या एका शब्दामुळे राजस्थानातलं वातावरण बदलू शकतं..!

राजस्थानमधलं वातावरण काय आहे..?

तुमच्या आमच्या सारख्या, महाराष्ट्रात बसून राजस्थानच्या हवेचा अंदाज लावणाऱ्यांना सध्या तरी काँग्रेस असच उत्तर मिळत आहे. तस “काँग्रेस” हे उत्तर गुजरातमध्ये देखील मिळालं होतं, पण शेवटच्या दहा दिवसात वारं फिरलं होतं. राजस्थानचं देखील वारं फिरेल का? की आत्ता आहे असच राहिलं ते निकाल लागल्यानंतर समजेलच.

पण सध्याच्या वातावरणात असा एक मुद्दा समोर येतोय, जो गाजला तर भाजपसाठी फायद्याचा आणि कॉंग्रेससाठी अडचणीचा देखील ठरू शकतोय.

या मुद्याची सुरवात होते ती, एका शब्दापासून “गोरखधंदा”.

भाजपने राजस्थान निवडणुकांसाठीचा ‘राजस्थान गौरव संकल्प पत्र’ नावाचा आपला जाहीरनामा काल प्रकाशित केला. राजस्थानमध्ये जर पुन्हा भाजप सत्तेवर आला, तर ‘गोरख धंदा’ या शब्दावर बंदी घालण्यात येईल. त्यासाठी कायदा बनवला जाईल. कायद्याचं पालन न करणाऱ्यास कठोर शिक्षा दिली जाईल, अशी घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली.

आत्ता भाजपने इतका फोकस एका शब्दाभोवती नेमका का केला आहे? अस काय आहे या शब्दात?

‘गोरखधंदा’ शब्दाचं मूळ.

गोरखधंदा या शब्दाचं मुळ गोरखनाथ या नाथ संप्रदायाशी आहे. गोरखनाथ यांच्या अनाकलनीय गुढ साठी हा शब्द वापरण्यात आल्याचे पुरावे सादर केले जातात. नाथ संप्रदायातील गुरू गोरखनाथ यांच्या गुरु गोरखनाथ नावातील ‘गोरख’ आणि त्यांच्या अबोध कारनाम्यांसाठी ‘धंदा’ असे हे २ शब्द एकत्रित येऊन ‘गोरखधंदा’ हा शब्द तयार झाला आणि पुढे गूढ कृत्यांसाठी तो वापरण्यात येऊ लागला.

डॉ. पितांबर दत्त बडत्थवाल यांनी गुरु गोरखनाथ यांच्या रचनांचं संकलन आणि संपादन करून ‘गोरख वाणी’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. मानवामधील देवत्वाच्या शोधासाठी गुरु गोरखनाथ यांनी एवढे मार्ग सांगितले की त्यांच्याच भक्तांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली की काय चूक, काय बरोबर..? काय करायचं आणि काय नाही करायचं…?

ही गोष्ट परत अबोधतेकडे घेऊन जाते. अनाकलनीय होऊन जाते.

गोरखपंथीय साधू आपल्या हातातील काठीने जमिनीवर एक चक्र बनवत असत. त्या चक्राच्या बरोबर मधोमध एक छिद्र करण्यात येत असे आणि त्यात माळेइतक्या आकाराचा दोर टाकण्यात येत असे. त्यानंतर छिद्रामध्ये टाकलेली ही दोर एका मंत्राच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असे.

हा प्रकार देखील अतिशय अद्भुत आणि अनाकलनीय होता. म्हणूनच या क्रियेला ‘गोरख धंदा’ किंवा ‘धंधारी’ म्हंटल जायला लागलं. त्यामुळेच अनाकलनीय गोष्टींसाठी ‘गोरख धंदा’ हा शब्द प्रचलित व्हायला लागला.

अनाकलनीय गोष्टींसाठी ‘गोरख धंदा’ शब्द इतका लोकप्रिय झाला की उर्दूत देखील तो त्याच अर्थाने वापरला जायला लागला. उर्दूमध्ये आपल्याला ख्यातकीर्त उर्दू गायक आणि शायर नुसरत फतेह अली खान यांनी आपल्या गायनाने अजरामर केलेली नाज ख्यालवी यांची ‘तुम एक गोरख धंदा हो’ नावाची सुप्रसिद्ध कव्वालीच सापडते.

या कव्वालीमध्ये नाज ख्यालवी यांनी थेट ईश्वरासाठीच ‘गोरख धंदा’ हा शब्द वापरलाय.

कभी यहाँ तुम्हें ढूँढा, कभी वहाँ पहुँचा,
तुम्हारी दीद की खातिर, कहाँ कहाँ पहुँचा,
ग़रीब मिट गए, पामाल हो गए, लेकिन
किसी तलक ना तेरा आज तक निशां पहुँचा,
हो भी नहीं और हर जां हो…
तुम एक गोरखधंधा हो… तुम गोरखधंधा हो…

ईश्वराच्या, अल्लाहच्या, जीजसच्या लीला इतक्या अनाकलनीय आहेत की भक्तांना त्यांचा अंदाजच येत नाही. देवाला शोधण्यासाठी माणूस काय-काय म्हणून नाही करत..? पण माणसाला देव काही मिळत नाही. तो कुठेच नाही आणि त्याचं अस्तित्व सर्वत्रच आहे. असा हा देव, ईश्वर म्हणजे एक अनाकलनीय गूढ आहे. ‘गोरख धंदा’ आहे, असं काहीसं नाज ख्यालवी आपल्या या रचनेत म्हणतात.

साक्षात देवासाठी वापरलेल्या ‘गोरख धंदा’ शब्दाची भाजपला नेमकी अडचण काय..?

माध्यमांमध्ये ‘गोरख धंदा’ हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो. त्यामुळे अनेक वाईट कृत्यांसाठी माध्यमे ‘गोरख धंदा’ हाच शब्द वापरतात. खरं तर या गोष्टीशीही भाजपला काहीच देणं-घेणं नाही. भाजपला खरा रस आहे तो नाथ संप्रदायाला मानणाऱ्या मतदारांना खुश ठेऊन त्यांची मते मिळविण्यात.

गुरु गोरखनाथ यांना मानणाऱ्या नाथ संप्रदायाचा पश्चिम राजस्थानात मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे.

विशेष म्हणजे या संप्रदायाचे महंत आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राजस्थानमधील मतदारांमध्ये सध्याच्या वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात लाट आहे. अशा वेळी प्रचाराचा लोलक सरकारच्या कामाऐवजी थेट धार्मिक आणि भावनिक मुद्यांवर सरकवण्यासाठीचं भाजपचं सर्वात मोठं आशास्थान म्हणजे योगी आदित्यनाथ.

योगी आदित्यनाथांनी नाथ संप्रदायाचा प्रभाव असलेल्या आणि मुस्लीम बहुल प्रदेशात मोठ्या प्रमाणात सभांचा धडाका लावलाय. त्यामागे मुख्य कारण हेच की नाथ संप्रदायाची मते मिळवणे.

त्यासाठी माध्यमांमध्ये नकारात्मक अर्थाने वापरला जाणाऱ्या ‘गोरख धंदा’ शब्दामुळे गुरु गोरखनाथ यांचा अपमान होत असल्याचे कारण देत, पुन्हा सत्तेत परतलो तर या शब्दावर कायद्याने बंदी आणण्यात येईल, असं आश्वासन भाजपकडून देण्यात येतंय.

नाथ संप्रदायाची मते टिकविण्यासाठी भाजप केवळ ही एवढीच घोषणा करून थांबलेली नाही, तर नाथ संप्रदायावर आश्वासनांची खैरात करताना, गुरु गोरखनाथ यांच्या चरित्राचा राजस्थानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात येईल, गोरखनाथ यांच्या सन्मानार्थ राजस्थानमध्ये एक राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल, गोरखनाथ यांच्या संदर्भातील साहित्याची लायब्ररी उभारण्यात येईल, पुरातन माथांचा जीर्णोद्धार करण्यात येईल, यांसारख्या आश्वासनांचा भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समावेश केलाय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.