म्हणूनच महाभारतातल्या “संजय” प्रमाणे ठाकरे कुटूंबासाठी “संजय” राऊत महत्वाचे आहेत

शिवसेनेत बंड झालं, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यात नवं सरकारही स्थापन झालं. या सगळ्या सत्तानाट्याच्या कालावधीत एक नाव मात्र प्रचंड चर्चेत राहिलंय ते म्हणजे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत.

बंडखोर आमदारांनी आपली भूमिका मांडताना संजय राऊत यांना लक्ष्य केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार गुलाबराव पाटील यांनीही विधानसभेतल्या भाषणात नाव न घेता संजय राऊतांवर टीका केली. अनेक आमदारांनी शिवसेनेतल्या या बंडाला संजय राऊतच जबाबदार आहेत, असा आरोप उघडपणे केला होता.

त्यानंतर पात्राचाळ प्रकारात त्यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. पण या सगळ्या राड्यात शिवसेना नेतृत्व मात्र राऊत यांच्यामागं ठामपणे उभं होत.

जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की,

आम्ही सर्व शिवसेना कुटुंबाकडून त्यांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, संजय राऊत डरपोक नाहीत. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला गेला, तरीही त्यांनी गद्दारी केली नाही. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. तरीही ते घाबरले नाहीत. आज राजकीय नेत्यांवर कारवाई होत आहे, उद्या सत्याचा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांवरही कारवाई होऊ शकते.

 याच पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी संजय राऊत इतके महत्त्वाचे का आहेत, हे पाहुयात.

१) शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांशी असलेला समन्वय –

संजय राऊत हे बाळासाहेबांच्या फळीतले शिवसैनिक. राऊतांचे वडील शिवसैनिक, त्यांच्याच प्रभावामुळे ते बाळासाहेबांच्या संपर्कात आले. राऊतांना नोकरीसाठी शिफारसपत्रही बाळासाहेबांनीच दिलं होतं. पुढं वयाच्या २९ व्या वर्षी बाळासाहेबांनी संजय राऊतांकडे सामनाच्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी दिली. बाळासाहेबांची भाषा आणि विचार त्यांनी आत्मसात केले होते.

त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रं गेल्यानंतर अनेक नेत्यांचं सेनेशी बिनसलं. मात्र उद्धव आणि राऊत यांची भट्टी जमून आली. दोघांचे सूर जुळून आले आणि एका बाजूला बाळासाहेबांच्या फळीतले शिवसैनिक सत्ताकेंद्रापासून लांब होत असताना संजय राऊत यांचं महत्त्व अबाधित राहिलं.

शिवसेनेत नेतृत्वाची तिसरी पिढी आली ती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे. अनेक बंडखोर आमदारांनी आपल्या नाराजीचं कारण सांगताना, आदित्य यांच्या शिवसेनेत वाढलेल्या महत्त्वावर बोट ठेवलं. राऊत यांनी मात्र पहिल्यापासून आदित्य यांच्याशी जुळवून घेतलं. अगदी प्रचारापासून ते सभांपर्यंत त्यांनी आदित्य यांचं कौतुक केलं.

थोडक्यात शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांसोबत राऊत यांनी आपले संबंध जोपासले आणि काळानुरूप हे संबंध आणखी घनिष्ट केले.

२) संसदीय अनुभव –

संजय राऊत सध्या राज्यसभेचे खासदार आहेत, ही त्यांची खासदारकीची चौथी टर्म. २००४ पासून ४ वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले. प्रत्येक वेळी त्यांना राज्यसभेत मिळालेली संधी त्यांचं पक्षातलं वजन अधोरेखित करतेच. पण सोबतच राऊत यांच्याकडे संसदीय कामकाजाचा तब्बल १८ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे केंद्रीय राजकारण आणि दिल्लीतल्या घडामोडींशी राऊत चांगलेच परिचित आहेत.

३) महाविकास आघाडीतला समन्वय –

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती म्हणून निवडणूक लढवलेल्या शिवसेना-भाजप युतीचे संबंध विस्कटले. संजय राऊत यांनी पुढाकार घेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी समन्वय साधला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असं  महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

सरकार स्थापनेनंतरही संजय राऊत यांनी शरद पवारांशी जवळीक कायम ठेवली. महाविकास आघाडीची बरीचशी सूत्रं पवारांकडूनच हलवली जात असताना, राऊत आणि त्यांच्यातला समन्वय शिवसेनेच्या फायद्याचा ठरला होता. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेदरम्यान राऊत राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले होते.

सोबतच सरकार स्थापने आधी आणि नंतरही, दोन्ही पक्षांशी बोलणी करायला सेनेकडून राऊत यांचंच नाव अग्रक्रमावर असायचं. जेव्हा नामांतराच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि मंत्र्यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी अडचणीत आली तेव्हाही राऊत यांनी किल्ला लढवला होता.

त्यामुळं भाजपशी युती तुटल्यानंतर सेनेचं सरकार येण्यात आणि त्याच्या कार्यकाळात राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

४) एकनिष्ठा –

शिवसेनेत याआधी ३ मोठी बंड झाली, २०१९ च्या निवडणुकांआधी मोठ्या प्रमाणावर आऊट-गोईंग झालं, त्यानंतर सत्ता आल्यावरही अनेक आमदारांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आणि त्याचा परिणाम म्हणून बंड झालं. कित्येक आमदारांच्या बंडामागे ईडीचा ससेमिरा असल्याचं बोललं जातंय, त्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत असतानाच संजय राऊत यांची ईडी चौकशीही झाली, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली, मात्र त्यांनी शिवसेना सोडली नाही किंवा आपल्या मुद्द्यांवरुन माघार घेतली नाही.

बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे, शिवसेना नेतृत्व कायम निष्ठावान शिवसैनिकांचे दाखले देत असतं. याच निष्ठेमुळे सामान्य शिवसैनिकांपुढे एक नॅरेशन सेट करायला शिवसेना नेतृत्वासाठी संजय राऊत महत्त्वाचे ठरतात.

५) भाजपला थेट अंगावर घेणं आणि बेडरपणे भूमिका मांडणं –

खरंतर २०१४ ला जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपचं बिनसलं होतं. त्यानंतरही युती करत राज्यात सत्ता स्थापन झाली, मात्र या दोन्ही जुन्या मित्रांमध्ये सारंकाही आलबेल नव्हतं. तेव्हाही संजय राऊत यांनी भाजपला थेट अंगावर घेतलं. शिवसेना जेव्हा राजीनाम्याची तयारी दाखवत होती, तेव्हाही राऊतच आक्रमक होते.

पुढं जाऊन राज्यात जेव्हा अर्णब गोस्वामी विरुद्ध शिवसेना, कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असे वाद रंगले, तेव्हाही सेनेकडून केवळ राऊत यांनीच बाजू मांडली होती. जेव्हा भाजप नेत्यांकडून शिवसेना नेत्यांवर आरोप होत होते, तेव्हाही रोज सकाळच्या पत्रकार परिषदेतून राऊतांनी हल्लाबोल करणं सुरू ठेवलं.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे संयमी म्हणून ओळखले जातात, पण बहुतांश शिवसैनिकांना ठाकरी शैलीतलं बोलणं आणि आक्रमक बाणा जास्त पसंत असतो. अशावेळी संजय राऊत पक्षासाठी ही भूमिका निभावतात.

आत्ताही बंडखोर आमदारांबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी काहीशी संयमी भूमिका घेतली असली, तरी राऊतांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात कसूर ठेवलेली नाही. त्यामुळं बदलत्या शिवसेनेत जुनं रुप टिकवण्यासाठी राऊत मोलाचे ठरतात.

६) राष्ट्रीय पातळीवरची भूमिका –

संजय राऊत हे राज्यसभेतले शिवसेनेचे गटनेते आहेत. संसदेसोबतच राष्ट्रीय राजकारणातही पक्षाची भूमिका मांडण्याचं काम संजय राऊत करतात. देशात जेव्हा शेतकरी आंदोलन पेटलं होतं, तेव्हा संजय राऊत यांनी थेट दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात जाऊन पाठिंबा दर्शवला होता.

शिवसेनेनं जेव्हा उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिकडच्या प्रचाराची धुरा राऊतांनी सांभाळली होती. पश्चिम बंगाल आणि गोव्यात सेना निवडणूक लढवणार याची घोषणाही त्यांनीच केली होती.

शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर युपीएतल्या समावेशाबाबतची भूमिका सांगण्याची धुराही राऊतांकडेच होती. थोडक्यात शिवसेना मोदी विरोधी गटात गेल्यापासून केंद्रीय राजकारणात संजय राऊतांनी पक्षाची खिंड लढवली आहे. मग ती आपल्या बोलण्यातून असेल किंवा विरोधकांची मोट बांधण्यातून असेल.

सध्याही शिवसेना अडचणीत असताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबतच संजय राऊत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं आणि मेळावे घेण्याचं काम करतायत. सत्ताधाऱ्यांशी सामना करत त्यांनी शिवसेनेला सत्तेत आणण्यात त्यांचा वाटा मोठा होता.

आज पक्षात फूट पडलेली असतानाही त्यांनी सेना नेतृत्वाची साथ सोडलेली नाही.

उलट आधीच्याच फॉर्ममध्ये राऊतांची बॅटिंग सुरू आहे. त्यामुळेच अस्तित्वाचा प्रश्न असताना, सामना ४० विरुद्ध १ असला तरी संजय राऊत शिवसेना नेतृत्वासाठी महत्त्वाचे आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.