कुतुबमिनार, चारमिनार, इंडिया गेट सगळीकडे तिरंगी रोषणाई आहे, मग ताजमहालला का नाही ?

लोकांचे व्हाट्सअप स्टेटस किंवा इंस्टाग्राम स्टोऱ्या बघा, सगळीकडे तिरंगाच दिसतोय. जरा गल्लीतून फेरफटका मारला, की कित्येक घरांवर तिरंगा लावलेला दिसतोय. सगळ्यात भारी म्हणजे, देशातली ऐतिहासिक ठिकाणं, धरणं पाहिलीत तर सगळीकडेच तिरंग्याची लाइटिंग करण्यात आलीये. मुंबई महानगरपालिका असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, उजनी धरण असेल, इंडिया गेट असेल, गेट वे ऑफ इंडिया असेल, कुतुबमिनार असेल सगळ्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी तिरंग्याची लाइटिंग करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असलेला भारत तिरंग्यात न्हाहून निघाला आहे.

याला एकच ऐतिहासिक ठिकाण अपवाद आहे, ते म्हणजे ताजमहाल. जगातल्या आठ आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहलवर तिरंग्याचं लाइटिंग करण्यात आलेलं नाही.

जगातल्या अनेक ठिकाणी ताजमहाल ही भारताची ओळख समजली जाते. पार पुतीनपासून क्रिकेटर लोकांपर्यंत मोठमोठे सेलिब्रेटी भारतात आले की, हमखास ताजमहालला भेट देतात. बरं एवढंच नाही, तर ताजमहाल वादात सापडणं ही सुद्धा काही नवी गोष्ट नाही. भारतात अनेकदा ताजमहाल की तेजोमहालय ? ताजमहालच्या रूम्समध्ये नेमकं काय ? हे वाद अनेकदा उफाळून आलेत.

त्यामुळं कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असणारा, जागतिक आश्चर्य असणारा ताजमहाल, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगी रंगात रंगलेला का नाही ? हा प्रश्न पडतोच.

सगळ्यात साधं कारण म्हणजे, सुप्रीम कोर्टानं ताजमहालवर कोणत्याही कृत्रिम लाईट्स सोडण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळं देश तिरंग्यात रंगला असला, तरी ताजमहाल नैसर्गिक प्रकाशातच दिसेल.

पण सुप्रीम कोर्टानं असा निर्णय का घेतला असेल ? ताजमहालवर कधीच कृत्रिम लाईट्स नव्हत्या का ?

तर सांगून आश्चर्य वाटेल की, कृत्रिम लाईट्समध्ये रंगलेली भारतातली पहिली ऐतिहासिक वास्तू ही ताजमहलच होती. जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा काही सैन्याधिकाऱ्यांनी ताजमहालवर जल्लोषाचं आयोजन केलं होतं. तेव्हा ताजमहालला लायटिंग करण्यात आलं होतं, मात्र ही घटना जवळपास ७७ वर्षांपूर्वीची आहे.

त्यानंतर अगदी ७ वर्षांपूर्वी भारतीय पुरात्तव खात्यानंच ताजमहालवर काहीशा सौम्य लाईट्स सोडल्या होत्या. त्यांचा उद्देश होता की, रात्रीच्या वेळी ताजमहाल उजळून निघावा आणि अधिकाधिक पर्यटक ताजमहालकडे आकर्षित व्हावे. मात्र लवकरच हा प्रयोग गुंडाळण्यात आला.

पण सगळ्यात गाजलेला मुद्दा होता, तो म्हणजे यान्नी या जागतिक दर्जाच्या पियानो वादकाची कॉन्सर्ट.

१९९७ च्या मार्च महिन्यात यान्नीची कॉन्सर्ट ताजमहालच्या आवारात झाली. त्यावेळी ताजमहालच्या आजूबाजूला लाइटिंग करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या रंगाचे मोठमोठे लाईट्स ताजमहालवर सोडण्यात आले होते. रंगात उजळलेला ताजमहाल हीच यान्नीच्या कॉन्सर्टची बॅकग्राऊंड होती.

या कॉन्सर्टचं आणि यान्नीच्या वादनाचं जगभरातून कौतुक झालं, बॅकग्राउंडला दिसणारा ताजमहालही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. मात्र दुसऱ्या दिवशीची सकाळ ताजमहालसाठी नेहमीसारखी नव्हती.

आपण कधीकधी बघतो की घरातल्या किंवा बाहेरच्या लाईटभोवती किडे जमा होतात आणि ते आपल्या भिंतीवर येऊन बसतात, सेम अवस्था ताजमहालची झाली. या मोठमोठ्या लाईट्सभोवती किडे जमा झाले आणि ते सगळे ताजमहालवर जाऊन बसले.

या किड्यांमुळे ताजमहालचं संगमरवर खराब झालं आणि ही गोष्ट पुरातत्व खात्याच्या लक्षात आली. हे प्रकरण गेलं कोर्टात, तेव्हा कोर्टानं निर्णय दिला की ताजमहालच्या ५०० मीटर अंतरात कोणताच कार्यक्रम घ्यायचा नाही आणि ताजमहालवर कोणतीही कृत्रिम रोषणाई करायची नाही.

रोषणाई केल्यावर येणारे किडे हा तर मुद्दा आहेच, पण जेव्हा आग्र्यातलं प्रदूषण वाढलं होतं, तेव्हाही ताजमहालवर थर बसला होता, ज्यामुळं ताजमहालाच्या रंगाचं मोठं नुकसान झालं होतं. सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारवर ताजमहालची योग्य ती काळजी न घेतल्याबद्दल ताशेरेही ओढले होते.

ताजमहालवर कोणतीही कृत्रिम रोषणाई न करण्याचं आणखी एक कारण पुरातत्व विभागाकडून सांगण्यात येतं…

ताजमहाल हा पूर्णपणे संगमरवराचा आहे, त्यामुळं तो नैसर्गिक प्रकाश आकर्षित करतो. ताजमहालचं खरं सौंदर्य पौर्णिमेच्या रात्री पाहायला मिळतं, त्यामुळेच रात्रीची वेळ असो किंवा कोणतीही ताजमहालला कृत्रिम रोषणाईची गरज पडत नाही.

याच कारणामुळे देशातली सगळी महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणं तिरंग्यात रंगलेली असताना, ताजमहालला मात्र तिरंगी रोषणाई करण्यात आलेली नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.