पण भिडू, बदामाच्या राजाला मिशी का नसते?

विकेंड आलाय, पोरांना उन्हाळ्याची सुट्टी पण लागलीये . म्हंटल चला आता टाईमपास करू. तर समोर दिसले पत्ते. पत्ते हातात घेतले पण ….

 कॅटच्या 52 पत्त्यांचे निरीक्षण करून एक संशोधन पुढे आले,

पत्त्यांच्या कॅटमध्ये सगळ्या राजांना मिशी असते फक्त बदामाच्या राजाला सोडून.

किलवर इस्पिक चौकट च्या राजांना आकडेबाज मिशी असते पण बिचाऱ्या बदाम राजाला फक्त दाढी असते पण मिशी नसते. त्यातही त्याने आपल्या डोक्यात तलवार खुपसलेली दिसते. अस का? काय आहे या मागची हिस्ट्री?

लगेच या सायंटिस्ट लोकांनी बोल भिडूला कामाला लावलं. आम्ही पण शोध घेतला आणि एक मज्जेशिर माहिती समोर आली.

या पत्त्यांच्या कार्ड्स चा शोध शेकडो वर्षा पूर्वी लागलाय. आपल्या कोरोना रोगाप्रमाणे पत्ते देखील चीन मध्ये निर्माण झाले अस म्हणतात. मग व्यापाऱ्यांनी हा खेळ जगभरात नेला. भारतात सुद्धा गंजिफाच्या स्वरूपात पत्ते खेळले जात होते.

तेराव्या शतकात अरबांनी हा खेळ युरोपमध्ये नेला. तिथे इटली, स्पेन, जर्मनी, फ्रेंच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तो खेळला जाऊ लागला. प्रत्येक ठिकाणच्या पद्धतीप्रमाणे कार्ड वरच्या चित्रात ढाल तलवार गुलाब वगैरे दिसत होते. कोणी याचा वापर खेळण्यासाठी तर कोणी जुगारासाठी तर कोणी भविष्य सांगण्यासाठी करू लागलं.

रिकामटेकड्या भिडूनी संशोधन करून या खेळात सुधारणा करत आणली. जोकर आला, इटलीतल्या पत्त्यांमध्ये राणी दिसू लागली.

याच काळात युरोपमधील सर्वात महत्वाची घटना घडली ते म्हणजे फ्रान्सचा राजकुमार आणि इंग्लंडची राजकुमारी यांच लग्न. या लग्नामुळे या दोन्ही राजसत्ता एकत्र आल्या. अनेक वर्षांचे युद्ध थांबले. एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टीची देवाण घेवाण झाली. यातच होते फ्रेंच पत्ते.

फ्रेंच पत्त्यांच्या कॅट मध्ये 52 कार्ड्स होते. एक्क्या पासून ते राजा पर्यंत चौकट, इस्पिक, किलवर आणि बदाम अशी चार प्रकारची पाने होती. त्यातही किलवर आणि इस्पिक काळ्या रंगाची तर चौकट आणि बदाम लाल.

आता मेन विषय राहिला बदाम राजाच्या मिशीचा.

त्याकाळी राजाला मिशाअसणे हे पुरुषार्थाचे लक्षण मानले जाई. बदामच्या राजाची सर्वात फेमस दंतकथा अशी की फ्रांसच्या राजाला चार मुले होती. त्यातल्या तीन राजकुमारांना मिशी होती आणि एकाला नव्हती, तोच हा बदामाचा राजा.

तो गुलछबु होता पण आपल्या इतर भावांप्रमाणे पराक्रमी होता. कोणतंही काम करताना डोक्यापेक्षा हृदयाने विचार करायचा म्हणून त्याला बदाम हे चिन्ह मिळालं.

आता ही आहे दंतकथा ! खरं कारण हे नसण्याची जास्त शक्यता आहे.

या पत्त्यांच्या चारही राजांना युरोपच्या इतिहासातील महान राजांची नावे देण्यात आली आहेत. इस्पिकचा राजा डेव्हिड, चौकटचा राजा सीझर, किलवरच राजा म्हणजे अलेक्झांडर उर्फ सिकंदर आणि बदामाचा राजा म्हणजे चार्ल्स.

आठव्या शतकात फ्रान्सचा राजा झालेला चार्ल्स पराक्रमी होता. अख्ख्या युरोपचा पहिला सम्राट म्हणून त्याला ओळखलं जातं. तो प्रेमळ आणि दयाळू होता. त्याच्या स्मरणार्थ बदामाच्या राजाला त्याचे नाव देण्यात आले.

पण गंमत म्हणजे या किंग चार्ल्स ला मिशी होती. एवढंच काय सुरवतीच्या काळातील पत्त्यांमध्ये बदाम राजाला सुद्धा मिशी होती.

इंग्लंडमधल्या लाकडी छापखाण्यात तयार होत होते. या पत्त्यांच्या छापामध्ये कालौघात काही दोष आले आणि

त्यातूनच बदामाच्या राजाची मिशी गायब झाली आणि त्याच्या हातातील कुऱ्हाडीचा निम्मा भाग दिसेनासा होऊन तो डोक्यात खुपसल्याप्रमाणे वाटू लागला.

King of Hearts Ruen pattern comparison

इंग्लंडने जगावर राज्य केलं. त्यातूनच हे पत्ते जगभरात पसरले. आज जर्मनी असो की परभणी सगळी कडे हेच पत्ते खेळले जातात. एवढी वर्ष कधी आपण पत्त्यांकडे लक्ष देऊन बघितलं नाही. आज फावल्या वेळाच्या निमित्ताने बदाम राजा आणि त्याचा इतिहास शोधता आला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.