कुठलाही पेपर हातात घ्या, पण स्पोर्ट्स पेज मागच्या बाजूलाच का असतं ?

आपण क्रिकेटची मॅच लाईव्ह बघतो, मग सोशल मीडियावर त्याबद्दलच्या पोस्ट बघतो आणि हायलाईट्स सुद्धा. पण तरीही सकाळी पेपर आला की, आपण पेपरात मॅचबद्दल काय आलंय हे वाचायला उत्सुक असतोयच. बरं ही सवय इतकी रूळलीये की मॅच असली काय किंवा नसली काय, आपल्यातले कित्येक जण पेपर वाचायची सुरुवात मागच्या पानापासूनच करतात, कारण हेच असतं की स्पोर्ट्सच्या बातम्या मागच्या पानावर येतात.

एक किस्सा सांगतो, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनंही एके ठिकाणी बोलताना ‘मी आजही न्यूजपेपर वाचताना मागच्या पानापासून सुरुवात करतो,’ असं सांगितलं होतं. थोडक्यात काय तर फक्त खेळाबद्दल वाचणाऱ्यांनाच नाही, तर खेळणाऱ्यांनाही पेपर मागच्या पानापासूनच वाचायची सवय आहे.

पण स्पोर्ट्सच्या बातम्या मागच्याच पानावर का छापल्या जातात यामागंही इंटरेस्टिंग कारणं आहेत…

पहिलं म्हणजे अल्टरनेटिव्ह फ्रंट, आपल्या मराठीत सांगायचं झालं तर पर्यायी मुखपृष्ठ

आजकाल अनेक पेपरमध्ये एक ट्रेंड दिसतो, तो म्हणजे पहिल्या पानावर नाव, जाहिराती आणि काही बातम्या असतात, मग दुसऱ्या पानावर पुन्हा एकदा पेपरचं नाव आणि बातम्या असतात. याचं साधं कारण म्हणजे पहिल्या पानावर जाहिराती असल्या तरी दुसऱ्या पानावर पेपरची शैली जपली जाते.

असंच शेवटच्या पानाबद्दल होतं, पेपर सुरुवातीपासून वाचण्यापेक्षा ज्यांना स्पोर्ट्स आवडतं ते डायरेक्ट शेवटच्या पानाचा पर्याय निवडू शकतात. लोकांच्या या आवडीमुळेच स्पोर्ट्सच्या पानावर जो मजकूर आणि फोटो आहे, ते अनेकदा मुखपृष्ठा सारखेच लोकप्रिय ठरतात आणि एखाद्या वर्तमानपत्राची ओळखही.

दुसरं कारण म्हणजे, मानवी सवय आणि थोडंसं सायन्स

जगात फक्त १० टक्के लोक डावखुरे आहेत, बाकी ९० टक्के लोकांच्या सवयीनुसार ते पेपर धरतात उजव्या हातात आणि विज्ञानानुसार जास्तीत लक्ष जातं तेही उजव्या पानावरच. याच सवयीमुळं अनेक जण उजव्या हातात पेपर घेऊन तो मागच्या पानापासून वाचायला सुरुवात करतात. अशावेळी मागच्या पानावर खेळाचे फोटोज आणि बातम्या असतील, तर पेपरमधली रंजकताही टिकून राहते आणि साहजिकच माणूस बाकीची पानंही वाचतो.

आता जर हे ९० टक्के आणि १० टक्क्यांचं प्रमाण उलटं असतं तर मात्र डाव्या बाजूच्या पानांना तुलनेनं जास्त महत्त्व मिळालं असतं.

तिसरं कारण सांगण्यात येतं ते म्हणजे वेळ आणि रंग

कुठलीही मोठी मॅच किंवा मोठी स्पर्धा ही बऱ्याचदा रात्रीच पार पडते. त्यामुळे ती घटना पूर्ण व्हायला, त्याच्याबद्दल माहीती आणि फोटो मिळायला जास्त वेळ जायचा, साहजिकच आतली पानं प्रिंट करुन कव्हर आणि मागचं पान उशिरा प्रिंट करणं सोपं जायचं. बऱ्याचदा स्पोर्ट्समध्ये काही मोठी घडामोड घडली तर उशिरानं का होईना ती पहिल्या पानावर घेतली जाते, साहजिकच इथंही वेळेचा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो.

आणखी एक कारण असंही सांगण्यात येतं की, सुरूवातीला अनेक पेपरमध्ये फक्त पहिलं आणि शेवटचं पानच रंगीत असायचं, अशावेळी फोटो असलेलं स्पोर्ट्सचं पान मागं ठेवायला प्राधान्य दिलं गेलं, मग हीच प्रथा पडत गेली.

कालांतरानं लोकांचं बातम्या बघणं आणि वाचणं बदलत गेलं आणि साहजिकच मागच्या पानावर जाहिराती वाढल्या, इतर बातम्या वाढल्या आणि मागच्या पानावर आंतरराष्ट्रीय बातम्या, एंटरटेन्मेन्टच्या बातम्या येत गेल्या आणि स्पोर्ट्स कुठंतरी आत सरकलं. पण तरीही आजही ज्यांचं पहिलं प्रेम खेळ आहे, त्यांची पेपर हातात घेतल्यावर मागच्या पानापासून वाचायला सुरुवात करणं सुटलेलं नाही.

मग भले तो माणूस साधा फॅन असो किंवा सौरव गांगुलीसारखा मॅचविनर कॅप्टन..!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.