जसप्रीत बुमराहच्या दुखापतींमागचं खरं कारण बॉलिंग ऍक्शन आहे की आयपीएल ?

वर्षभराआधी शोएब अख्तर बोलला होता, जसप्रीत बुमराहचा वर्कलोड मॅनेज केला नाही, तर त्याला पाठीची दुखापत होऊ शकते. आपण अख्तरला येड्यात काढत बसलो आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये बुमराह बाहेर गेला. भारताच्या बॉलिंगचे काय हाल झाले वेगळं सांगायला नको. आता श्रीलंकेविरुद्धच्या सिरीजमधूनही बुमराह दुखापतीमुळेच बाहेर पडलाय.

ज्याच्या बॉलिंगच्या जोरावर भारतीय संघाची मिजास होती तो बुमराहच दुखापतीमुळे संघात नसतो.

एशिया कपमध्येही बुमराह दुखापतीमुळेच संघात नव्हता, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन टी२० मॅचेस खेळल्यानंतर आता त्याच्या पाठीच्या दुखापतीची बातमी आली. फ्रॅक्चर नसलं तरी बुमराहला काही महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

या सगळ्यात प्रश्न पडतो, तो म्हणजे बुमराहला सारखीच दुखापत कशी काय होते ? ज्या ऍक्शनमुळं बुमराहची बॉलिंग इतकी भेदक बनली, ती ऍक्शनच बुमराहच्या दुखापतीला कारणीभूत आहे का ? आणि खरंच बुमराह आयपीएलमध्ये जास्त आणि भारताकडून कमी खेळतो का ?

सगळ्यात आधी बघू शोएब अख्तर काय म्हणाला होता,

‘बुमराहची बॉलिंग ऍक्शन ही फ्रंट ऑन बॉलिंग ऍक्शन आहे. या ऍक्शननं बॉलिंग करणारे बॉलर्स पाठ आणि शोल्डर स्पीडचा वापर करुन बॉलिंग करतात. फ्रंट ऑन ऍक्शनमध्ये पाठीवर पूर्ण जोर येतो, त्यामुळं पाठीची दुखापत होण्याची शक्यता जास्त असते आणि दुखापत झाल्यावर कितीही प्रयत्न केले तरी ती बरी होणं अवघड असतं. बुमराहला अनेक वर्ष टिकायचं असेल, तर आपला वर्कलोड मॅनेज करणं गरजेचं आहे.’

वर्षभरापूर्वी हे भाकीत करताना अख्तरनं इयान बिशप आणि शेन बॉण्डचं उदाहरण दिलं होतं. या दोघांचीही बॉलिंग ऍक्शन फ्रंट ऑनच होती आणि दोघांनाही अनेकदा पाठीच्या दुखापतीला सामोरं जावं लागलं होतं.

आता इथं एक बेसिक गोष्ट समजून घ्यायला हवी, बुमराह, डेल स्टेन, शेन बॉण्ड, इयान बिशप हे फ्रंट ऑन ऍक्शन असलेले बॉलर्स, तर शॉन टेट, शोएब अख्तर, ब्रेट ली हे साईड ऑन ऍक्शन असलेले बॉलर.

फ्रंट ऑन ऍक्शन म्हणजे काय तर जेव्हा बॉलर बॉल टाकतो तेव्हा त्याचे दोन्ही पाय एकाच सरळ रेषेमध्ये असतात. फ्रंट ऑन ऍक्शनमध्ये बॉलरची अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी सुद्धा एका रेषेमध्ये असते.

तर साईड ऑन ऍक्शनमध्ये बॉलरचा मागचा पाय बॉलिंग क्रीझला पॅरलल असतो आणि पुढचा पाय काहीसा ऍक्रॉस असतो. साईड ऑन बॉलर्स नॅचरली आऊटस्विंगर टाकणारे असतात तर फ्रंट ऑनवाले इनस्विंगर.

आता ही ऍक्शन प्रत्येक बॉलरनुसार वेगळी असते, त्यामुळं बॉलिंग स्ट्राईड, फॉलो थ्रू, फिटनेस या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कुठल्या मसल्सवर जोर येतो हे अगदी स्पष्टपणे सांगता येत नाही.

बुमराहची बॉलिंग ऍक्शन प्रचंड अनऑर्थोडॉक्स आहे, पण हीच ऍक्शन त्याची ताकद आहे. बुमराहची ही भेदक ऍक्शन नॅशनल क्रिकेट अकादमीमधल्या किंवा इतर कोचेसनंही कधी बदलली नाही, त्याला अगदी वेगळ्या पद्धतीनं ग्रुम करण्यात आलं. त्याच्या हातांची मुव्हमेंट, स्पीड आणि प्रचंड अचूकता यामुळं तो सहज न झेपणारा बॉलर बनला.

पण मग इतके गुण असूनही बुमराहला सारखी दुखापत का होते ?

हे जाणून घेण्यासाठी आम्ही बीसीसीआय लेव्हल वन कोच संदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बुमराहची बॉलिंग ऍक्शन इंज्युरी प्रोन असल्यानं त्याला दुखापत होणारच होती. जगात असा कुठलाच फास्ट बॉलर नाहीये, ज्याला दुखापत होत नाही. बॉलरनं अगदी परफेक्ट अलाइनमेंट ठेवली, तरी दुखापतीचे फक्त चान्सेसच कमी होऊ शकतात, धोका कायम असतोच. पण बुमराहच्या दुखापतीला फक्त ऍक्शनच जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही.

त्याला दुखापत का झाली हे समजून घेताना, त्याच्यावर वर्कलोड किती आहे, तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळतो, त्यात भारतातल्या पाटा पिचेसवर आणि उष्ण वातावरणात खेळतो. या सगळ्यातून त्याला मिळणारी रेस्ट आणि तो फिटनेसच्या दृष्टीनं किती काम करतो या सगळ्या गोष्टी विचारात घेणं महत्त्वाचं आहे. क्रिकेटरला कधी दुखापत होऊ शकते, याचा काही अंदाज बांधता येत नाही. बुमराह इंज्युरीमधूनच बाहेर आला होता आणि भारतासाठीच खेळत होता. त्यामुळं त्याला दोष देता येणार नाही. बॅक इंज्युरी ही करिअरला धोका पोहचवणारी असते, त्यामुळं बुमराहला रिकव्हरीसाठी पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे.’

फास्ट बॉलरच्या करिअरमध्ये वय हा फॅक्टर सुद्धा अगदी महत्त्वाचा असतो, बुमराहचं आत्ताचं वय २८ वर्ष आहे. फक्त प्रोफेशनल क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर बुमराह ९ वर्षांपासून खेळतोय.

या ९ वर्षांत कंडिशन्स बदलल्या, फॉरमॅट्स बदलले पण बुमराह त्याच ऍक्शननं आणि ताकदीनं बॉलिंग करतोय. मागची काही वर्ष तर बुमराहच भारताचा आणि मुंबई इंडियन्सचाही मुख्य बॉलर आहे, त्यामुळं त्याच्यावर असलेलं मेंटल आणि फिजिकल प्रेशर प्रचंड आहे. ज्याचा फटका त्याला आता बसताना दिसतोय.

मुंबई इंडियन्सचा मुद्दा निघालाच आहे, तर आयपीएलबद्दल बोलूयात. बुमराहवर कायम टीका होते की, तो इंटरनॅशनल क्रिकेटपेक्षा आयपीएलला जास्त प्राधान्य देतो. यात तथ्य आहे का ?

तर आकडेवारी बघायची झाली, तर २०१९ पासून बुमराहनं मुंबई इंडियन्ससाठी ५९ आयपीएल मॅचेस खेळल्या आहेत, तर याच कालावधीत भारत ७४ टी२० मॅचेस खेळला त्यातल्या २० मॅचेसमध्येच बुमराह टीममध्ये होता. साहजिकच बुमराहच्या दुखापतीमागं आयपीएलचा मोठा रोल असण्याची शक्यता आहे. कारण आयपीएल भारताच्या उष्ण आणि दमट वातावरणात खेळवली जाते, बहुतेक मॅचेसमध्ये त्याला ४ ओव्हर्स तर टाकाव्याच लागतात.

दोन मॅचेसमध्ये अंतर कमी असतं, त्यामुळं पुरेशी रेस्ट मिळत नाही, या दरम्यान प्रवासही भरपूर करावा लागतो. त्यामुळं शरीराला रिकव्हर होण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो, तो मिळत नाही. यामुळं बॉडीवरचं प्रेशर वाढतं आणि दुखापतींचा धोकाही.

थोडक्यात काय तर फक्त ऍक्शन किंवा फक्त आयपीएल ही बुमराहच्या दुखापतीमागची कारणं नाहीत. तो मागची ५ वर्ष भारताकडून तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळत आलाय आणि या तिन्ही फॉरमॅट्समध्ये त्यानं जबरदस्त बॉलिंग करत भारताला मॅचेस जिंकवून दिल्या आहेत, हे विसरुन चालणार नाही.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.