‘छत्रपती उदयनराजे’ अन् ‘संभाजीराजे छत्रपती’: नावाच्या अगोदर आणि नावानंतर छत्रपती असं का ?

सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चेत असलेलं नाव म्हणजे संभाजीराजे छत्रपती. राज्यसभेची निवडणूक, उमेदवारी, नव्या पक्षाची घोषणा या सगळ्याच मुद्द्यांवर रोज वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळतायत. पण संभाजीराजे छत्रपती चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. संभाजीराजे छत्रपती असोत किंवा उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे वंशज अनेकदा बातम्यांच्या केंद्रस्थानी असतात.

उदयनराजे हे सातारा गादीचे वंशज आणि संभाजीराजे हे कोल्हापूर गादीचे वंशज.

मात्र या दोघांमध्ये हा एकमेव फरक नाही. उदयनराजे आपलं नाव ‘श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले’ असं लावतात, तर संभाजीराजे आपलं नाव ‘युवराज संभाजीराजे छत्रपती’ असं लावतात. दूसरी गोष्ट म्हणजे उदयनराजे भोसले अस आडनाव आपल्याला ऐकायला मिळतं पण संभाजीराजे भोसले अस आडनाव कधीच ऐकायला का मिळत नाही..

छत्रपती आणि भोसले या दोन नावाची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत..

पण त्याआधी सातारा गादी आणि कोल्हापूर गादीचा इतिहास जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे.

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणीसाहेबांनी पन्हाळ्याला आपल्या मुलाला गादीवर बसवलं आणि धाडसानं राज्यकारभार पाहू लागल्या. त्यावेळी राणी येसूबाई आणि शंभूपुत्र शाहू औरंगजेबाच्या कैदेत होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची सुटका झाली आणि थोरले शाहू स्वराज्यात परतले.

ताराराणीसाहेबांचं सैन्य आणि शाहूंचं सैन्य यांच्यात युद्ध झालं. त्यानंतर ताराराणींची सत्ता जाऊन कोल्हापूर आणि सातारा अशा दोन गाद्या तयार झाल्या.

सातारा गादीवर असलेले उदयनराजे हे छत्रपती शिवरायांचे १२ वे वंशज असणाऱ्या छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचे चिरंजीव, तर शिवेंद्रसिंहराजे हे प्रतापसिंहराजेंचे बंधू अभयसिंहराजे भोसले यांचे चिरंजीव. दुसऱ्या बाजूला कोल्हापूर गादीवर शाहू छत्रपती आहेत, त्यांचे थोरले चिरंजीव म्हणजे युवराज संभाजीराजे छत्रपती आणि धाकटे चिरंजीव म्हणजे युवराज मालोजीराजे छत्रपती.

दोन्ही छत्रपतींच्याच गाद्या, मग नावात फरक कसा? हा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे,

असं सांगण्यात येतं की, छत्रपती शिवरायांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांचं नावही बदललं, कारण ते आता चक्रवर्ती सम्राट झाले होते. राज्याभिषेकानंतरच्या कागदपत्रांमध्ये शिवरायांचा उल्लेख ‘राजाशिवछत्रपती’ असा केला जाऊ लागला. यात राजा ही पदवी झाली, शिव हे शिवरायांचं नाव झालं आणि छत्रपती हे आडनाव.

पुढे हीच परंपरा कायम झाली. राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक घटनेनंतर छत्रपती घराण्यातील व्यक्तींचा उल्लेख करताना भोसले आडनावाचा उल्लेख कुठेही केला गेला नाही.

यामागचं कारण जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं इतिहास अभ्यासक केतन पुरी यांच्याशी संपर्क साधला, 

ते सांगतात, 

“क्षत्रिय कुळातला सर्वोच्च वंश म्हणजे छत्रपती. सर्वसामान्य लोकांमध्ये भोसले आडनावाचे अनेक जण असू शकतात, पण छत्रपती हे सर्वश्रेष्ठ वंश दाखवणारं द्योतक आहे. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कुठल्याही कागदपत्रात भोसले आडनावाचा वापर केलेला नाही. कोल्हापूर गादी असेल किंवा सातारा गादी असेल, दोन्ही गाद्यांनी कधीच भोसले हे आडनाव लावलं नव्हतं.”

छत्रपती आडनावाबाबत इतिहासात आणखी एक रंजक माहिती मिळते.

राजर्षी शाहू महाराजांचे चिरंजीव युवराज राजाराम महाराजांचा विवाह झाला बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातीशी. युवराजांच्या विवाहानिमित्त स्वतः शाहू महाराज, करवीर संस्थानचे सरदार आणि नागरिक बडोद्याला गेले होते. 

तिथं त्यांना समारंभानिमित्त छापण्यात आलेल्या विशेष निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या. या पत्रिकांमध्ये राजाराम महाराजांचा उल्लेख ‘राजाराम भोसले’ असा करण्यात आला होता.

हे पाहून कोल्हापुरातून आलेले वऱ्हाडी चांगलेच खवळले, त्यांनी थेट शाहू महाराजांकडे तक्रार केली की, ‘भोसले हे आडनाव घराण्यात कधीच वापरण्यात आलेलं नाही, या आडनावानं तुमचा उल्लेख करणं, हा छत्रपती घराण्याचा अपमान नाही का?

साहजिकच शाहू महाराजही चिडले. त्यांनी नाराजी व्यक्त केली, या घटनेनंतर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनाही समजलं की, यांनी भोसले आडनावाचा त्याग करुन बराच काळ झालेला आहे, त्यांना भोसले असं संबोधणंही चुकीचं आहे.

त्यांचं जे छत्रपती आडनाव आहे तसंच त्यांना संबोधण्यात यावं.

मग छत्रपती हे आडनाव कोल्हापूर गादीचे वंशज वापरत असताना, सातारा गादीचे वंशज का वापरत नाहीत, असाही साहजिक प्रश्न पडतो.

१८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचं राज्य ताब्यात घेतल्यानंतर, प्रतापसिंह छत्रपती यांना साताऱ्याच्या गादीवर बसवण्यात आलं. त्यांचा कागदपत्रांमधला उल्लेख ‘क्षत्रियकुलावतंस श्रीराजा प्रतापसिंव्ह छत्रपति’ असा आढळतो.

१८३९ मध्ये इंग्रजांनीच प्रतापसिंह छत्रपतींना पदच्युत केलं, त्यांच्याजागी त्यांचे बंधू शहाजीराजे गादीवर बसले. शहाजीराजे छत्रपतींच्या मृत्यूनंतर मात्र इंग्रजांनी दत्तक विधान नामंजूर केलं आणि १८४९ मध्ये सातारा संस्थान खालसा करण्यात आलं.

केतन पुरी सांगतात,

“इंग्रजांनी दत्तक विधान नामंजूर केल्यानंतर सातारा गादी खालसा केली आणि कागदपत्रांमध्ये इंग्रजांनी या गादीवर जे कोणी छत्रपती बसतील त्यांचा उल्लेख भोसले असा करायला सुरुवात केली. मग ते प्रतापसिंहराजे असतील किंवा उदयनराजे असतील.

यामुळं सातारा गादीच्या वंशजांमध्ये भोसले आडनाव लावण्याची प्रथा सुरु झाली. १८४९ च्या आधी म्हणजेच संस्थान खालसा होण्याच्या आधी सातारा गादीवरही छत्रपती हेच आडनाव वापरलं जात होतं.”

”दुसऱ्या बाजूला कोल्हापूर संस्थान मात्र कधीच खालसा झालं नाही. त्यामुळे ते आजतागायत छत्रपती हेच आडनाव लावत आहेत. करवीर संस्थानात कुठल्याच कागदपत्रांमध्ये भोसले हे आडनाव वापरण्यात आलेलं नाही. शाहू महाराजांचा उल्लेख शाहू छत्रपती, राजाराम महाराजांचा राजाराम छत्रपती किंवा विजयीभव राजे राजाराम छत्रपती असाच आढळतो.”

मग उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रराजे, हे आपल्या नावाच्या आधी छत्रपती ही उपाधी का लावतात? 

तर त्याचं कारण सांगितलं जातं की,  ”छत्रपती हे मराठ्यांच्या सर्वोच्च पराक्रमाचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळाचे वारसदार असल्याची ती निशाणी आहे. छत्रपती घराणं आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची निशाणी अजूनही मिरवतात आणि मोठ्या अभिमानानं ती आपल्या नावाआधी लावतात.

युवराज संभाजीराजे छत्रपती एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते,

“माझं नाव आजही पाहिलं, तर संभाजी शाहू छत्रपती असंच आहे. भोसले हे कुळ नाव असलं, तरी जेव्हा शिवराय छत्रपती झाले, तेव्हापासून पिढ्यान पिढ्या सगळ्यांना छत्रपतीच संबोधलं गेलं. भोसले हे फार क्वचित वापरलं गेलं, रेकॉर्ड्समध्येही छत्रपती हाच उल्लेख आढळतो. थोडक्यात हे आडनावच तयार झालं.”

या सगळ्या कारणांमुळे सातारा गादीचे वंशज नावाच्या आधी छत्रपती ही उपाधी लावतात, तर कोल्हापूर गादीचे वंशज नावाच्या पुढे छत्रपती हे आडनाव लावतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.