हुकूमशहा बनायची प्रक्रिया म्हणजे देशाच्या जनतेला राष्ट्रवादी भावनेवर एकत्र करणं : टागोर

अलीकडच्या काळात भारतात देशद्रोही आणि राष्ट्रविरोधी हे शब्द राजकारणाचा आणि समाजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला जेव्हा अटक करण्यात आली होती,

त्यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला तसा आजतागायत आहे. याच शब्दांच्या आधारे अनेकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. देशभक्ती, राष्टवादी याबद्दल कट्टरता समाजात रुजत असल्याचं दिसत आहे. 

यामागे राजकारणी नेत्यांचा मोठा रोल आहे. कारण राष्ट्रवाद या मुद्याला घेऊन राष्ट्र-राज्य या संकल्पनेखाली प्रबळ नेते उदयास येत असतात. 

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जेव्हा राष्ट्र-राज्य ही संकल्पना प्रथम पश्चिमेत विकसित होत होती आणि सामूहिक अस्मितेखाली लोक संघटित होत होते, तेव्हाच ‘राष्ट्रवाद’ हा शब्दही उदयास आला. आधी राष्ट्रवादाच्या मदतीने लोकांना जोडण्याचा प्रयत्न झाला मात्र राष्ट्र-राज्य आणि राष्ट्रवाद यांच्या संयोगातून १९व्या आणि २०व्या शतकात मोठा विध्वंस झाला होता.

या राष्ट्रवादाला रवींद्रनाथ टागोरांचा साफ नकार होता.

त्यांनी पाश्चात्त्य देश आणि जपानचे अनुभव समजून घेऊन भारतात राष्ट्रवाद उदयाला येण्यापूर्वीच जगाला त्याच्या धोक्यांविषयी चेतावणी दिली होती आणि १९१६-१७ च्या दरम्यान जपान आणि अमेरिकेत जाऊन ‘राष्ट्रवाद’ या विषयावर अनेक महत्त्वाची व्याख्यानं दिली होती.

विसाव्या शतकात जपानने ज्या प्रकारे सामाजिक आणि आर्थिक घडामोडी घडवल्या, ते पाहून टागोर खूप प्रभावित झाले. जपानचं कौतुक करताना ते म्हणाले, “जपान एकाच वेळी जुना आणि नवाही आहे. त्यांना पूर्ववैभवाच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे.”

परंतु जपानमधील राष्ट्रवादाचे धोके त्यांनी जेव्हा सांगितले तेव्हा तिथल्या जनतेला ते आवडले नाहीत. अमेरिकेतही त्यांच्या शब्दाला विरोध झाला.

असं असलं तरी हे देखील खरं आहे की, टागोर हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी भारतीयांमध्ये देशभक्ती जगवणारं गीत लिहिलं होतं. बंगालमधून आलेल्या टागोरांच्या ‘जन-गण-मन’ या आपल्या राष्ट्रगीता शिवाय राष्ट्रवादाची अभिव्यक्ती निरर्थक ठरते.

मात्र त्यांच्या राष्ट्रवादाच्या व्याख्येला भारतीयांनी किती समजून घेतलं? त्यांची विचारसरणी स्वीकारली का? हा मूळ प्रश्न आहे. 

“राष्ट्रवाद समाजाला होणारी क्रूर महामारी, आजार आहे” असं टागोरांनी म्हटलं होतं. तर ‘मी देशभक्तीला मानवतेवर विजय मिळवू देणार नाही’ असं त्यांचं म्हणणं होतं.

त्यांना हे प्रथम जाणवलं १९०५ साली.

१९०५ मध्ये बंगालच्या फाळणीमुळे भारतातील सामूहिक ओळख बळकट झाली. त्यावेळी टागोरांसह बंगालमधील अनेक विचारवंत स्वदेशी आंदोलनात सहभागी झाले. फाळणीच्या निषेधार्थ टागोरांची गाणी सर्वसामान्य लोक गाऊ लागले होते, पण यामुळे जेव्हा हळूहळू हिंसाचार वाढला तेव्हा टागोरांनी त्यापासून स्वत:ला दूर केले.

टागोरांना त्याच वेळी भारतातील राष्ट्रवादाचे धोके समजले होते, असं म्हणता येईल.

टागोरांनी नेहमीच मानवी, नैसर्गिक आणि सामाजिक सभ्यतेच्या मूल्यांवर भर दिला आणि आधुनिकतेला बुद्धीच्या स्वातंत्र्याशी जोडले. त्यांच्या लेखनातून हे नेहमी दिसून येतं.

तसंच टागोरांच्या लेखनात राष्ट्रवादाचा तीव्र विरोध देखील दिसतो. १९०८ मध्ये भारतीय वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांच्या पत्नी अबाला बोस यांना लिहिलेल्या पत्रात टागोर म्हणाले होते की,

“देशभक्ती हा आपला शेवटचा आध्यात्मिक आधार असू शकत नाही. माझा आश्रय मानवतेचा आहे. मी हिऱ्याच्या किंमतीला ग्लास विकत घेणार नाही आणि जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मानवतेवर देशभक्तीचा विजय होऊ देणार नाही.”

टागोरांच्या ‘घरे बायरे’ या कादंबरीतही हीच अभिव्यक्ती दिसून येते.

“राष्ट्रवाद ही एक क्रूर महामारी आहे, जी सध्याच्या काळातील मानवी जगावरच परिणाम करत नाही तर तिची नैतिक ऊर्जा देखील घेत आहे,” असं टागोर म्हणाले होते.

यावरून त्यांनी महात्मा गांधींवर देखील टीका केली होती. 

रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधींचा खूप आदर करायचे, पण त्याचबरोबर राष्ट्रवाद, तर्कशुद्धता, विज्ञान, आर्थिक-सामाजिक विकासाच्या कार्यपद्धती या विषयांवर दोघांमध्ये खोलवर मतभेद होते.

मानवाने शोधून काढलेली राष्ट्राची कल्पना हे बेशुद्धीचं सर्वांत शक्तिशाली औषध आहे. त्याच्या धुराच्या प्रभावाने सगळा देश नैतिक विकृतीची जाणीव न ठेवता, स्वार्थ आणि कर्तृत्वाचा दु:खद कार्यक्रम पद्धतशीरपणे राबवू शकतो. त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे जर मानवाला याची जाणीव करून दिली गेली तर तो  धोकादायक मार्गाने सूड घेण्याचा विचारही करू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं.

हुकूमशहा बनायची प्रक्रिया मुळात देशाच्या जनतेला राष्ट्रवादी भावनेवर एकत्र करणं, याच्या यशावर अवलंबून असते. सध्या समाजात थोडं बारकाईने आणि सद्सद्विवेक बुद्धीने बघितलं तर समजून येईल.

ज्या राष्ट्रवादाला टागोरांनी नेहमीच विरोध केला आहे, त्याला आज जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी आपल्या राजवटीचं मुख्य हत्यार बनवलं आहे. हा संपूर्ण जगाला आणि मानवतेला धोका आहे.

सिडनी विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक जोन कीन यांनी काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसमधील एका लेखात ‘जगभरात लोकशाही कशी मरत आहे’, याचं वर्णन केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी अनेक संकेत लेखात व्यक्त केले आहेत.

टागोरांनी नेहमीच राष्ट्रवाद आणि मानवतेच्या आदर्शांना देशापेक्षा जास्त स्थान दिलं. राष्ट्रवाद आणि त्याची कट्टरता मानवतेच्या विचारला संपुष्ठात आणते, असं त्यांचं म्हणणं होतं.

तर अल्बर्ट आईन्स्टाईनने देखील राष्ट्रवादाची व्याख्या ‘लष्करशाही आणि आक्रमकतेसाठी आदर्शवादी तर्कशुद्धीकरण’ अशी केली आहे.

या सगळ्या गोष्टींवर थोडा विचार करून सध्याच्या परिस्थितीत मार्ग निवडण्याची गरज आहे. राष्ट्रवाद की मानवता हे दोन पर्याय आहे, बस एक काय तो निवडायचा आहे!

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.