फ्रेंच पोलीसानं घोळ घातला नसता तर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली नसती

दिवस होता ८ जून १९०९ चा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांना नाशिकचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सन यानं काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली होती. याचा बदला  घेण्यासाठी त्यांच्या मित्रांनी जॅक्सन याच्या हत्येची योजना आखली.

२९ डिसेंबर १९०९ ला जेव्हा मग जॅक्सन त्याचा सन्मानार्थ आयोजित केलेल्या संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगाला हजर झाला तेव्हा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनची बंदुकीने गोळ्या घालून हत्या केली.

जॅक्सनच्या हत्येचा जेव्हा तपास चालू झाला तेव्हा कान्हेरेंनी वापरलेली ब्राउनिंग पिस्तूल इंग्लंडवरून आयात केल्याचं उघड झालं. इंग्लंडमध्ये त्यावेळी शिक्षण घेणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांनीच ही  पिस्तूल भारतात निर्यात केल्याचा आरोप पोलिसांनी लावला. त्यासाठी सावरकरांच्या अटकेचं वॉरण्ट थेट लंडनला पाठवण्यात आलं. सावरकरांच्या सहकाऱ्यांनी सावरकरांवरील खटला इंग्लंडमध्येच चालवावा यासाठी प्रयत्न चालू केले.

मात्र त्यावेळी ब्रिटनमध्ये राज्य सचिव असेलेला चर्चिल सावरकरांना भारतात पाठवण्यावर ठाम होता.

शेवटी एक आदेश जाहीर झाला त्यात चर्चिलच्या मनासारखच झालं होतं. सावरकरांना भारतात पाठण्याचा निर्णय झाला होता.

१ जुलै १९१० ला सावरकरांना घेऊन ‘मोरिया’ हे विशेष जहाज इंग्लंडवरून निघालं.

८ जुलै १९१० ला हे जहाज फ्रान्समधील मार्सेली शहराजवळ आलं.

फ्रान्समध्ये असलेल्या आपल्या मित्रांच्या मदतीने सावरकर पलायन करू शकतात अशी माहिती जहाजावरील ब्रिटिश अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.

त्यामुळं ब्रिटिश अधिकारी अजूनच सतर्क झाले. पण त्यांचा सावरकरांची चपळता आणि बुद्धिमत्ता यांच्यापुढं निभाव लागणार नव्हता. ब्रिटिश अधिकाऱ्यांना गुंगारा देत सावरकरांनी टॉयलेटच्या लहानश्या खिडकीमधून थेट समुद्रात उडी टाकली. कडक पाहऱ्यातून ब्रिटिश अधिकाऱ्यांना चकवा देत सावरकरांनी बोट सोडली होती. बोटीवर एकच गोंधळ उडाला. सावरकरांच्या दिशेने बंदुकीच्या गोळ्या झडू लागल्या. मात्र त्या सावरकरांचा वेध घेऊ शकल्या नाहीत. गोदावरीच्या डोहात पट्टीचं पोहणं शिकलेल्या सावरकरांचं टार्गेट आता होतं मार्सेलीचा किनारा. 

एकदा का फ्रेंच किनारा गाठला कि फ्रेंचांची फ्रेंचांची जमिनीचीच नाही तर कायद्याचीही हद्द चालू होते हे सावरकर जाणून होते. 

बॅरिस्टर असलेल्या सावरकरांनी याचाच फायदा घ्यायाचं ठरवलं होतं. जवळपास एक किलोमीटर पोहत सावरकर किनाऱ्यावर पोहचले. ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून त्यांचा पाठलाग चालूच होता. मार्सेली बंदरात पोहचल्यानांतर सावरकर जिवाच्या आकांताने धावत सुटले. ब्रिटिश अधिकारी त्यांचा चोर! चोर! म्हणत त्यांचा पाठलाग करत होते.

चोर पळत आहेत हे ऐकून बंदरातले फ्रेंच कर्मचारी आणि पोलिसही अलर्ट झाले. आधी पोहणं आणि मग धावणं यामुळं सावरकर पुरते थकले होते. त्यातच त्यांना आता बंदरावरील कर्मचाऱ्यांनी घेरलं होतं. एका फ्रेंच पोलिसानं झडप टाकून सावरकरांना पकडलं.

सावरकर मात्र या घटनेनं विचलित झाले नव्हते. सगळं त्यांनी केलेल्या प्लॅननुसार चालू होतं. त्यांनी आपण एक राजनैतिक कैदी असून आपल्याला पकडून फ्रेंच न्यायालयासमोर हजर करावं अशी विनंती  केली. पण इथेच गोंधळ झाला. सावरकर हे सगळं सांगत होते इंग्लिशमध्ये आणि त्या फ्रेंच पोलिसाला इंग्लिशचा गंध पण नव्हता. त्यानं सरळ सावरकरांना पकडून त्यांचा पाठलाग करणाऱ्या ब्रिटिश पोलिसांच्या हवाली केलं. 

सावरकर फ्रान्सच्या मातीवर उतरले होते आणि फ्रान्सच्या संविधानातील ‘ राईट्स ऑफ मॅन’ नुसार राजकीय आश्रय घेण्याचा सावरकरांचा प्लॅन होता.

मात्र हा आश्रयचा मुद्दा न्यायालय ठरवणार होतं. फ्रेंचच्या त्या पोलीस अधिकाऱ्याचं काम फक्त सावरकरांना न्यायायासमोर हजर करणं होतं. मात्र या भाऊंनी टिपिकल पोलीस करतात तसं परस्परच मामला रफा-दफा करून सावरकरांना ब्रिटिश पोलिसांकडे देऊन टाकला होतं.

पोलिसाच्या या वागण्यामुळं फ्रांस सरकारला जोरदार टीकेचा सामना करावा लागला होता. 

सावरकरांना ब्रिटिश सरकारच्या ताब्यात देण्याचा विरोध करणाऱ्यांमध्ये कार्ल मार्क्स यांचा नातू आणि फ्रान्स मधील एक मोठे समाजवादी नेते जीन लॉरेंट फ्रेडरिक लोंगुएट यांचाही समावेश होता. 

पुढे जाऊन फ्रेंच सरकारला सावरकरांना ब्रिटिशांनी फ्रांसकडे सोपवावं अशी विनंतीही करावी लागली होती. पुढे जाऊन हा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात देखील उभा राहिला.

 सावरकरांना भारतात आणल्यानंतर आजच्याच दिवशी म्हणजे २४ डिसेंबर १९१०मध्ये ब्रिटिश सरकारनं त्यांना २५ वर्षांची पहिली आणि त्यांनतर अजून एक २५ वर्षांची अशी टोटल ५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. मात्र त्या दिवशी त्या फ्रेंच पोलिसानं गोंधळ घातला नसता तर परिस्तिथी वेगळी असती.  

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.