आमिरच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमावर कर्नाटकात बंदी का घालण्यात आली होती…?

 

साधारणतः ६ वर्षापूर्वी ‘सत्यमेव जयते’ या आमीर खानच्या छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रमाची सुरुवात  झाली होती. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आमीर खानने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. शो प्रदर्शित झाला आणि अपेक्षेप्रमाणे हिट देखील झाला. सत्यमेव जयतेच्या माध्यमातून आमीर खानने अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक देखील झालं आणि त्याचवेळी कार्यक्रमासाठी आमीर खान घेत असलेल्या गलेलट्ठ मानधनाच्या आकड्यावरून वाद देखील झाला. कार्यक्रमात अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालण्यात आलेला असल्यामुळे स्टार प्लस या वाहिनीसह डी.डी-१ या राष्ट्रीय चॅनेलवरून देखील कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं.

कार्यक्रम भारतातील विविध राज्यातील प्रेक्षकांना त्यांच्या भाषेत बघता यावा यासाठी स्टारच्या प्रादेशिक भाषेतील चॅनेलवरून हिंदी भाषेतील हा शो, त्या त्या राज्यातील प्रादेशिक भाषेत डब करून त्याचं प्रसारण करण्यात आलं. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता. असं असलं तरी देशातील एका भाषेत मात्र हा कार्यक्रम डब होऊ शकला नाही, हे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहित असेल. ती भाषा म्हणजे कानडी. विशेष म्हणजे शो कानडीत प्रसारित करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली होती. कानडी भाषेतील प्रोमो देखील रिलीज करण्यात आला होता. कर्नाटकमधील चित्रपटविषयक संस्थांच्या डबिंगविषयीच्या धोरणामुळे सत्यमेव जयते कानडीमध्ये प्रसारित होऊ शकला नाही. त्यामुळे हिंदी भाषा समजत नसलेल्या किंवा दैनंदिन जीवनात हिंदीचा वापर कमी असल्याने हिंदीचं नीटसं आकलन नसलेल्या आमिरच्या अनेक चाहत्यांना हा शो बघता आला नाही.

‘कर्नाटक फिल्म्स चेंबर ऑफ कॉमर्स’ (KFCC) आणि ‘कर्नाटक टेलिव्हिजन असोशीएशन’  (KTA) या कर्नाटकमधील संस्थांनी कार्यक्रम  कानडीमध्ये डब करण्यास विरोध केला. इतर कुठल्याही भाषेतील सिनेमे किंवा टीव्ही सीरिअल कानडीमध्ये डब केल्याने कर्नाटकातील स्थानिक कलाकारांच्या रोजगाराच्या संधी हिरावल्या जाण्याचा धोका निर्माण होतो तसंच कानडी भाषेतील रंगत डबिंगच्या प्रक्रियेमध्ये निघून जाते, असं या दोन्ही संस्थांचं म्हणणं असल्यामुळे इतर भाषेतील सिनेमे अथवा टीव्ही शोज कानडीमध्ये डब करताना मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो. या धोरणामुळे सत्यमेव जयते कानडी भाषेत प्रसारित केला जाऊ शकला नसला तरी या धोरणाला कुठलीही कायदेशीर मान्यता नाही.

आपल्याला सत्यमेव जयतेचं कानडीमध्ये डबिंग करण्याची परवानगी मिळावी म्हणून आमीर खानने त्या काळात खूप प्रयत्न केले. आमिरने कर्नाटक फिल्म्स चेंबर ऑफ कॉमर्सशी पत्रव्यवहार करून डबिंगची परवानगी द्यावी अशी विनंती केली, परंतु संस्थेने तशी परवानगी देण्यास नकार दिला. उलट आमिरने आपला कार्यक्रम कानडी भाषेत शूट करावा असं संस्थेकडून त्याला सांगण्यात आलं.