या नेत्याच्या नियोजनबद्ध कारवायांमुळे पवारांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं

शरद पवारांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. पवारांनी कॉंग्रेस का सोडली?

असा प्रश्न विचारला असता हमखास उत्तर मिळतं ते म्हणजे पवारांना सोनिया गांधी विदेशी असल्याने त्याचं नेतृत्त्व मान्य नव्हतं.

काही अंशी ही गोष्ट खरी असली तरी सोनिया गांधी याचा विरोध हे पुर्णपणे सत्य नसल्याचं तत्कालिन राजकिय घडामोडी पाहिल्यानंतर दिसून येत.

शरद पवारांना कॉंग्रेसमधून कोणत्या कारणासाठी बाहेर पडावं लागलं हे पाहण्यासाठी या घडामोडींच्या पूर्वीच्या घडामोडी पहाव्या लागतात.

वाजपेयींच सरकार कोसळल्यानंतर एच.डी. देवेगौडा भारताचे पंतप्रधान झाले होते. संयुक्त आघाडीच्या या सरकारला कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. सिताराम केसरी तेव्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र जेव्हा देवेगौडा पंतप्रधान झाले तेव्हा सिताराम केसरींच्या राजकीय अपेक्षा उंचावल्या. माझ्या पाठिंब्याने एखादा पंतप्रधान होत असेल तर आपण का होवू शकत नाही याचा विचार सुरू झाला आणि त्याच आततायीपणातून सिताराम केसरी यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली.

सिताराम केसरी यांच्या भूमिकेमुळे संयुक्त दलाने गुजराल यांना पुढे केले. सिताराम केसरींच्या पंतप्रधान होण्याच्या प्रयत्नांवर विरजण पडले. गुजराल नवे पंतप्रधान झाले.

८ ते १० ऑगस्ट १९९७ च्या दरम्यान अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीच्या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस चे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.

सिताराम केसरी यांच्या हेकेखोर भूमिकेचा तोटा कॉंग्रेसला सहन करावा लागत होता. सिताराम केसरी यांना कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. केसरींना हटवण्याच्या मोहिमेचे शिलेदार होते ते म्हणजे,

शरद पवार, एके. एन्टनी आणि गुलाम नबी आझाद

या तिन्ही नेत्यांनी १० जनपथला जावून सोनिया गांधींची भेट घेतली. सिताराम केसरींच्या हेकेखोरीमुळे कॉंग्रेस फुटून जाण्याची चिन्हे होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी सोनिया गांधी राजकारणा सक्रिय होणं गरजेचं होतं.

त्यादृष्टीने चर्चा होवू लागल्या आणि २७ डिसेंबर १९९७ रोजी सोनिया गांधींनी आपण राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं.

११ जानेवारी १९९८ रोजी राजीव गांधी यांची जेथे हत्या झाली त्या श्रीपेरमबुदूर येथून सोनिया गांधींनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला.

5D9583DC C511 47C2 B922 0686CD1F3D8B scaled

१४ मार्च १९९८ रोजी पक्षाच्या कार्यकारणीने निर्णय घेतला व सिताराम केसरींना घरचा रस्ता दाखवण्यात आला.

१९९८ च्या निवडणुकांनंतर शरद पवार हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते झाले. पक्षाची सुत्रे या काळात सोनिया गांधींच्या हातात आली होती. १४ एप्रिल १९९९ साली अण्णाद्रमुकच्या जयललितांनी वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावात मायावती देखील वाजपेयी सरकारच्या विरोधात गेल्या व वाजपेयी सरकार अल्पमतात आले.

या वेळी एक घडामोड झाली,

ती म्हणजे वाजपेयी सरकार अल्पमतात येतात सोनिया गांधी तडकाफडकी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींना जावून भेटल्या. मात्र आपण  कोणत्याही परिस्थतीत कॉंग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचं मुलायमसिंह यादव यांनी स्पष्ट केलं आणि सोनिया गांधींच्या मनसुब्यावर पाणी फिरलं.

सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला होता तो अर्जूनसिंग यांच्या सांगण्यावरून. अर्जूनसिंग यांना माहित होतं की सोनिया गांधी यांना पतंप्रधान होता आलं नाही तर त्या आपल्या विश्वासू व्यक्तिचे नाव समोर करतील. या हेतूने अर्जूनसिंह नियोजनबद्ध रितीने डाव टाकून होते. यात सर्वात प्रमुख अडथळा होता तो शरद पवारांचा कारण शरद पवार तेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते, पक्षाच्या धोरण समितीचे अध्यक्ष व इतर पक्षांच्या आघाडी करण्याच्या समितीच्या अध्यक्षपदी होते. आपल्या वाटेतील प्रमुख अडथळा असणाऱ्या शरद पवारांच पक्षातून निलंबन करण्याच्या दिशेने ते नियोजनबद्ध कारवाया करत होते.  

त्या दृष्टीने झालेल्या कारवाया म्हणजे

१९९८ साली लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर शरद पवारांच्या अनुपस्थितीत कॉंग्रेस संसदिय पक्षाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संसदेत सदस्य नसणारा व्यक्ती देखील संसदिय नेतेपदी नियुक्त करता येवू शकतो असा निर्णय घेण्यात आला. फक्त सोनिया गांधींसाठी हा निर्णय संसदिय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोनिया गांधींकडे संसदिय नेते पद सोपवून त्यांच्याद्वारे लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवारांची “नियुक्ती” करण्यात आली.

वास्तविक शरद पवारांची लोकसभेतील कॉंग्रेस नेत्यांच्या पाठिंब्याने ही निवड होण्याची अपेक्षा असताना “नियुक्ती” करुन शरद पवारांची मानहानी करण्याचा प्रयत्न सोनिया गांधींच्या मार्फत करण्यात आला.

त्यानंतर संसदिय समित्यांसाठी पक्षसदस्यांच्या नावांची यादी देण्याची जबाबदारी शरद पवारांकडे होती. अपेक्षित यादी घेवून शरद पवार जेव्हा लोकसभेचे सभापदी जी.एम.सी. बालयोगी यांच्याकडे गेले तेव्हा यापूर्वीच कॉंग्रेसकडून यादी आल्याचं त्यांना सांगण्यात आल.

याबाबत सोनिया गांधींना विचारणा करण्यात आल्यानंतर सोनिया गांधींनी शरद पवारांना तुमच्याकडील यादी मागे घ्या अस सांगितलं.

शरद पवारांचा अधिकार डावलून परस्पर निर्णय घेणं व त्याची माहिती पवारांना होवू न देणं ही गोष्ट शरद पवारांना अपमानास्पद वाटू लागली. अस सांगण्यात येत की इथूनच सोनिया गांधींच्या विरोधात अथवा पर्यायी राजकारण उभे करण्याची तयारी शरद पवारांनी केली.

या सगळ्या घडामोडींच्या पाठिमागे अर्जूनसिंह होते. त्यांनी शरद पवारांचे इंदिरा गांधीसोबत असणारे मतभेद, महाराष्ट्रात केलेला पुलोद चा कार्यक्रम इथपासून ते राजीव गांधी व शरद पवार यांच्यात असणाऱ्या मदभेदांचा दाखला देत शरद पवार अविश्वासू असल्याचे सोनिया गांधींच्या मनात भरवले होते.

वास्तविक शरद पवारांच्या भूतकाळातील राजकारणाकडे पाहून त्यांच्याबद्दलचे हे वातावरण तयार होण्यास पुष्टी देखील मिळत गेली.

आणि अखेर तो दिवस आला.

१५ मे १९९९ रोजी पक्ष कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या सुरवातीस सोनिया गांधी यांनी एक कागद काढला व वाचून दाखवण्यास सुरवात केली.

“माझा जन्म परदेशातला असून निवडणूक प्रचाराचा हा मुद्दा झाल्यास पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल याचा विचार एकत्रित करायला हवा. भाजपने विदेशी जन्माचा विषय प्रचाराचा मुद्दा बनवलेला दिसतो. यावर प्रत्येकाने आपआपले मत स्पष्ट करावे”

ठरल्याप्रमाणे अर्जूनसिंह हे पहिला बोलू लागले, ते म्हणाले,

तुमच्या सासूबाई इंदिरा गांधी व पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर तुम्ही देश सोडून जाण्याचा विचार केला नाही. या देशाने तुम्हाला मनोमन स्वीकारले आहे. तुम्ही राष्ट्रमाता आहाता व तुम्ही नेतृत्त्व स्वीकारायला हवं.

अर्जूनसिंह या विदेशीपणाचा मुद्दा चर्चेत येणार नाही हे स्पष्ट केलं आणि चर्चेचा रोख ठरवला. सर्वांनी त्यांच्या बाजूने मुददे मांडून विदेशीपणाचा मुद्दा भाजप करू शकणार नाही असा रोख ठेवला.

मात्र पी.ए. संगमा यांनी या चर्चेला विरोध करत आपले मत प्रखरपणे मांडले. ते सोनिया गांधींच्या विश्वासातले असून देखील म्हणाले, भाजप विदेशीपणाचा मुद्दा करेल मात्र त्याविरोधात लढण्यासाठी आपण तयार असावे. शरद पवारांनी देखील संगमांची बाजू लावून धरून मुद्दा चर्चेत येईल पण त्यास विरोध करण्याची रणनिती ठरवण्याबाबत सुचना केल्या.

त्याच दिवशी बैठक आटपून शरद पवार विमानाने मुंबईला येण्यास निघाले. विमानतळावर उतरताच शरद पवारांना पत्रकारांचा घेराव पडला. तेव्हा सोनिया गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीच्या ऑफिसमोर शरद पवार, संगमा आणि तारिक अन्वर यांच्या विरोधाच्या घोषणा देत असल्याची माहिती त्यांना समजली.

यानंतर शरद पवार, तारिक अन्वर आणि संगमा यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नावाने पत्र लिहले या पत्रात विदेशी जन्माचा मुद्दा प्रचारात येईल व त्याची किंमत पक्षाला सोसावी लागेल सबब पक्षनेतेपदाचा आग्रह त्यांनी सोडावा असे लिहण्यात आले.

या पत्राच्या आधारावर शरद पवार, तारिक अन्वर आणि संगमा यांचे कॉंग्रेसमधून निलंबन करण्यात आले. या सर्व घडामोडींच्या मागे अर्जूनसिंह असल्याचे खुद्द शरद पवार देखील आपल्या आत्मचरित्रात मान्य करतात.

या घटनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.