क्लूजनरने सेमीफायनलला माती खाल्ली आणि आफ्रिकेचे चोकर हे नाव फायनल झाले.

साल होत १९९९. तेव्हाचा वर्ल्ड कप इंग्लंड मध्ये खेळला जात होता. तेव्हा स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालची ऑस्ट्रेलिया जगात नंबर वनला होती. गिलख्रिस्ट, मार्क वॉ , पोंटिंग, बेव्हन मग स्टीव्ह वॉ, टॉम मुडी, लेहमन अशी त्यांची तगडी बॅटिंग लाईनअप होती आणि बॉलिंग मध्ये मॅकग्रा, शेन वॉर्न, फ्लेमिंग वगैरे दिग्गज होते. या टीमला हरवणे अशक्य होते. फक्त एकच टीम ते करू शकत होती ती म्हणजे साउथ आफ्रिका.

वनडे रकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खालोखाल स्थान दक्षिण आफ्रिकाचं होती. हॅन्सी क्रोनियेच्या कप्टन्सी आणि बॉब वूल्मरची कोचिंग यामुळे ही टीम जगात सर्वात ताकदवान टीम पैकी एक झाली होती. गरी कर्स्टन, हर्षल गिब्ज पासून ते जक कलीस , मार्क बाउचर पर्यंत अशी जवळपास नवव्या नंबर पर्यंत त्यांची बॅटिंग लाईन अप होती. अॅलन डोनाल्ड, शाॅन पोलॉक वगैरे त्यांचे बॉलरसुद्धा भारी होते. सगळ्यात विशेष म्हणजे जोन्टी ऱ्होडस मुळे त्यांची फिल्डिंग जगात सर्वोत्तम बनली होती.

या दोन्ही टीम पैकी एक वर्ल्ड कप उचलणार या बद्दल सगळ्या क्रिकेट रसिकांना खात्री होती. दोन्ही टीमची तयारी देखील तशी झाली होती. या टीम्सचे फन्स देखील आपल्या देशाला सपोर्ट करण्यासाठी इंग्लंडला पोहचले. 

वर्ल्ड कप सुरु झाला तस आफ्रिकेला कळाल आपल्या टीममधला एक प्लेअर म्हणजे हुकुमाचा एक्का आहे. त्याच नाव होतं लान्स क्लूजनर. एकेकाळी बॉलर म्हणून टीममध्ये आलेला क्लूजनर आता दक्षिण आफ्रिकेचा बेस्ट ऑलराउंडर होता.(लक्षात घ्या त्या टीम मध्ये जॅक कॅलीस सारखे खेळाडू होते.) १९९९ वर्षचं क्लूजनरचे होते. त्याने खालच्या नंबरला बॅटिंगला येऊन बेसबॉल प्रमाणे बॅट फिरवत तुफान फटकेबाजीची नवीन स्टाईल सुरु केली होती.

त्याने घेतलेल्या १७ विकेट आणि २५० धावा यामुळेच आफ्रिका सेमी फायनल ला पोहचली होती. या दरम्यान क्लूजनर ने ४ वेळा मन ऑफ दी मॅच अवाॅर्ड जिंकला होता. सेमी फायनलला गाठ त्यांचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी पडली होती. सुपरसिक्समधल्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना हरवल होत याचा बदला घ्यायचा होता.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही सेमी फायनल पेक्षा फायनल वाटत होती.

१७ जूनला बर्मिंगहॅम येथे ही मॅच झाली. हजारो प्रेक्षक मॅच बघायला हजर होते. ऑस्ट्रेलियाला आधी बॅटिंग मिळाली होती. शॉन पोलॉकच्या जादूई बॉलिंगपुढे कांगारूंचा निभाव लागला नाही. फक्त वॉ आणि बेव्हनच्या अर्धशतकामुळे त्यांना २१३ धावाची मजल गाठता आली. पुढे जेव्हा आफ्रिकन्स फलंदाजीला आले तेव्हा त्यांच्यासाठी हे टार्गेट सोपे होते. पण त्यांची ही बॅटिंग ढेपाळली. वॉर्नच्या स्पिनने कमाल केली होती. कॅलीस आणि ऱ्होडसच्या बचावात्मक बॅटिंग मुळे आफ्रिकेच्या ४५ ओव्हर मध्ये १७५ धावा बनल्या.

आता पाच ओव्हर मध्ये ३८ धावा बनवायच्या होत्या. तेव्हाच कॅलीस आउट झाला. मग शॉन पोलॉक आणि क्लुजनरने रनरेट वाढवला. पण पोलॉक आउट झाल्यावर आणखी दोन विकेट पटापट गेल्या. क्लुजनर दुसऱ्या साईडवरून फटकेबाजी करतच होता. शेवटची ओव्हर आली तेव्हा स्टीव्ह वॉने बॉलिंग फ्लेमिंगला दिली.

सहा बॉलमध्ये ९ धावा काढायच्या होत्या. आफ्रिकेच्या हातात एक विकेट होती.

पहिल्या दोन बॉलला क्लूजनर ने सलग दोन चौकार मारले. आफ्रिकेच्या २१३ धावा झाल्या. ऑस्ट्रेलियाच्या धावांची बरोबरी झाली होती. जिंकायला आता फक्त एकचं रन काढायची होती तरी दक्षिण आफ्रिकन फन्सनी वर्ल्ड कप जिंकलाच असल्याप्रमाणे जल्लोष सुरु केला. अजून चार चेंडू बाकी होते आणि शिवाय क्लुजनर स्ट्राईक वर होता.

फ्लेमिंगने पुढचा बॉल जबरदस्त टाकला. क्लूजनरने बॅट फिरवली पण नेहमी प्रमाणे त्याचा शॉट बसला नाही. बॉल थेट मिडऑनला फिल्डरच्या हातात गेला. डोनाल्डला मॅच संपवायची गडबड होती तो रन घ्यायला धावला पण क्लूजनरने  त्याला परत पाठवलं. डोनाल्ड आउट होता होता वाचला. बघणाऱ्याच्या हृदयाचा ठोका चुकला. क्लूजनरला सुद्धा टेन्शन आले होते. पण उसण आवसान आणून तो डोनाल्डला म्हणाला,

“अजून एक फोर मारून मी मॅच संपवतो, तू टेन्शन घेऊ नको.”

अजून तीन बॉल बाकी होते. आफ्रिकन बॅट्समन नी कोणतीही रिस्क घ्यायची आवश्यकता नव्हती. पण फन्सच्या दंग्यामूळ प्रेशर वाढत चाललं होतं. पुढचा बॉलदेखील फ्लेमिंगने क्लूजनरला मोठा फटका मारता येणार नाही असाच टाकला. क्लूजनरला गप देखील शोधता आला नाही. बॉल सरळ मिड विकेटला मार्क वॉकडे गेला. क्लूजनरने डोनाल्डला रनसाठी बोलवले आणि तो धावू लागला.

पण ग्राउंडवर इतका आवाज होता की डोनाल्डला तो रनचा कॉल ऐकूच आला नाही. क्लूजनर नॉन स्ट्राईकर एंडला आला तोपर्यंत डोनाल्डला माहितच नव्हते की आपल्याला धावायचे आहे. क्लूजनर जवळ येताच तो धावू लागला तो पर्यंत वेळ निघून गेली होती. बॉल गिलख्रिस्टच्या हातात पोहचला होता आणि डोनाल्ड आउट झाला होता. क्लूजनर धावता धावता थांबला देखील नाही तो सरळ पव्हेलीयनच्या दिशेने निघून गेला. त्याला माहित होते आपण वर्ल्ड कप गमावला आहे.

244639

टेक्निकली ती मॅच ड्रो झाली होती पण सुपर सिक्स मधल्या रनरेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले. जगभरातले लाखो करोडो प्रेक्षक दक्षिण आफ्रिकेसाठी हळहळले. आफ्रिकेने आपले चोकर हे नाव सिद्ध करून दाखवले होते.

पुढे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १३० धावात गुंडाळून १९९९चा वर्ल्ड कप सहज खिशात टाकला. क्लूजनर मॅन ऑफ दी सिरीज होता. पण या वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग झाली असण्याची कुजबुज मोठ्या प्रमाणात झाली. आफ्रिका ऑसीमधल्या सेमीफायनल मचवरून तर शंकेला वाव आहे असंचं म्हटल गेलं. पुढच्याच वर्षी क्रोनिएने आपण आपल्या करीयरमध्ये मॅच फिक्सिंग केले असल्याची कबुली दिली. पण त्याचे डिटेल सांगण्यापूर्वीचं त्याचा अपघाती मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.