ठाकरेंच्या बाजुने प्रतिज्ञापत्र न देणारे खासदार म्हणून संजय जाधवांवरच संशय का ?

शिवसेना हे नाव कुणाचं? धनुष्यबाण कुणाचा? या प्रकरणावर काल निवडणूक आयोगाचा निकाल आला. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा देऊ केलं. आता ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि धनुष्यबाण निसटलाय असं चित्र दिसतंय. मात्र निवडणूक आयोगाने हा निकाल कशाच्या आधारावर दिलाय? तर, संख्याबळाच्या आधारावर.

कशाचं संख्याबळ ते बघुया?

हे संख्याबळ दोन्ही गटांकडे असलेली विधानसभा आमदार, विधानपरिषद आमदार, लोकसभा खासदार आणि राज्यसभा खासदार यांची संख्या या बळावर ठरवण्यात आलंय.

एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिज्ञापत्र दिलेल्यांची संख्या किती?

४० विधानसभा आमदार, ० विधान परिषद आमदार, १३ लोकसभा खासदार आणि ० राज्यसभा खासदार अशी प्रतिज्ञापत्र शिंदेंच्या बाजुने सादर करण्यात आली होती.

उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिज्ञापत्र दिलेल्यांची संख्या किती?

१५ विधानसभा आमदार, १२ विधानपरिषद आमदार, ४ लोकसभा खासदार आणि ३ राज्यसभा खासदार इतकी प्रतिज्ञापत्र ही उद्धव ठाकरेंच्या गटाच्या बाजुने सादर करण्यात आली होती.

या सगळ्या आकडेवारीमध्ये विषय असा आहे की, ठाकरेंच्या बाजुने ५ लोकसभा खासदार आहेत अशा चर्चा होत्या. प्रत्यक्षदर्शीसुद्धा ५ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडलेली नाही असं दिसत होतं. मात्र निवडणूक आयोगाकडे मात्र फक्त ४ लोकसभा खासदारांनी ठाकरेंच्या बाजुने प्रतिज्ञापत्र दिलं… त्यामुळे चर्चा सुरू झाली की, ठाकरेंच्या गटातील कुणीतरी खासदार फुटल्याची.

या चर्चांमध्ये फुटलेले खासदार म्हणून परभणीचे  संजय जाधव यांचं नाव चर्चेत आलंय.
आता जाधवांचंच नाव चर्चेत का आलंय? यामागेही काही कारणं आहेत… तीच कारणं बघुया. सगळ्यात आधी तर ठाकरेंच्या बाजुने असलेले ५ खासदार म्हणून अरविंद सावंत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत आणि संजय जाधव ही नावं चर्चेत आहेत.

मग या ५ पैकी फक्त संजय जाधव यांच्यावरच संशयाची सुई काय येऊन थांबलीये याचं उत्तर २०२० पासून संजय जाधवांच्या वक्तव्यांवरून आणि त्यांच्या वागण्यावरून लक्षात येतं.

१) ऑगस्ट २०२०:

२०२० च्या ऑगस्टमध्ये खासदार संजय जाधवांनी थेट आपल्या खासदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठवला होता. त्यावेळी त्यांनी राजीनाम्यासह एक पत्रही पक्षप्रमुखांना पाठवलं होतं. त्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं,

“एपीएमसीमध्ये शिवसेनेची बॉडी बसावी म्हणून ८ ते १० महिने प्रयत्न करूनही सलग दुसऱ्यांदा तिथे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीची बॉडी बसल्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. मी कार्यकर्त्यांना खूष ठेऊ शकत नसेन तर मला खासदारपदी राहण्याचा अधिकार नाही.”

यावरून संजय जाधव हे महाविकास आघाडीच्या युतीत खूष नसल्याचं तर लक्षात येतंच, पण विशेष लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की, त्यावेळी त्यांची मनधरणी शिवसेनेच्या वतीने आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केली होती.

२) २८ मे २०२२:

२५ ते २९ मे या कालावधीत पुण्यात शिवसेनेने राबवलेल्या शिवसंपर्क अभियानाची धुरा सांभाळताना पुन्हा एकदा त्यांनी महाविकास आघाडीत शिवसेनेवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली होती.

“शिवसेनेचा मुख्यमंत्री असून पाठबळ मिळत नसल्यानं येथील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. भाजपचे, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. आघाडीच्या निकषांप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार त्यांना ६० टक्के आणि इतरांना २०-२० टक्के सत्तेचा शेअर मिळायला हवा. पण विकासकामांमध्ये हा शेअर मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची खंत आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिलं जातं, मात्र शिवसेनेला डावलण्यात येतं.”

३) १० जुलै २०२२:

बंड झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्री म्हणून पंढरपुरातल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात १० जुलै २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी महापूजा केली होती. या महापूजेच्या वेळी मंदिरात परभणीचे खासदार संजय जाधवही उपस्थित होते.

त्यावेळी चर्चा अश्याही होत्या की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय जाधव यांचा सत्कार केला.’

४) १२ जुलै २०२२:

शिंदे आणि त्यांच्यासह काही आमदार खासदार हे निघून गेल्यानंतर आणि सत्तेत बसल्यानंतर १८ जुलै रोजी होणार असलेल्या राष्ट्रपती निवडणुकीसाठीची रणनीति ठरवण्यासाठी १२ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांनी १२ जुलै रोजी एक बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांसह खासदारांना बोलवण्यात आलेलं. मात्र काही खासदार या बैठकीला हजर नव्हते.

यवतमाळच्या खासदार भावना गवळी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आणि दादरा आणि नगर हवेलीच्या खासदार कलाबेन देऊळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव ही बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांची नावं होती. विशेष म्हणजे या यादीतल्या सर्व खासदारांपैकी संजय जाधव हे एकटेच आजही ठाकरेंच्या बाजुचे खासदार म्हणून यादीत बसवले जातात.

नाही म्हणायला १४ जुलै २०२२ रोजी शिवसैनिकांना घेऊन संजय जाधव हे थेट मातोश्रीवर गेलेले आणि आपण तुमच्यासोबतच असल्याची ग्वाहीही दिली होती. पण त्याआधीची त्यांची नाराजी, वक्तव्य आणि घटनांमुळे आताच्या घडीला ठाकरेंच्या बाजुने प्रतिज्ञापत्र न देणारे खासदार म्हणून संजय जाधवांवरच संशयाची सुई जातेय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.