म्हणून एकनाथ शिंदेंच्या पक्ष चिन्हाला शीख समाजाकडून विरोध केला जातोय…

सध्या राज्यात अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा आहे. इथला सामना ठाकरे गट विरुद्ध भाजप असा होत असला तरी, ही पोटनिवडणूक प्रकाशझोतात आली ती निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशामुळं. शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात असतानाच अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव दोन्ही गटांना वापरता येणार नाही असं सांगितलं.

दोन्ही गटांना नवी नावं तर मिळालीच, सोबतच ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आणि शिंदे गटाला ढाल तलवार.

या निवडणुकीत ठाकरे गटानं आपला उमेदवार उतरवला आहे आणि त्यातच समता पक्षानं ठाकरे गटाला मिळालेलं धगधगत्या मशालीचं चिन्ह आणि आपल्या पक्षचिन्हात साधर्म्य असल्याचा दावा करत कोर्टात धाव घेतली आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे गटानं आपला उमेदवार दाखल केला नसला, तरीही त्यांचं पक्षचिन्ह वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.

याचं कारण म्हणजे शीख समाजानं हे चिन्ह खालसा समाजाच्या धार्मिक चिन्हाशी मिळतंजुळतं असल्याचा दावा करत, यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे.

सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी, ‘खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतंजुळतं असल्यानं त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये.’ अशी मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं आहे.

सोबतच जर आयोगाकडून मागणी मान्य न झाल्यात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या पत्रात त्यांनी त्रिशूळ या निवडणूक चिन्हाचाही संदर्भ दिला आहे. ठाकरे गटानं चिन्हांचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करताना त्रिशूळ हा ही एक पर्याय दिला होता; मात्र धार्मिक परंपरेचं प्रतीक असल्यानं हे चिन्ह ठाकरे गटाला दिलं गेलं नाही.

गदी त्याचप्रमाणं ढाल तलवार हे चिन्ह खालसा समाजाचं प्रतीक आहे, त्यामुळे त्याचा वापर निवडणूक चिन्ह म्हणून करण्यात येऊ नये अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

पण शीख समाजाचं धार्मिक चिन्ह काय आहे ? आणि त्याचा नेमका अर्थ काय ?

शीख समाजाच्या पवित्र ध्वजाला निशाण साहिब असं म्हणतात. या ध्वजावर मधोमध निळ्या रंगात हे चिन्ह दिसतं. या चिन्हाला ‘खंडा’ म्हणतात.

अगदी मधोमध एक दुधारी तलवार असते, त्याच्यामागे एक चक्र आणि दोन्ही बाजूंनी कृपाण अशी या चिन्हाची रचना असते. थोडक्यात यात तिन्ही शस्त्र असतात. या चिन्हाचा अर्थ शीख परंपरेत सापडतो.

मधोमध असलेली दुधारी तलवार ही चांगल्या गोष्टींना वाईट गोष्टींपासून वेगळं करण्याचं प्रतीक आहे. तर चक्र हे ही शस्त्र असलं तरी ते ईश्वराचं प्रतीक आहे. या च्रकाचा वर्तुळाकार प्रारंभ आणि अंत नसलेलं देवाचं शाश्वत रुप दर्शवतं. तर या चिन्हातली दोन कृपाणं या मीर आणि पीर या तलवारी आहेत.

शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद सिंग यांनी या तलवारींचा समावेश खंडा चिन्हात केला. यातली एक तलवार अध्यात्मिक तर दुसरी तलवार राजकीय ताकदीचं प्रतिनिधीत्व करते.

शीख परंपरेत ‘देग तेघ फतेह’ सिध्दांताला महत्त्व दिलं जातं. या सिद्धांताचं प्रतीकात्मक रुप म्हणून खंडा या चिन्हाकडे पाहण्यात येतं. या सिद्धांतानुसार देग म्हणजे दान. शीख समाजात दानाची मोठी परंपरा आहे. आजही गुरुद्वाऱ्यामध्ये जात, पात, धर्म न बघता अनेकांना लंगर म्हणजेच मोफत जेवण दिलं जातं. तर तेघ म्हणजे तलवार, जे शीख समाजाच्या शौर्याचं आणि लढाऊ वृत्तीचं प्रतीक आहे. या सिद्धांताचा संदेश ‘खंडा’ या चिन्हातून प्रतीत होतो.

गुरू गोविंद सिंह यांनी १७ व्या शतकात खालसा प्रथेला सुरुवात केली. यातून शीख लष्कर नव्यानं उभारण्यात आलं. ज्यांच्यावर धार्मिक आंदोलकांपासून शिखांचं रक्षण करण्याची जबाबदारी होती.

आजही शीख परंपरेत खालसा समाजाचं महत्त्व आहे. या खालसा समाजाचं चिन्हही खंडा हेच आहे. खालसा समाजाचं रक्षण करणं आणि मदत करणं हे दुहेरी तत्वही खंडा चिन्हामधून अधोरेखित होतं.

खंडा हे चिन्ह कुठं वापरावं हे सुद्धा नमूद करण्यात आलं आहे.

शीख समाजात पगडी घालतात, त्यावर पिन म्हणून खंडाचा वापर होतो. शीख धर्माचा पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’वर ठेवण्यासाठी आणि ‘निशाण साहिब’वर ही खंडाचा वापर केला जातो. बाकी गाडी, दरवाजे, वॉलपेपर, शीख धर्माचा प्रचार करणारं साहित्य अशा गोष्टींमध्येही खंडा हा धार्मिक चिन्हाचा वापर केला जातो.

जगभरात खंडा या चिन्हाला शिखांचं अधिकृत चिन्ह म्हणून ओळखलं जातं, अगदी दिल्लीत झालेलं शेतकरी आंदोलन असेल किंवा कॅनडामध्ये झालेलं आंदोलन असेल, आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठीही विविध धर्मियांकडून याच चिन्हाचा वापर करण्यात आला होता.

साहजिकच शीख परंपरेत खंडा या चिन्हाला मोठं महत्त्व आहे. ढाल-तलवार ही युद्धात वापरली जाणारी शस्त्र आहेत, अगदी त्याच प्रमाणे खंडा तलवार, चक्र आणि कृपाण ही सुद्धा शस्त्रच आहेत. दोन तलवारी आणि मध्ये ढाल हे चिन्ह, दोन कृपाण आणि मध्ये चक्र या खंडाच्या रचनेच्या काहीसं जवळपास जातं. म्हणूनच शीख समाजाकडून ढाल तलवार या चिन्हावर आक्षेप घेतला जातोय.

पण निवडणूक चिन्ह म्हणून ढाल तलवारीला मान्यता देताना धार्मिक परंपराचा मुद्दा पुढे येतो का ? आणि निवडणूक आयोग यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.