त्या स्पर्धेमुळे आजही सचिन तेंडुलकरवर पैशासाठी खेळल्याचा आरोप होतो…
सध्या कॉमनवेल्थ गेम्स सुरू आहेत, वेटलिफ्टिंगमध्ये भारतानं मजबूत पदकं मिळवली आहेत, ज्युडोमध्येही यश मिळालंय. आता बॅडमिंटन आणि ॲथलेटिक्समध्येही भारताची ताकद दिसून येईलच. पण या सगळ्यात यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिलांच्या क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. भारताच्या पोरींनीही दणका उडवत पाकिस्तानला अगदी किरकोळीत हरवलं.
आता कॉमनवेल्थमध्ये महिलांचं क्रिकेट आहे, तर पुरुषांचं का नाही ?
याचं उत्तर सांगण्यात येतंय ते म्हणजे मेन्स क्रिकेट टीमचं व्यग्र वेळापत्रक आणि आधीच सुरू असलेल्या भरपूर स्पर्धा. पण दुसऱ्या बाजूला आणखी एक कारण सांगण्यात येतंय, ते म्हणजे पहिल्यांदा जेव्हा कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश होता तेव्हा अनेक प्रमुख खेळाडूंनी विश्रांती घेतली. त्यात लोकांसाठी प्रमुख आकर्षण असणाऱ्या भारत-पाकिस्तानचा वेगळाच राडा होता.
एकतर या दोन्ही टीम्स वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होत्या, त्यात एका बाजूला कॉमनवेल्थ गेम्स असताना दुसऱ्या बाजूला भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये सहारा कपचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळं काही प्लेअर्स इकडे आणि काही प्लेअर्स तिकडे अशी अवस्था दोन्ही टीम्सशी झाली.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळणाऱ्या भारतीय संघात सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासारखे दिग्गज होते, पण आपला कॅप्टन होता अजय जडेजा. भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये सपाटून मार खाल्ला, अँटिग्वा विरुद्धची मॅच पावसामुळं रद्द झाली, कॅनडा विरुद्ध भारतानं खुंखार कमबॅक केलं आणि त्यांचा फक्त ४५ रन्समध्ये ऑलआऊट काढला.
पण तोवर वेळ निघून गेली होती, भारत स्पर्धेतून बाहेर पडला. विजेतेपदासाठी फेव्हरिट्स असणाऱ्या भारताला साधी ग्रुप स्टेजही पार करता आली नाही.
कॉमनवेल्थ गेम्समधल्या पराभवाचं दुःख विसरायला, पाकिस्तान विरुद्धच्या सहारा कपमध्ये जिंकणं गरजेचं होतं.
त्या टीमचा कॅप्टन अझरुद्दीन होता, गांगुली, द्रविड, आगरकर, श्रीनाथ असे तगडे खेळाडूही होते. १९९७ चा सहारा कप भारतानं जिंकला होता. पण यंदाच्या वर्षी मात्र गणित गंडलं. पाच मॅचची सिरीज होती, त्यातली पहिली मॅच भारतानं जिंकली, पण दुसऱ्याच मॅचमध्ये कार्यक्रम गंडला भारत हरला. तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा पराभवच हाती आला. पाकिस्तानला आता फक्त एक मॅच जिंकायची होती आणि सहारा कप त्यांचा झाला असता.
आता बीसीसीआयनं एक चाल खेळायचं ठरवलं, तिकडं कॉमनवेल्थमध्ये भारताची टीम हरली होती, त्यामुळं तिकडचे गडी उरलेल्या दोन मॅचेस खेळायला येऊ शकत होते. तसं नियोजन करायला घेतलं आणि पाकिस्ताननं कांगावा करायला सुरुवात केली.
भावकीच्या भांडणात लोकं अडून बसतात, तसली नाटकं त्यांनी केली. त्यांचं म्हणणं होतं, ‘असं सिरीज सुरू असताना तुम्ही टीम नाही बदलू शकत.’
बीसीसीआय काय किरकोळ नव्हती, त्यांच्याकडच्या चाणक्यांनी दोन प्लेअर्सच खेळवायची स्कीम टाकली, पाकिस्तानवाले हो म्हणून बसले.
हे दोन प्लेअर्स होते अजय जडेजा आणि स्वतः सचिन तेंडुलकर.
पण खरा मॅटर असा होता की, कॉमनवेल्थ गेम्स झाल्यावर हे दोघंही नॉट रिचेबल झाले होते. सुट्टीला गेलेला अजय जडेजा तरी सापडला, पण खंडाळ्यामध्ये असलेल्या सचिनशी काही कॉन्टॅक्ट झाला नाही. तोवर जडेजानं चौथी मॅच खेळली पण भारतानं मॅच आणि कप दोन्ही घालवला. पाचव्या मॅचमध्ये मात्र सचिन आला, त्यानं ७७ रन्स मारले. अझरुद्दीननं सेंच्युरी केली मात्र आमिर सोहेलमुळं भारतानं तीही मॅच गमावली.
आधी कॉमनवेल्थ गेम्स आणि मग सहारा कप दोन्हीकडे हरलेल्या भारतीय टीमवर चहूबाजूंनी टीका होऊ लागली. लोकांना साहजिक प्रश्न पडला, कॉमनवेल्थ गेम्सला किरकोळ टीम्स होत्या, तर सचिनला तिकडं का पाठवलं ? आणि सचिन खंडाळ्यात आहे, सुट्टीवर गेलाय हे बीसीसीआयला कसं काय माहीत नव्हतं ?
याबद्दल एक थेअरी सांगण्यात येते, ती घुमते मार्क मॅस्कारेनस या माणसाभोवती…
मार्क हा क्रिकेटमधला डोकेबाज माणूस, आपल्या जगमोहन ‘डॉलर’मियांना तोड म्हणून क्रिकेट जगतात हा एकमेव माणूस होता. क्रिकेटमध्ये खोऱ्यानं पैसा आहे आणि सचिन तेंडुलकर नावाचा उगवता तारा हा पैसा आपल्याला देऊ शकतो हे त्यानं ओळखलं होतं.
याच मार्कची कंपनी ‘वर्ल्डटेल’ सोबत सचिनचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तर सहारा कपचं आयोजन केलेलं, इंटरनॅशनल मॅनेजमेंट स्कुल म्हणजेच आयएमजीनं. वर्ल्डटेल आणि आयएमजी हे एकमेकांचे स्पर्धक या दोघांमधल्या राड्याचा फटका बीसीसीआयलाही अनेकदा बसत होता. आयएमजीचं बीसीसीआयसोबत वर्षाला ४ लाख डॉलर्सचं काँट्रॅक्ट होतं. सचिन सहारा कपमध्ये खेळावा म्हणून त्यांच्याकडून बीसीसीआयवर प्रेशर होतं, खेळला नाही तर कॉन्ट्रॅक्ट जाण्याची भीतीही.
दुसऱ्या बाजूला एक थेअरी सांगण्यात येते की, मार्क आणि वर्ल्डटेलकडून सचिननं सहारा कप खेळायला जाऊ नये, म्हणून प्रेशर होतं. सचिनचं कॉन्ट्रॅक्ट मोठं होतं, त्याची आर्थिक घडीही नुकतीच बसत होती आणि अशावेळी वर्ल्डटेलच्या विरोधात जाणं त्याला महागात पडलं असतं. त्यामुळे सचिन सहारा कपला लवकर गेला नाही आणि भारताला पाकिस्तानकडून हरावं लागलं, असं सांगितलं जातं.
आता पाहायला गेलं तर हि फक्त एक लोकांमध्ये चर्चा असलेली थेअरी आहे, काय खरं काय खोटं हे मार्क, सचिन आणि बीसीसीआयवाल्यांना माहिती. पण एक मात्र आहे, ज्या पाचव्या मॅचमध्ये सचिन आला त्या मॅचमध्ये भारताची बॅटिंग पूर्ण गंडली होती. अझरुद्दीनच्या साथीनं सचिन पाय रोवून उभा राहिला, आणि त्याच्या ७७ रन्समुळं भारताला २५० चा आकडा पार करता आला.
त्याची ती ७७ रन्सची जिगरबाज इनिंग हे त्यानं पैशासाठी खेळण्याच्या आरोपांना दिलेलं सडेतोड उत्तर होतं…
हे ही वाच भिडू:
- १७ वर्षांनंतर स्टीव्ह बकनरने चुकीच्या निर्णयाबद्दल सचिन तेंडुलकरची माफी मागितली होती…
- जडेजा १७५ रन्सवर असताना डाव घोषित झाला आणि नॉटआऊट १९४ रन्सवाला सचिन आठवला…
- मॅकग्रा इतका खडूस बॉलर होता, की खुद्द सचिननं त्याला शिवी घातली होती…