प्रविण तोगडीयांना विश्व हिंदू परिषद का सोडावी लागली…?
“सत्तेसाठी हपापलेल्या मदमस्तांनी सत्य आणि धर्माचा आवाज दाबला. परंतु चाणाक्याने म्हंटलं होतं की, महायुद्धात जिंकायचं असेल तर छोट्या-छोट्या लढायांमधील पराभव पचवावा लागतो. आता महायुद्ध जिंकण्यासाठीच मी हा छोटा पराभव स्विकारतोय” असं सांगत विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी संघटना सोडली आणि विहिंपमधील गेल्या ३२ वर्षापासूनच्या तोगडिया युगाचा अस्त झाला. जाणून घेऊयात नेमकं असं काय झालं की कधी काळी ‘हिंदुत्वाचे पोस्टरबॉय’ राहिलेल्या प्रवीण तोगडीयांना विश्व हिंदू परिषद सोडावी लागली.
तात्कालिक कारण
विश्व हिंदू परिषदेची स्थापना १९६४ साली झाली. तेव्हापासून आजतागायत या संघटनेच्या अध्यक्षाची निवड कायमच परस्पर सहमतीच्या आधारे करण्यात येत असे, पण यावर्षी संघटनेच्या ५४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आलं. या निवडणुकीत प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांचा पराभव झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आणि मध्य प्रदेश तसेच राजस्थान उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेल्या न्या.विष्णू सदाशिव कोकजे यांची संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे नाराज झालेल्या तोगडियांनी संघटनेला रामराम ठोकला. भविष्यात हिंदू हितासाठी आणि राम मंदिर निर्मितीसाठी आपण काम करत राहणार असून १७ एप्रिल पासून आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती, तोगडीयांनी पत्रकार परिषदेत दिली.
संघर्षाची पार्श्वभूमी
‘प्रवीण तोगडिया’ हे विहिंपचा जहाल हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जात असत. संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्यानंतर एकूणच संघटनेच्या उभारणीत आणि जडणघडणीत त्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे. पटेल समाजातून येणाऱ्या तोगडिया यांचा गुजरातच्या राजकारणावरही खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात तोगडिया आणि नरेंद्र मोदी यांच्यात मित्रत्वाचे संबंध राहिलेत. मोदी-तोगडिया मैत्रीचे किस्से असे की, कधी काळी संघाचे प्रचारक म्हणून दोघं एकाच स्कूटरहून फिरत असत, आणि मोदींना स्कूटर चालवता येत नसल्याने ती तोगडिया चालवत. मोदींना पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्यात सुद्धा तोगडियांचा खूप मोठा वाटा होता. एकूणच काय तर त्या काळात मोदी आणि तोगडिया हे सख्खे मित्र होते, जे पुढे जाऊन पक्के वैरी होणार होते.
मोदी आणि तोगडिया यांच्यातील संघर्षाला सुरुवात होते, ती मोदी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर. त्या काळी तोगडिया हे गुजराती राजकारणातलं मोठं प्रस्थ होतं आणि गुजरात सरकारमधील बरेचसे राजकीय आणि प्रशासकीय निर्णय त्यांच्या मर्जीनुसार होत. मोदींना तोगडियांचा सरकारमधील हा हस्तक्षेप खटकत होता. त्यामुळे दोघांमध्ये अंतर्गत संघर्षाला सुरुवात झाली. तोपर्यंत २००१ च्या गुजरात दंगली घडून गेल्या होत्या आणि त्याचं श्रेय घेण्यावरून दोघांमध्ये स्पर्धा सुरु झाली. ज्यात नरेंद्र मोदींनी बाजी मारली आणि ‘हिंदूंचा तारणहार’ म्हणून मोदींचा उदय झाला. याउलट २००२ साली पुन्हा सत्तेत आलेल्या मोदींनी गोर्धन झदाफिया या तोगडिया समर्थक आमदाराला मंत्रिमंडळातून डच्चू दिला. गुजरात दंगल प्रकरणात विहिंपच्या अनेक कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या. अनेकांना तुरुंगात जायला लागलं. त्यामुळे तोगडिया दुखावले गेले ते कायमचेच.
नंतरच्या काळात २००७ आणि २०१२ विधानसभा निवडणुकांत तर त्यांनी मोदीविरोधात काम देखील केलं. मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी अनेक मुद्यावर सार्वजनिकरीत्या केंद्रातील भाजप सरकार आणि मोदींविरोधात भूमिका घेतली. राम मंदिराच्या मुद्यावर ते सरकारविरोधात कायमच आक्रमक राहिलेले आहेत. ज्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी तोगडिया अडचणीचे ठरू लागले होते. त्यामुळे तोगडीयांना कमजोर करणं, मोदींसाठी आणि संघासाठी आवश्यक होतं. तोगडीयांना कमजोर करण्याच्या दृष्टीनेच त्यांना विहिंपपासून दूर करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आणि त्याची परिणीती तोगडीयांनी विहिंप सोडण्यात झाली.
विहिंपच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक अचानक झाली…?
गेल्या वर्षी २७ ते २९ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर येथे विहिंपची बैठक पार पडली. त्यावेळीच तोगडिया यांनी आपले बंडखोरीचे इरादे स्पष्ट केले होते. त्यावेळी देखील निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती पण काही कारणास्तव ती टळली. त्यानंतर गेल्या ४ महिन्यात तोगडीयांचे पंख छाटण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न झाले आणि शेवटी १४ एप्रिल रोजी विहिंपच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत कोगजे यांना १३१ तर रेड्डी यांना ६० मते पडली. या निवडणूक प्रक्रियेपासून आपल्या समर्थकांना दूर ठेवण्यात आले आणि विरोधी मतदारांची नावे मतदार यादीत घुसडण्यात आल्याचा आरोप तोगडीयांनी केलाय.