शरद पवारांना 71 च्या पुढे कधीच का जाता आलं नाही..

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. याची सुरवात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून केली. मात्र शरद पवारांवर टिका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले शरद पवारांनी यापूर्वी देखील महाराष्ट्र पिंजून काढलाय, मात्र ते ६० च्या पुढे कधी गेले नाहीत.

शरद पवारांना राज्याचेच नाही तर देशाचे नेते म्हणून गणलं गेलं. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांच नाव येत, अस असतानाही महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाला विशेषत: शरद पवारांना एकहाती वर्चस्व का निर्माण करता आलं नाही. 

एकहाती त्यांनी 145 चा जादुई आकडा का गाठता आला नाही, विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची संख्या सर्वाधिक 71आमदारांपुरतीच मर्यादित का राहिली? 

असे अनेक प्रश्न नेहमीच विचारले जातात, विशेषत: 2014 आणि 2019 साली भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढवून 126 व 105 आमदारांचा आकडा गाठला, अस असताना शरद पवारांना मात्र कधीच तीन आकडी संख्या प्राप्त करता आला का नसेल याबाबत प्रश्न विचारले जातात.. 

राष्ट्रवादीला कधीच तीन आकडी आमदार निवडूण आणता आले नाहीत यामागे अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारणांचा आढावा आपण घेवू.. 

१) बंड केलं पण व्यापकता आणता आली नाही… 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना शरद पवारांनी 1999 च्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केली होती. त्यापूर्वीच्या दशकात शरद पवार केंद्रात मात्तब्बर नेते झाले होते. केंद्रात संरक्षणमंत्री, कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीत केलेली दावेदारी या गोष्टी त्यांना देशात सेटल करत गेल्या. 

यातूनच सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्द्यावरून शरद पवारांनी कॉंग्रेसविरोधात बंड केलं. देशपातळीवरून व्यापक जनमत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीमागे उभा राहिल असा अंदाज शरद पवारांचा होता.

पण हा अंदाज काहीच दिवसात फोल ठरला. कारण पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नेते सोडून शरद पवारांना देशभर व्यापक संग्रह निर्माण करता आला नाही. मुळचे कॉंग्रेसी लोकं कॉंग्रेसमध्येच राहिल्याने  पवारांच बंड एका मर्यादेच्या पुढे विस्तारलं नाही, पवारांनी देखील विदेशीपणाचा मुद्दा सोडून कॉंग्रेससोबत जोडून घेतल्यानं कॉंग्रेसमधील नाराज गटाने राष्ट्रवादी पक्षाचा पर्याय कधी स्विकारला नाही परिणामी नवीन नेते पक्षात आणण्यासाठी पवारांपुढे सेना-भाजप शिवाय पर्याय नव्हता. 

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपुर्वीच पक्षात आले होते, त्यानंतरच्या काळात धनंजय मुंडेसारखे नेते राष्ट्रवादीत आले पण या पक्षप्रवेशात पवारांना व्यापकता आणता आली नाही.. 

2) प्रादेशिक पक्षांची मर्यादा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना ही मुळात राष्ट्रीय मुद्द्यावर झाली असली तरी तारिक अन्वर, संगमा यांच्यापलीकडे पक्ष पोहचला नाही, पर्यायी राष्ट्रवादी पक्ष टेक्निकली राष्ट्रीय पक्ष असला तरी पक्षाची गणना प्रादेशिक पक्ष म्हणूनच राहिली. इतर राज्यात जसे की तामिळनाडू द्रमुक व अण्णा द्रमुक अशा दोनच पक्षात मतदार विभागले गेले मात्र महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी असे दोन प्रादेशिक पक्ष व कॉंग्रेस-भाजप असे दोन राष्ट्रीय पक्ष अशा एकूण चार पक्षांमध्ये मतदार विभागले गेले.

पर्यायी मतदारांचा एक मोठ्ठा शेअर प्रत्येक पक्षाला गमवावा लागला. म्हणूनच शिवसेनेची सर्वाधिक आमदारांची संख्या 73 (1995) पर्यन्त, भाजपची सर्वाधिक संख्या 126(2014), कॉंग्रेसची सर्वाधिक संख्या (राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर) 75 पर्यन्त (1999) पोहचू शकली. देशात मोदींची लाट असूनही व चारही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणूका लढूनही भाजपला एकहाती 145 चा आकडा गाठता आला नाही.

याचं मुख्य कारण म्हणजे मतदारांची होणारी विभागणी हेच दिसून येतं. एखाद्या राज्यात फक्त दोन राष्ट्रीय पक्ष असतात उदा ; गुजरातमध्ये कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी. एखाद्या राज्यात दोन्ही प्रादेशिक पक्ष असतात उदा ; तामिळनाडूमध्ये द्रमुक विरुद्ध अण्णा द्रमुक तर एखाद्या राज्यात प्रादेशिक पक्ष विरोधात राष्ट्रीय पक्ष असू शकतो उदा ; दिल्लीत आप विरुद्ध भाजप..

3) राष्ट्रवादी पक्षावरचा पश्चिम महाराष्ट्राचा टॅग पवारांना पुसता आला नाही

राष्ट्रवादी पक्ष हा मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रा पुरता मर्यादित असल्याची टिका वारंवार करण्यात येते. 2019 ची आकडेवारी पहायची झाली तर राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी पश्चिम महाराष्ट्रातून 27 आमदार आहेत. मराठवाड्यातून 8, ठाणे-कोकण विभागातून 5 तर उत्तर महाराष्ट्रातून 7 आमदार निवडून आणता आले आहेत.

दरवर्षीची आकडेवारी पाहिल्यास निम्म्याहून अधिक संख्या ही पश्चिम महाराष्ट्रातून विजयी होणाऱ्या आमदारांची दिसते. याऊलट भाजपच्या आमदारांची संख्या ही मराठवाड्यातून 16, विदर्भातून 29, पश्चिम महाराष्ट्रातून 20 अशी राहिलेली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात भाजप नावाला देखील नव्हता, पण मातब्बर नेत्यांचा पक्षप्रवेश करून (विखे-मोहिते-महाडिक-भोसले-पाचपुते) त्याचसोबत नवनेतृत्व निर्माण करून (पडळकर-नरेंद्र पाटील-निंबाळकर-चंद्रकांतदादा पाटील) भाजपने पश्चिम महाराष्ट्रात आपलं स्थान पक्क केलं. 

शरद पवारांना मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर विशेषत: एकूण 62 आमदार देणाऱ्या विदर्भात वेगळी स्ट्रेटेजी आखता आली नाही. पर्यायी पवारांवर पश्चिम महाराष्ट्राचा टॅग आणखी गडद होत गेला व त्यातून पश्चिम महाराष्ट्रात पक्ष ताकदवर झाला मात्र इतर विभागातला पक्षाला होल्ड निर्माण करता आला नाही.

4) तिन्ही पक्षांना विरोध करत धोरण आखणं..

कॉंग्रेस विरोधात पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली.  त्यानंतर कॉंग्रेससोबत आघाडी झाली पण कॉंग्रेस व राष्ट्रवादीचं राजकारण नेहमीच जिरवाजिरवीचं राहिलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेमुळे कॉंग्रेसच्या पक्षवाढीवर मर्यादा आल्या. त्यामुळेच कॉंग्रेसमधील स्थानिक नेत्यांना विशेषत: जे शरद पवारांना होल्ड निर्माण करू शकतात अशा नेत्यांना कॉंग्रेसने बळ दिलं.

विलासराव देशमुख असोत की पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांनी आपल्या कृतीतून आणि निर्णयातून असे प्रयत्न केले. अगदी राष्ट्रवादी फार्मात असताना सिंचनाची श्वेतपत्रिका आणण्याची घोषणा करत पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीचे पंख छाटण्याचा कार्यक्रम केला. साहजिक शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा आहे अशी आशयाची विधाने केली.

एका बाजूला कॉंग्रेससोबतच राजकारण व दूसऱ्या बाजूला भाजप सेना विरोधातलं राजकारण यातून पक्षवाढीवर मर्यादा येत गेल्या. युती किंवा आघाडीताल कोणताही एक पक्ष वाढणार असेल तर दूसरा पक्ष अडचणीत येणार हे निर्विवाद सत्य होतं. कॉंग्रेस मोठ्ठी झाली असती तर राष्ट्रवादी संपली असती. ज्याप्रमाणे आज भाजप वाढीचा सर्वात मोठ्ठा तोटा शिवसेनेला भोगावा लागत आहे.

अशा वेळी पक्षाच अस्तित्व टिकवून, आहे ही सदस्यसंख्या पक्की करण्यावर पवारांनी भर दिला, त्यामुळेच कितीही लाटा आल्या तरी जयंत पाटील, भुजबळ यांच्यासारखे नेते टिकू शकले, पुन्हा उभारू शकले.

5) नवनेतृत्व निर्माण करणं अशक्य झालं..

जुन्या जाणत्या नेत्यांना बळ देत असताना भाकरी फिरवणं महत्वाच असत, मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आर.आर.पाटील यांच्यासारखेच खूपच कमी नेते पहिल्या फळीपर्यन्त पोहचू शकले. अजित पवार, भुजबळ, मोहिते पाटील, तटकरे, आर.आर.पाटील अशा नेत्यांना बळ देत असताना त्यांची जागा घेवू शकतील असे नेते तयार करण्याकडे पाठ फिरवण्यात आली.

एका प्रवाहाच असही मत आहे की या नेत्यांना ताकद देवून त्यांच्याकडून नवीन नेत्यांची फौज निर्माण करण्याची खात्री शरद पवारांना होती. मात्र अजित पवार सोडून बाकीच्या नेत्यांना अशी फळी फक्त आपल्या जिल्ह्यापूरती किंवा एखाद्या दूसऱ्या मतदारसंघापूरतीच करता आली. 

या फळीकडे देखील आबांच्या गटातला, दादांच्या गटातला अस पाहिलं गेल्याने वरच्या नेत्याप्रमाणे खालच्या नेत्याचा पसंतीक्रम ठरत गेला. मात्र वरच्या नेत्यांना रिप्लेस करण्याची ताकद अशा नेत्यांमध्ये कधीच निर्माण होवू शकली नाही.

6) शहरी भागातून नेतृत्व निर्माण करता आलं नाही..

शरद पवारांसहीत राष्ट्रवादीचे बरेच नेते हे ग्रामीण राजकारणाचा बाज असणारे होते आहेत. जयंत पाटील यांचा उल्लेख अभ्यासू म्हणून केला जात असला तरी त्यांच नेतृत्व देखील ग्रामीण भागातील हूशार नेते असच केलं जातं. 2019 ची आकडेवारी सांगायची झाल्यास मुंबई विभागातील एकूण 36 आमदारांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला फक्त 1 जागा आली आहे.

याऊलट भाजपकडे भाजपकडे 16, शिवसेनेकडे 14 जागा आहेत. शहरी भागातले प्रश्न, शहरी भागातले मुद्दे राष्ट्रवादीने प्रभावीपणे मांडले नाही. शरद पवारांच नेतृत्व देखील ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा झाले मात्र याच कालखंडात म्हणजे 1999 ते 2019 च्या काळात मोठ्या प्रमाणात शहरीकड झालं. शहरी अस्मिता निर्माण झाल्या. त्याचं प्रतिनिधित्व करू शकेल असे नेते राष्ट्रवादी पक्षाला निर्माण करता आले नाहीत. परिणामी 36 आमदार देणाऱ्या मुंबई विभागासह पुणे शहर, नागपूर शहर अशा शहरी भागात राष्ट्रवादीला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.