OLA च्या स्कुटरने हवा जोरात केली पण आत्ता मॉडेल फेल चाललय, नेमकं काय गंडतय..

संपूर्ण भारतीयांच्या आयुष्यात कधीकधी सोन्याचे दिवस येत असतात. असाच एक दिवस मागच्या वर्षी येवून गेला. झालं काय की ओला नवीन इ-स्कुटर आणतय अशी बातमी आली. गाडीची किंमत माहिती नव्हती पण फक्त ४९९ रुपयात गाडी बुक करता येणार होती…
५०० तर ५०० म्हणून एका दिवसात लोकांचे थवेच्या थवे गाडी बुकींग करायला पडले. २४ तासात १ लाखापेक्षा जास्त लोकांनी ओलाची स्कुटर बुक केली..दूसऱ्या दिवशी आकडेवारी समोर आली तेव्हा कंपनीने अकराशे कोटी रुपये फक्त प्री बुकींगमधून मिळवलेले..
बुकींग करताना गाडी बघायला मिळालेली. प्रत्येक कलरमध्ये असणारी ही गाडी सेक्सी दिसत होती. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये बुकिंग करा आणि डिसेंबरला गाडी घेवून जा असा तो फॉर्म्युला होता. गाडीची खडान् खडा अपडेट कंपनीचा फाऊंडर भावेश अग्रवाल देत असल्यानं टेन्शन काहीच नव्हतं..
पण डिलिव्हरी काय टायमिंगमध्ये झाली नाही अन् जेव्हा झाली तेव्हा गंडलेली झाली..
झालं अस की, ज्या गाड्यांची डिलिव्हरी झाली त्यात क्वालिटी मेंटेन नव्हती. अजूनही ज्या गाड्या डिलिव्हर होत आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम आहेत.आता तर ओलाच्या स्कुटर्सनी पेट घेतल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामध्ये एकाचा मृत्यू देखील झाल्याची बातमी आली.
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या बातमीनुसार पुण्यातल्या ओलाच्या स्कुटरला आग लागल्याच्या घटनेनंतर ओलाने त्यांच्या १४४१ स्कुटर परत मागवल्याचं सांगण्यात आलं..
यातूनच ओलाच्या अडचणीत सापडलेल्या मॉडेलची पुन्हा चर्चा चालू झाल्या.
त्यामुळं ओलाचा कार्यक्रम नक्की कुठं गंडला हे एक एक करून बघू .
तर पहिली सुरवात झाली जरा जास्तच मोठी स्वप्न दाखवण्यापासून.
सुरवातीपासूनच ओला ज्या ज्या सेक्टरमध्ये उतरते त्यामध्ये डिसरप्शन आणण्याच्या हेतूनेच उतरते. त्या क्षेत्रात ओला क्रांतीच आणणार, मार्केटचा चेहरा मोहराच बदलून टाकणार अशी कंपनीची ध्येय निश्चित केली जातात.
इलेक्ट्रिक स्कुटरच्या बाबतीतही तेच झालं.
त्यामुळं भावेश अग्रवालनं कंपनीच्या पुढं अशी काय टार्गेट्स ठेवली की जी एका टाईमनंतर फॉलो करणं जवळपास अशक्य झालं. उदाहरणार्थ ओला स्कुटरचं बुकिंग करण्यासाठी जी वेबसाइट बनवण्यात येणार होती त्यामध्ये अनेक प्रॉब्लेम असताना भावेश अग्रवालने स्कुटरच्या बुकिंगची अनाउंसमेंट करून टाकली होती.
अगदी उद्यावर बुकिंग आल्यानंतर त्यानं मग एक इंजिनिअर आणून बसवला आणि त्याला रात्रीत काम उरकायला सांगितलं. अखेरीस काम काय झालं नाही. बुकिंगची तारीख अग्रवालला पुढं ढकलावी लागली. याबद्दल त्यानं लोकांची माफी देखील मागितली आणि त्या इंजिनिअरला कामावरून काढून देखील टाकलं.
हेच त्याचं इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत झालं.
२०१८ मध्ये भावेश अग्रवालनं ओला इलेक्ट्रिकसाठी एक टार्गेट फिक्स केलं होतं. २०२१ पर्यंत १० लाख इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणण्याची घोषणा त्यानं करून टाकली होती. मात्र त्यासाठी त्यानं म्हणावी तेवढी तयारी केली नव्हती. स्कुटरचं बुकिंग अनाऊन्स झालं तेव्हा स्कुटरचं फक्त ६० ते ७० टक्केच मॉडेल रेडी होतं. तरीही हा भाऊ मोठेच्या मोठे दावे करत होता आणि एकदिवस तेच अंगलट आलं.
अजून एक म्हणजे बाकीच्या बिझनेसची घडी बसली नसताना देखील भावेश अग्रवालची नवीन बिझनेसमध्ये धडका मारायची वृत्ती..
ola हा ब्रँड खरं तर त्यांच्या ऑनलाइन कॅब बुकिंगमुळं घराघरात पोहचला. मात्र या बिझनेसबरोबर ओलचे अजून देखील प्रोडक्ट आहेत. ओला फूड, ओला ग्रोसरी डिलिव्हरी, ओला प्री-ओन कार, ओला फायनान्शियल सर्विसेस इत्यादी बिझनेस ओलाने चालू केले आहेत.
ओला फूड मध्ये तर हे भाऊ स्वतः खिचडी, पिझ्झा विकण्याच्या बिझनेसमध्ये उतरले होते.
आता तर १० मिनिट फूड डिलिव्हरीमध्ये देखील ओला उतरायची तयारी करतेय. मात्र यातला एकही बिझनेस नीट वाढला नाही. जो मोठा झाला तो ओला कॅबचा बिझनेस देखील अजून फायद्यात नाहीये. २०२१ मध्येच ओला कॅबला २०० कोटींचं नुकसानंच झालं आहे. कंपनीचं वॅल्युएशन पण मागच्या २ वर्षांपासून वाढलेलं नाहीये.
त्यामुळं भावेश अग्रवालच्या बिझनेस मॉडेलमध्येच काहीतरी इशू आहेत असे आरोप पहिल्यापासूनच करण्यात येत होते आणि ते काही प्रमाणात खरे देखील होते गेले.
अजून एक म्हणजे भावेश अग्रवालच्या कंपनीत लोकं टिकत नव्हती.
ओला कंपनी सोडून जाण्याचं विशेषतः मोठ्या पदावरील लोकांचं कंपनी सोडण्याचं प्रमाण मोठं आहे. यामागील कारण सांगण्यात येतं,
भावेश अग्रवालची वर्किंग स्टाइल.
मॉर्निंग कॉन्टेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत ओलाच्या एका एक्झिक्युटिव्हनं सांगितलं की ओला कंपनीत अगदी छोट्यातले छोटे निर्णय पण भावेश अग्रवालला विचारून घ्यावे लागतात. त्यामुळं इतरांना डिसिजन मेकिंग पॉवरच राहत नाहीत आणि शेवटी मग कंटाळून हे एक्झिक्युटिव्ह जॉब सोडतात.
ओला स्कुटरचंच उदाहरण घ्यायचं झालं तर कंपनीतल्या चीफ टेक्निकल ऑफिसरच्या रोलचं घेता येइल.
भावेश अग्रवालच्या दैनंदिन कामातला नको तेवढा हस्तक्षेप होत असल्याचं कारण देत कंपनीच्या दोन चीफ टेक्निकल ऑफिसर्सनी कंपनी सोडली होती. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार टेक कंपनी असणाऱ्या ओलाकडे दीड वर्षांपेक्षा जास्त काळ होऊनही चीफ टेक्निकल ऑफिसर नाहीये.
या सर्व कारणांमुळेच सध्या ओला कठीण काळातून जात आहे. ओलाचं सगळंच फसलंय असा सिन नाहीये पण त्यांच्यापुढे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत हे मात्र खरंय. भारतात इलेक्ट्रिक गाड्यांच्या प्रसारासाठी ओलासारखा स्टार्ट-अप यशस्वी होणं हे तितकंच महत्वाचं आहे.
त्यामुळं ओलाचा CEO आणि फाउंडर भावेश अग्रवाल यातून कसा मार्ग काढतो हे येत्या काळात बघण्यासारखं असणार आहे.
हे ही वाच भिडू :
- ओलाची स्कुटर जळल्याने “ई-स्कुटर” घ्यावी का नको? लेख वाचून निर्णय घ्या.
- भाड्यानं घेतलेल्या कारच्या ड्रायव्हरनं बल्ल्या केला आणि मालकाला ओला कॅब्सची आयडिया सुचली
- बडोद्याच्या राजघराण्याने राजा रवि वर्माच्या जीर्ण झालेल्या स्टुडिओला नवीन रूप दिलंय.