“छोडेंगे नहीं” म्हणत राज ठाकरेंच्या विरोधात उतरलेली PFI संघटना तितकीच बदनाम आहे
मस्जिदींवरील भोंग्यांनवर बंदी घालण्यावरून चालू झालेला वाद काय थांबण्याचा वाद आता काय थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज ठाकरेंनी आधी गुढीपाडव्याच्या सभा आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा घेऊन मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत तर मशिदींपुढं हनुमान चालीसा लावणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मेचा अल्टिमेटम पण दिला आहे.
आता राज ठाकरेंच्या या भूमिकेचा विरोध करण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पुढं आली आहे.
हमको छेड़ोगे तो हम छोड़ेंगे नहीं, ये याद रखना
असा धमकीवजा इशारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी यांनी दिली आहे.
अजानमुळे काहींना त्रास होत आहे. काही लोकांना आमच्या मदरसा आणि मशिदीचा त्रास होत आहे. मला त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की आम्हाला शांतता हवी आहे. हर मजलूम हमारा है असा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा नारा आहे. एका मदरशाला, मशिदीला किंवा अगदी एका लाऊडस्पीकरलाही हात लावायचा प्रयत्न केला तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया त्याविरोधात सगळ्यात पुढे असेल असं ही मतीन शेखानी यांनी म्हटलं आहे.
त्यामुळं आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अजून एका नवीन वादात उतरणार हे फिक्स झालंय. रामनवमीला झालेल्या दंग्यांमध्येपण या संघटनेचं नाव आलं आहे. त्यामुळं सरकार या संघटनेवर बंदी घालेल असं सांगण्यात येत आहे.
त्यामुळं या आधी हि संघटना कोण कोणत्या वादात सापडली आहे हे बघू.
२०१७ मध्ये देशातील एका मुलीचे हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मांतर करण्याची मोठी चर्चा झाली होती.
केरळमधील कोट्टायम शहरातील या २४ वर्षीय मुलीचे वडील नास्तिक तर आई कट्टर हिंदू होती. अखिला ही केएम अशोकन यांची एकुलती एक मुलगी होती. अखिलाने ऑगस्ट २०१० मध्ये वैद्यकीय शिक्षण सुरू केले. येथे त्याची जसिला आणि फसीना अबुबकर या दोन बहिणींशी मैत्री झाली.
आयुष्यात पहिल्यांदाच अखिलाला मुस्लिम मैत्रिणी मिळाल्या होत्या.
ती जसिला आणि फसीना दिवसातून पाच वेळा नमाज पढताना दिसायची. यातूनच तिने जसिलाकडून मल्याळममध्ये कुराण वाचायला घेतले. पुढे दिवेसंदिवस अखिलाचा इस्लामकडे ओढा वाढत होता. २०११ मध्ये रमजानच्या सुट्टीत अखिला तिच्या घरी आली होती आणि तिने या दिवसांत रमजानचा उपवासही ठेवला होता. तसेच जसिलाच्या घरी ईदसाठी गेली होती. पुढे तिने या दोन बहिणींच्या वडिल अबुबकर यांनी दिलेल्या पुस्तकातून इस्लामची माहिती करून घेतली. नंतर तिने सत्य शरणी या संस्थेत जाऊन इस्लामचा अभ्यास चालू केला.
आणि जेव्हा ती या संस्थेतून बाहेर पडली तेव्हा ती अखिलाची हदिया झाली होती.
पुढे तिने मॅट्रोमोनिअल साइटवरून शफी जहाँ या तरुणाशी लग्न देखील केले. याविरोधात आता हदिया झालेल्या आपल्या मुलीच्या लग्नाच्या विरोधात अशोकन यांनी केरळ उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आणि कोर्टाने पण हदियाचे लग्न मोडीत काढत तिची कस्टडी वडिलांकडे दिली. हदियाने मग
”मी मुस्लिम आहे आणि माझे जीवन मुस्लिम म्हणून जगायचे आहे. मी शफीन जहाँची पत्नी आहे, ज्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे”
असं म्हणत या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली. सुप्रीम कोर्टाने मग हदियाच्या बाजूने निर्णय देत तिचं लग्न वैध ठरवलं.
पूर्ण भारतभर चर्चलेल्या या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटना पहिल्यांदा हायलाईट झाली होती.
२०१७ मध्ये या प्रकरणाचा तपास करताना NIA ने हदियाचं कन्व्हर्जन PFI ने घडवून आणलं होतं. पुढे २०१८ मध्ये हदिया केसमध्ये कोणतीही जबरदस्ती नसल्याचं म्हटलं होतं. मात्र PFIने हदिया केसमध्ये उभा केलेल्या पैशाच्या पाठिंब्याची जोरदार चर्चा झाली होती . PFIच्या नेत्यांच्या शब्दात सांगायचे तर
”हादिया प्रकरणातील लढाईसाठी, एकाच शुक्रवारी केवळ १५ मिनिटांत, पीएफआयने मशिदीसमोर उभे राहून ८० लाख रुपये उभे केले होते ”
कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबचा वाद सुरू झाल्यानंतर PFI पुन्हा चर्चेत आली आहे. हिजाब बंदीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांना इन्फ्लुएन्स करणं आणि राजकीय फायद्यासाठी जातीय अशांतता निर्माण केल्याचा आरोप या संघटनेवर आहे. या वादात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या करण्यात त्यात विश्व हिंदू परिषद (VHP) आणि भाजपच्या काही नेत्यांनी यासाठी पीएफआयला जबाबदार धरले होते.
महाराष्ट्रातही मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमरावती इथं झालेल्या दंगलीबद्दलच्या पोलिसांच्या अहवालताही PFIचं नाव होतं.
२९ऑक्टोबर रोजी ‘पीएफआय’ चे सदस्य त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचेल होते. पीएफआयचं नाव या आधीही अनेक वादात सापडलं आहे. २०१७च्या हदिया लव्ह जिहादच्या प्रकरणापासून याची सुरवात झाली.
- त्यानंतर २०१९मध्ये श्रीलंकेतील इस्टर बॉम्बस्पोट्स ज्यात २५० पेक्षा जास्त नागरिक मारले गेले होते तेव्हा NIA ने PFIच्या आठ पेक्षा जास्त कार्यलयांवर धाड टाकली होती.
- २०१९मध्येच मंगलोरी मधील अँटी CAA आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसाचारात पण PFI च्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती.
- २०२०च्या दिल्लीतील दंग्यांमध्ये उमर खालिद हा PFI च्या टच मध्ये होता असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं होतं.
- उत्तरप्रदेशमधल्या हाथरास बलत्कारच्या घटनेनंतर PFI वर युपी सरकराने देशद्रोहाची कलम लावलं होतं.
- पुन्हा २०२० मध्ये उघडकीस आलेल्या केरळमधील गोल्ड स्मगलिंग केसमध्ये पण PFI ची लिंक असल्याचं NIA ने म्हटलं होतं. NIA च्या सूत्रांनुसार स्मगल केलेलं गोल्ड PFI ला फंडिंग करण्यासाठी वापरण्यात येत होतं.
त्यामुळं PFI ला बॅन करावं अशी मागणी अनेकदा झाली आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की सरकार पीएफआयवर बंदी घालण्याच्या “प्रक्रियेत” आहे, परंतु अजून तरी बॅन लागला नाही.
यापूर्वी पीएफआयवर सिमीचेच दुसरे रूप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. २००२ ते २००३ दरम्यान मुंबईत झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटांसह अनेक दहशतवादी घटनांमध्ये सिमीचा हात होता. २००६ मध्ये तीन संघटनांच्या विलीनीकरणानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अधिकृतपणे अस्तित्वात आली. यामध्ये केरळमधील नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट (NDF), कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी (KFD) आणि तामिळनाडूच्या मनिथा नीथी परसाई (MNP) यांचा समावेश होता.
पीएफआयचे यापैकी अनेक संस्थापक सदस्य सिमीचे नेते होते.
यामध्ये पीएफआयचे माजी अध्यक्ष आणि वर्तमान उपाध्यक्ष इएम अब्दुल रहिमन (१९८२ ते १९९३ पर्यंत सिमीचे सरचिटणीस) आणि SDPI चे अध्यक्ष इ अबूबकर (१९८२ ते १९८४ पर्यंत सिमीचे केरळ राज्य अध्यक्ष) यांचा समावेश आहे. पी कोया पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या संस्थापकांपैकी एक आहेत तेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) चे माजी सदस्य होते.
पीएफआयचे नेते मात्र हे आरोप फेटाळून लावतात…
सिमीवर बंदी घालण्याआधी १९९३ मध्ये त्यांची पूर्वीची संघटना एनडीएफची स्थापना झाली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. एनडीएफ आणि सिमी या दहा वर्षांपासून समकालीन संघटना होत्या पण नंतर सिमी बंद झाली. दोघांच्या विचारसरणीही वेगळी होती.
पी कोया पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या संस्थापकांपैकी एक आहेत ते सांगतात
”सिमीचा असा विश्वास होता की इस्लाम हा भारताच्या समस्यांवर एकमेव उपाय आहे, परंतु आमचा असा विश्वास होता की भारत हा अनेक धर्म असलेला देश आहे. सिमीच्या विचारांना आम्ही कधीही समर्थन दिलेले नाही.”
तसेच भारतातातील धर्मांध आणि हिंदुत्ववाद्यांचा सामना करण्यासाठी आणि संविधानाच्या मूल्यानुसार भारताला एकसंध ठेवण्यासाठी पीएफआयची स्थापना झाल्याची त्यांचे नेते सांगतात. पीएफआयकडून अनेक समाजउपयोगी कार्यक्रमही घेतले जातात असं संघटनेकडून सांगण्यात येतं.
पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम यांच्या मते, संपूर्ण भारतात चार लाख पीएफआय कॅडर आहेत आणि त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ते सांगतात ,
”पक्षाच्या समर्थक आणि सहानुभूतीची संख्या “लाखो” मध्ये आहे जे “कार्यक्रमांना” उपस्थित राहतात परंतु संघटना सतत रडारवर असल्याने सदस्यत्व घेण्यास कचरतात. महाराष्ट्रात पण या संघटनेचे जाळे आहे.”
Flag Hoisting in Maharashtra #PopularFrontDay #SaveTheRepublic @PFI_Maharashtra pic.twitter.com/5HeAaWzTd4
— Popular Front of India (@PFIOfficial) February 17, 2022
PFI चं स्वतःच कॅडर आहे. नवीन भरती झालेल्यांना सहभागी झाल्यानंतर सहा महिन्यांनी पाच दिवसांच्या नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहावे लागते. त्यात त्यांच्यामध्ये घटनात्मक आणि कायदेशीर जागरूकता तसेच व्यक्तिमत्व विकास आणि संस्थात्मक व्यवस्थापनाचे शिक्षण देण्यात येतं.
तथापि, तपास यंत्रणांचा दावा आहे की, पीएफआय कॅम्पमध्ये चालणारे वर्ग दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देतात.
त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे २०१३ मध्ये कन्नूरमधील नरथ येथे सापडलेली शस्त्रे. पीएफआयच्या सदस्यांना शस्त्रे आणि देशी बॉम्ब वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा आरोप एनआयएने केला होता, तर संघटनेने ते योग शिबिरांमध्ये प्रशिक्षण देत असल्याचे म्हटले होते. २०१६ मध्ये, न्यायालयाने २१ PFI आणि SDPI कार्यकर्त्यांना शस्त्रे आणि दारूगोळा बाळगणे, गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी छावण्या चालवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते.
त्यामुळे आता एवढ्या सगळ्या वादात सापडल्यानंतर पीएफआयवर येत्या काळात बंदी लागणार का हे येणाऱ्या काळातच कळेल.