जनता म्हणतेय, महाग झालेलं LPG सिलेंडर सोडा आता PNG कडे वळा पण…

सकाळची झोपमोड होण्यासाठी भोंगाच कारणीभूत ठरतो असं काही नाही, कधीकधी मोबाईलवर येणाऱ्या बातम्या सुद्धा झोपमोड करू शकतात. अशीच एक आज बातमी आली आणि माझी सकाळची झोपमोड झाली. बातमी होती..

 घरगुती वापराचा सिलेंडर महाग झाला याची..आत्ता या सिलेंडरच्या किंमती १ हजार रुपयांच्या वर पोहचल्यात..

आत्ता नेमकी किती आणि कशी भाववाढ झालेय तर,

गेल्या एका वर्षात देशांतर्गत एलपीजीच्या किमतीत जवळपास २०३.५० रुपयांची वाढ झाली आहे.. 

कसं? तर गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलाबाबत बोलायचे झाले तर त्यात एकूण ५ वेळा बदल झाला आहे. २२ मार्च २०२२ रोजी सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढल्यानंतर दिल्लीत ८९९.५० रुपयांवरून ९४९.५० रुपयांवर पोहोचली होती.

यानंतर, तेल विपणन कंपन्यांनी मे २०२२ मध्ये सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवली, ज्यामुळे ती ९९९.५० रुपयांवर पोहोचली. त्याच महिन्यात १९ मे रोजी पुन्हा २.५० रुपयांनी वाढ करण्यात आली. यानंतर किंमत १ हजार ३ रु. रुपये झाली.

मग जुलै २०२२ मध्ये सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली, या वाढीनंतर किंमत १ हजार ५३ रुपये झाली होती. आता पुन्हा एकदा ५० रुपयांची वाढ झाली असून, त्यामुळे सिलिंडरची किंमत आता १ हजार १०३ रुपयांवर गेली आहे. थोडक्यात गेल्या वर्षभरात किंमत  २०३.५० रुपयांनी वाढली आहे.

एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, मागची किंमत वाढ तेव्हा झाली आहे जेव्हा अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय की, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई ७.७ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे अंदाज खरा ठरतोय असं दिसतंय.

या वाढीने लोकांच्या किचन बजेटवर मोठा भार पडणार आहे. पण भारतीयांची सवयच आहे…पर्याय शोधण्याची. ज्यानुसार काही जणांकडून असं ऐकण्यात आलंय की, 

LPG वाढलंय ना, तर मग आम्ही PNG कडे वळू.

हे ऐकल्यावर म्हटलं, हे PNG काय आहे? ते LPG पेक्षा स्वस्त असतं का म्हणून अनेकजण त्याकडे वळण्याचं बोलतायेत? सगळी भानगड समजून घेऊन निष्कर्षावर पोहोचण्याचं ठरवलं.

PNG काय आहे?

पीएनजीचा फुलफॉर्म आहे ‘पाईप्ड नॅचरल गॅस’.  हा नॅच्युरल गॅस असतो जो पाइपद्वारे आपल्या घराशी जोडला जातो. म्हणजेच PNG वर शेगडी चालवण्यासाठी प्रॉपर कनेक्शन घ्यावं लागतं. पीएनजी LPG  सारखा एका ठिकाणी साठवला जात नाही म्हणून त्याचा पाईपलाईनद्वारे विनाखंडित पुरवठा केला जातो.

हे पाईपलाईन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क ऑन-लाईन सप्लाय सिस्टमवर आधारित आहे, ज्यात सुरक्षा व्हॉल्व्ह आणि रेग्युलेटर्स असतात जे गॅस सप्लाय आणि प्रेशर नियंत्रित करतात आणि कुठे लिकेज असेल तर ते ओळखण्यास मदत करतात. अशाप्रकारे कॉन्स्टन्ट प्रेशरवर अन-इंटरपटेड पुरवठ्याची खात्री दिली जाते.

याचे फायदे काय आहे? 

पहिला म्हणजे घरगुती पीएनजी कनेक्शन घेताना एलपीजी उपकरणालाच पीएनजीमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. त्यासाठी गॅल्व्हेनाइज्ड आयर्न पाईपलाईन नेटवर्क टाकलं जातं, ज्यात आवश्यक फिटिंग्ज, प्रेशर रेग्युलेटर आणि मीटरचा समावेश असतो. म्हणजे किचनमध्ये गॅस सिलेंडरसारखी जागा हे व्यापत नाही.

दुसरं… एलपीजी सिलिंडर भरल्यावर त्याची तारीख आपण नोंदवून ठेवतो. तो कधी संपणार याचा अंदाज घेऊन पुढच्यावेळी परत बुकिंग करावं लागतं. शिवाय एलपीजी सिलिंडरची उपलब्धता स्टॉकवर अवलंबून असते. हीच झंझट इथे नसते. 

एकदा कनेक्शन मिळाल्यानंतर पीएनजीचा सप्लाय दिवसाचे २४ तास असतो. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते वापरू शकतो. आणि बुकिंगचं टेन्शन घेण्याची गरज नाही.

तिसरं कनेक्शन कॉस्ट. हे कनेक्शन घेण्यासाठी आधी नोंदणी केली जाते. त्यावेळी घराच्या प्रकारावर आणि कनेक्शन टाईपनुसार इन्स्टॉलेशन कॉस्ट ठरवली जाते. तर दोन बर्नरची शेगडी असेल तर कोणतीही अतिरिक्त किंमत घेतली जात नाही.

चौथा फायदा… पीएनजी हा अतिशय सुरक्षित पर्याय आहे. 

पीएनजीचा दाब सुमारे २१ मिलीबार असतो जो सिलिंडरद्वारे पुरविल्या जाणाऱ्या नेहमीच्या गॅसपेक्षा २०० पट कमी आहे. शिवाय यात नैसर्गिक वायू वापरण्यात येतो हा महत्वाचा फॅक्टर आहे. नॅच्युरल गॅस हा हवेपेक्षा हलका असतो आणि कोणत्याही प्रकारची गळती झाली की तो हवेत लगेच मिसळतो आणि त्याचं बाष्पीभवन होतं.

शिवाय पाइपलाइनमध्ये ठराविक अंतराने वापरल्या जाणाऱ्या रेगुलेटर्सने सेक्युरिटी सिस्टिमवर लक्ष ठेवलं जातं. त्यात पाइपला कमीत कमी छिद्रे असल्याने गॅस गळती होण्याची शक्यता नगण्य असते म्हणून आग लागण्याची शक्यता खूप कमी असते. 

शिवाय थंडीच्या दिवसात एलपीजी सिलिंडरमधील गॅस गोठतो, पण पीएनजीमध्ये अशी समस्या येत नाही. 

हे सगळं समजलं? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा…

किमतीचं काय? बिलिंग सिस्टीम कशी असते?

पीएनजीमध्ये तुमच्या वापरानुसार पैसे ठरतात, त्यानुसार बिल भरावे लागते. तुमचा वापर कमी असेल तर तुमचं बिलही कमी असेल. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी गॅस २५ ते ३० टक्के कमी खर्चिक असतो.  

हे बिल मोजतात कसं? 

दर दोन महिन्यांनी याचं बिलिंग होत असतं. कनेक्शन घेताना जे मीटर बसवलं जात त्याआधारे बिलिंग होतं. लाईटच मीटर रिडींग घेतलं जातं अगदी तसंच. तर स्टॅंडर्ड क्युबिक मीटर म्हणजे SCM हे त्याचं मोजण्याचं प्रमाण असतं. 

उदाहरण घेऊया…

समजा २ जणांना एक १४ किलोचा LPG सिलेंडर दोन महिने जातो, तर त्यांना आता २ महिन्यांचा खर्च येणार जवळपास १००० रुपये. तेच जर तुम्ही PNG कनेक्शन वापरत असाल तर दोन जणांचा अंदाजे वापर २४ SCM पर्यंत येऊ शकतो, ज्याचे पैसे होतात साधारण ७५० रुपये. म्हणजे जवळपास २५% पैसे इथे तुमचे वाचतात.

अशाप्रकारे जर आपण पीएनजीची तुलना एलपीजीशी केली तर पीएनजी नक्कीच पॉकेट फ्रेंडली आहे. शिवाय याच्या वापराने आपण निसर्गाच्या संरक्षणात देखील हातभार लावतो. आणि म्हणून अनेक जण याकडे वाळण्याचं सध्या बोलत आहेत.

मात्र यात २-३ मुद्दे आहेतच… 

एक म्हणजे सध्या इतर गॅसप्रमाणे PNG मध्ये देखील सरकार वाढ करत आहे. २२ एप्रिलपासून PNG च्या किमतीत ९ रुपयांची वाढ झालीये. म्हणजे महागाई इथे सुद्धा जाणवेलच. 

तर दुसरं मुद्दा शहरी भागांमध्ये याचं कनेक्शन सहज मिळू शकतं, मात्र गावाकडे कनेक्शन मिळणं अजूनही अवघड आहे. ताशा सुविधा उपलब्ध नाहीत. शिवाय शहरांतही अनेक ठिकाणी असं आहे की, एका घराला हवं असेल तर संपूर्ण सोसायटीला त्यासाठी तयारी दाखवावी लागते. कारण अनेक कंपन्या बल्कमध्ये याचं वितरण करतात. 

म्हणून ही आव्हानं दुर्लक्षित करता येणार नाहीत.

मात्र दुसरीकडे  PNG च्या वापरासाठी सरकार देखील आग्रही असल्याचं दिसतंय. 

जानेवारीतील वृत्तानुसार, देशातील ७० टक्के लोकसंख्येला पीएनजी कनेक्शन देण्याची योजना मोदी सरकारने आखली आहे. ज्यानुसार देशातील सुमारे ४०० जिल्ह्यांमध्ये ४ कोटी पीएनजी कनेक्शन दिले जाणार आहेत. 

तेव्हा कधीपर्यंत सरकार या आव्हानांना तोंड देऊन PNG सहज उपलब्ध करून देऊ शकतं? हे बघणं गरजेचं असणारेय. सगळी माहिती तुम्हाला सांगितली आहे. तेव्हा आता तुम्ही PNG निवडणार की आपलं LPG राहू देणार? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा…  

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.