आणि झारखंडमधील एक गाव “मिनी लंडन” म्हणून जगभर ओळखलं जाऊ लागलं…!!!

झारखंडची राजधानी ‘रांची’ पासून जवळपास ६० ते ६५ किलोमीटर अंतरावर असणारं एक गांव फक्त भारतातच नाही तर जगभरात ‘मिनी लंडन’ म्हणून ओळखलं जातं. ‘मैकलुस्कीगंज’ असं नांव असणारं हे गांव १९३३ साली ‘कोलोनाइजेशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेने ‘अँग्लो इंडियन’ समुदायासाठी वसवलं होतं. ‘अँग्लो इंडियन’ समुदायातील व्यवसायिक आणि राजकारणी अर्नेस्ट टिमोथी मैकलुस्की यांच्या प्रयत्नातून हे गाव आकारास आलं. म्हणून त्यांच्या नावावरूनच गावाला ‘मैकलुस्कीगंज’ असं नांव देण्यात आलं.

अँग्लो इंडियनसमुदाय कुणाला म्हणतात?

‘अँग्लो इंडियन’ समुदाय म्हणजे ब्रिटीश पुरुष आणि भारतीय महिला यांच्यातील संबंधाने जन्मास आलेल्या संततीस ‘अँग्लो इंडियन’ असं म्हंटलं जातं. भारतातील ब्रिटीश राजवटीच्या काळात अनेक ब्रिटिशांनी भारतीय महिलांशी लग्न करून संसार थाटला. भारत ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील त्यांनी इंग्लंडला परत न जाता भारतातच आपलं बस्तान बसवलं. त्यामुळे त्यांची नवी पिढी देखील भारतात जन्मली. भारतात जवळपास सर्वच राज्यात कमी-अधिक प्रमाणात ‘अँग्लो इंडियन’ समुदाय आढळतो.

ब्रिटीश सत्तेत असताना या घटकाकडे ब्रिटीशांचे विश्वासू म्हणून बघितलं जायचं. असं सांगितलं जातं की भारतात मोठ्या प्रमाणात ‘अँग्लो इंडियन’ समुदायाची वाढ करणे, ही ब्रिटीशांच्या धोरणात्मक पातळीवरील एक महत्वाची बाब होती. त्यामुळेच ब्रिटीश पुरुषाने भारतीय महिलेशी लग्न करून संतती जन्मास घालण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटिशांनी प्रत्येक संततीच्या जन्मानंतर १५ रुपेरी रुपये नाणे देण्याची योजना सुरु केली होती.

शिक्षकी तसेच डॉक्टरी पेशामध्ये हे लोक बहुसंख्य प्रमाणात असायचे, बऱ्याचशा स्त्रिया नर्सिंगच्या व्यवसायात असायच्या. खुर्दा रोड ते अजमेर भागात या लोकांचे मोठमोठे बंगले होते. या लोकांची आर्थिक परिस्थिती संपन्न असली तरी अनेक गरीब लोक देखील या समुदायात होते. कोलकात्यातील झोपडपट्टीच्या भागात देखील या समुदायातील अनेक गरीब लोकांचा रहिवास असे. तिथे त्यांना ‘सफेद चुहा’ (पांढरी उंदरं) म्हणून ओळखण्यात येत असे.

भारतीय राज्यघटनेने ‘अँग्लो इंडियन’ समुदायाला अनेक अधिकार दिले आहेत. राज्यघटनेच्या ३३१ व्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती या समुदायातील २ सदस्यांची नियुक्ती लोकसभेवर करू शकतात. महाराष्ट्रासह काही राज्यांच्या विधानसभांमध्ये देखील राज्यपाल आपल्या अधिकारात ‘अँग्लो इंडियन’ समुदायातील एका प्रतिनिधीची नियुक्ती विधानसभेवर करतात. या सदस्यांना विश्वासमत ठरावावर मतदान करण्याचा अधिकार देखील असतो.

mcluskie
अर्नेस्ट टिमोथी मैकलुस्की

मैकलुस्कीगंजचा इतिहास काय आहे..?

अर्नेस्ट टिमोथी मैकलुस्की हे एक अँग्लो इंडियन व्यावसायिक होते. त्यांचे वडील आयरिश होते, तर आई भारतीय होती. रेल्वेत नोकरीला असणाऱ्या मैकलुस्की यांच्या वडिलांनी अनेक सामाजिक अडचणींना सामोरे जाऊन ब्राह्मण समाजातील एका भारतीय मुलीशी लग्न केलं होतं, त्यामुळे अर्नेस्टचं बालपण अडचणीतचं गेलं. ‘अँग्लो इंडियन’ समुदायाला सामोरे जाव्या लागणाऱ्या अनेक अडचणींना ते लहानपणापासूनच सामोरे गेले होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून या समुदायासाठी एक वेगळं ठिकाण असायला हवं असा विचार त्यांच्या मनात घोळत होता.

त्यातच ‘सायमन कमिशन’चा अहवाल आला ज्यात ब्रिटिशांनी अँग्लो इंडियन समुदायाप्रतीची आपली जबाबदारी झटकली. तोपर्यंत मैकलुस्की बंगाल विधान परिषदेचे सदस्य बनले होते आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक म्हणून देखील त्यांनी नांव कमावलेलं होतं.

mcluskie poster

एकदा असंच फिरायला म्हणून मैकलुस्की ज्यावेळी या परिसरात पोहोचले त्यावेळी जागेच्या सौदर्याने त्यांच्या मनात घर केलं. त्यांनी याचवेळी आपल्या डोक्यातील कल्पनेला मूर्त रूप द्यायचं ठरवलं आणि आपल्या स्वप्नातील गांव वसवण्यासाठी जागा पक्की केली. गावाच्या निर्मितीसाठी त्यांनी ‘कोलोनाइजेशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. गांव वसविण्यासाठी जी जागा हवी होती, त्यासाठी त्यांना रातू महाराजांची मदत झाली. रातू महाराजांनी  मैकलुस्की यांना सुमारे १०००० एकर जागा भाड्याने दिली. या जागेतच त्यांनी आपल्या समुदायासाठी नविन गांव वसवलं. संपूर्ण युरोपातून आलेल्या ‘अँग्लो इंडियन’ समुदायाला या ठिकाणी स्थायिक होण्याचं आवाहन करण्यात आलं. प्रकारे वसविण्यात आलेलं हे जगभरातील एकमेव गांव आहे.

मैकलुस्कीगंजलामिनी लंडनका म्हणतात..?

मैकलुस्की यांनी हे गांव वसवल्यानंतर मोठ्या प्रमाणात धनिक अँग्लो इंडियन समुदाय या ठिकाणच्या परिसरात येऊन स्थायिक होऊ लागला. त्या लोकांनी इथे जमिनी विकत घेतल्या आणि मैकलुस्कीगंज तसेच आसपासच्या परीसरात आपापले जवळपास ३६५ बंगले बांधले. अँग्लो इंडियन समुदायाबरोबरच पश्चिमात्य संस्कृती देखील येथे रुजू लागली. पश्चिमात्य लोकांचा रहिवास आणि त्यांची संस्कृती यांमुळे काही कालावधीतच हे गांव ‘मिनी लंडन’ म्हणून नावारूपास आलं. १९९७ सालापासून डॉन बोस्को अकादमीने अल्फ्रेड जॉर्ज डी’रोझारियोच्या पुढाकाराने गावात ‘डॉन बॉस्को’ शाळेची सुरुवात केली आहे.

सद्यस्थितीत मात्र या ठिकाणच्या बंगल्यांमध्ये अँग्लो इंडियन समुदायातील फार कमी लोकांचा रहिवास बघायला मिळतो. अनेक लोक परदेशात निघून गेलेली आहेत. बरेच बंगले स्थानिकांनी विकत घेतले आहेत किंवा काही बंगले तसेच पडून आहेत. अनेक बंगल्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी होस्टेल देखील सुरु करण्यात आलंय. मैकलुस्की हे एक संमिश्र संस्कृती जोपासणारं आगळवेगळ उदाहरण आहे, हा वारसा जपणं आवश्यक आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.