देशभरातील एटीएममध्ये ठणठणाट का आहे..?  

 

गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे नसल्याच्या बातम्या येताहेत. त्यामुळे तेथील लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आता तर महाराष्ट्र, गुजरात,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश आणि बिहारमधील अनेक ठिकाणांहून देखील अशाच स्वरुपाची माहिती समोर येतेय. या ठिकाणच्या अनेक एटीएममध्ये कॅश नसल्याच्या तक्रारी समोर येताहेत. सहाजिकच लोकांमध्ये घबराटीची परिस्थिती निर्माण झालीये. पुन्हा एकदा नोटबंदी केली जाणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताहेत. जाणून घ्या नेमकं काय झालंय की देशभरातील एटीएममध्ये ठणठणाट आहे…?

फायनान्शियल रिझोल्यूशन अ‍ॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स (एफआरडीआय) विधेयक 

काही दिवसांपूर्वी सरकारने ‘फायनान्शियल रिझोल्यूशन अ‍ॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स’ अर्थात एफआरडीआय विधेयक सादर केले. या विधेयकाद्वारे सरकारी बँकांना अशी सूट देण्यात येणार आहे की, एखाद्या बुडीत उद्योगातून बँकांना झालेला तोटा भरून काढण्यासाठी त्या आपल्या ग्राहकांच्या खात्यातील पैसे आपल्याकडे वळवून घेऊ शकतील. या तरतुदीमुळे नोटबंदीच्या धक्क्यातून नुकत्याच सवरलेल्या ग्राहकांना ४४० व्होल्टचा अजून एक धक्का बसला. या विधेयकाचे जर कायद्यात रूपांतर झाले तर बँकांमध्ये असणारा आपला पैसा सुरक्षित राहणार नाही, अशी भीती बँक ठेवीदारांच्या मनात निर्माण झाली. याप्रकरणी सारवासारव करण्याचे प्रयत्न सरकारकडून करण्यात आले, पण लोक त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. बँकांमधील आपल्या ठेवींच्या सुरक्षिततेबद्दलची खात्री नसल्याने लोकांनी बँकांमधील आपल्या ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली.

आंध्र आणि तेलंगनामध्ये नेमकं काय झालं..?

no cash
Facebook

बँकिंग व्यवस्थेवरच्या लोकांच्या उडत चाललेल्या विश्वासाचा परिणाम असा झाला की आपली होती नव्हती बचत लोक बँकेतून काढून घेऊ लागले. आंध्र प्रदेश आणि तेलंगनामधील अनेक महत्वाच्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांसमोर लोकांच्या रांगा लागू लागल्या. रांगेत लागलेल्या बहुतेकांना एकतर बँकेतील आपले पैसे काढून घ्यायचे होते किंवा बँक अकाऊंट बंद करायचे होते.ही नोटबंदीच्या काळातल्या सारखी परिस्थिती होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला, बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात चलनटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आणि दोन्ही राज्यातील अनेक शहरांमधील बहुतांश एटीएमच्या बाहेर एक तर  ‘नो कॅश’चे बोर्ड झळकायला लागले, किवा एटीएम बंद करण्यात आले.

सरकारची भूमिका

या परिस्थितीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये. “आपण देशभरातील उपलब्ध चलनसाठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून गरजेपेक्षा अधिक चलनसाठा उपलब्ध आहे. काही ठिकाणाहून एकदम कॅशची मागणी वाढल्याने सद्यस्थितीतील अडचणींचा सामना करावा लागत आहे”

अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी देखील या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केलीये. त्यांनी सांगितलं की, “सध्याची जी परिस्थिती उद्भवलीये ती देशभरात सगळीकडेच उद्भवलेली नाही तर, देशाच्या काही भागात अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोख रकमेच्या असमान वितरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रिजर्व बँक प्रयत्न करतेय. शासनाकडूनही एका समितीची स्थापना करण्यात आलीये. साधारणतः 2 ते ३ दिवसात परिस्थिती पूर्ववत होईल”

Leave A Reply

Your email address will not be published.