संघात १२ खेळाडू मुंबईचे होते, तर ३ जण कराचीचे. डॉक्टर धनजी शॉ पटेल यांच्या नेतृत्वात खेळलेल्या या संघानं ४ महिन्यांच्या लांबलचक दौऱ्यात २८ मॅचेस खेळल्या. त्यातली १ जिंकली, ८ ड्रॉ केल्या आणि १९ मॅचेसमध्ये पराभव स्विकारावा लागला. त्यांच्या पराभवाची चर्चा इतकी झाली, की तिकडच्या लॉईड्स विकली न्यूजपेपरनं पारसी टीमच्या सततच्या पराभवाबद्दल लिहिलं होतं,

‘The Parsee cricketers continue to be beaten- Parseestantly.’

पण त्यावेळेस जिंकण्यापेक्षा खेळणं जास्त महत्त्वाचं होतं. त्यानंतर १९८८ मध्ये पारसी संघानं पुन्हा एकदा इंग्लंडचा दौरा केला.

१९३२ मध्ये भारतीय संघानं पहिली टेस्ट मॅच खेळली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ मध्ये.  १९५० पर्यंत भारतीय क्रिकेट राजेशाहीतून लोकशाहीचं आणि साधनसामुग्रीचं स्थित्यंतरच अनुभवत होतं. या दरम्यान भारतीय संघाकडून ८ पारसी क्रिकेटर्स खेळले. सोराबजी कोलाह आणि फिरोझ पालिया हे पारशी क्रिकेटर्स अगदी पहिल्या टेस्टमध्ये भारतीय संघाकडून खेळले. त्यानंतर या नावांमध्ये भर पडत गेली. स्वातंत्र्यानंतर मात्र पारशी क्रिकेटर्सचा सहभाग काहीसा मंदावला. नरी कॉन्ट्रॅक्टर, रुसी सुर्ती आणि फारुख इंजिनिअर या गाजलेल्या क्रिकेटर्सनी १९५५ नंतर भारतीय संघात पदार्पण केलं.

१९६१ मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेट खेळलेले फारुख इंजिनिअर हे आतापर्यंतचे अखेरचे पारशी क्रिकेटर. जवळपास ६० वर्ष उलटली असली, तरी इंजिनिअर यांच्यानंतर भारताकडून पारशी खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही.

गुजरातच्या अर्झान नागवसवाला या कडक फास्ट बॉलरची मध्यंतरी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. इंग्लंड दौऱ्यात अर्झानला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्याचा स्ट्रगल अजून संपलेला नाही, हे स्पष्ट झालं. फारुख इंजिनिअर यांच्यानंतर अजूनही भारतीय संघ पारशी क्रिकेटरची वाटच बघतोय.

कधीकाळी भारतीय क्रिकेटचं सत्ताकेंद्र असलेल्या पारसी समाजाचा भारतीय संघातला टक्का मात्र ढासळत गेला.

यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, त्यांची घटलेली लोकसंख्या. २०१६ च्या आकडेवारीनुसार भारतात पारसी समाजाची लोकसंख्या फक्त ६१ हजार आहे. या लोकसंख्येतही ज्येष्ठांचं प्रमाण जास्त आहे. तरुणांची संख्या मुळातच मर्यादित झाली आहे.

त्यातच पारशी समाजानं फार आधीपासून वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आपला जम बसवला आहे. त्यामुळं अनेक तरुण मुलं व्यवसायाची वाट पकडतायत, तर अनेक जण उच्चशिक्षणानंतर परदेशाची वाट पकडत आहेत. 

दुसऱ्या बाजूला भारतीय क्रिकेटमध्ये आता मोठ्या शहरातून आलेल्या खेळाडूंच्या तोडीस तोड टक्का छोट्या शहरांमधून आलेल्या खेळाडूंचाही आहे. त्यामुळं संघातल्या जागांसाठी स्पर्धा वाढलीये. सुरुवातीला एकाच टूर्नामेंटमधून भारतीय संघासाठी खेळाडू निवडले जात होते. तेव्हा पारशी खेळाडू बहुसंख्य असल्यानं संधीची दारं लवकर उघडत होते. सध्या मात्र चित्र बदललंय त्यामुळं क्रिकेटची आवड असणाऱ्या पारशी खेळाडूंना प्रचंड प्रमाणावर मेहनत करणं आणि स्वतःशीच असलेली स्पर्धा जिंकून भारतीय संघाची दारं उघडावी लागतील हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.