संक्रांत आली की तुळशीबागवाले खुश होतात, यामागंही कारण आहे…

पुण्यातल्या मुलीला ताज हॉटेल, दुबई मॉल, गोवा, कोकण कुठंही फिरवून आणा, ती सगळ्यात जास्त खुश होणार ती तुळशीबागेतच. तुझ्यापुढं स्वर्गही फिका पडे… हे वाक्य पुण्यातल्या पोरी आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला उद्देशून नाही, तर तुळशीबागेला उद्देशून म्हणतात. कारण असं म्हणतात, जगात अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुळशीबागेत मिळणार नाही.

तशी तुळशीबागेची हिस्ट्री फार मोठी आहे. म्हणजे अगदी पेशवेकालीन. पेशवेकाळात नारो अप्पाजी यांनी खाजगीवाल्याकडून एक एकराची तुळशीची बाग घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर १७९५ मध्ये तुळशीबाग मंदिराचं बांधकाम पुर्ण झालं. त्यानंतरच्या काळात श्रीरामाचं मंदिर, गजाजन मंदिर, त्र्यंबकेश्वर महादेव, शेषशायी भगवान, विठ्ठल रखुमाई अशा कित्येक मंदिरांची स्थापना परिसरात झाली. पुढं दुकानाला उत्पन्न मिळावं म्हणून परिसरात काही दुकानांना परवानगी देण्यात आली आणि त्यामुळं खरेदीसाठी महिलांची गर्दी होऊ लागली.

मग दुकानांमागं दुकानं वाढू लागली आणि उभी राहिली तुळशीबाग.

आत्ता तुळशीबागेची आठवण येण्याचं कारण म्हणजे, मकर संक्रांतीचा सण. तिळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या, पंतंगांची काटाकाटी या सगळ्यासोबत खास महिलावर्गासाठी संक्रांतीचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे हळदी-कुंकू. आज तिच्या घरी, उद्या माझ्या घरी म्हणत संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकवाचे कार्यक्रम रंगतात. 

या हळदी-कुंकवात कोणी कुठली साडी घातली, कुणाचे कानातले कसे हे मुद्दे गौण ठरतात. तिथं एकच मुद्दा प्रतिष्ठेचा असतो तो म्हणजे, कुणी काय वाण लुटलं?

आता वाण लुटणं म्हणजे काय आणि त्याच्यामागचं कारण सांगतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर, लहान पोरांच्या बड्डेला आपण कंपास, डबा, पुस्तक असं ठरलेलं रिटर्न गिफ्ट देतो, तसंच हळदी कुंकवाला यजमान असणाऱ्या काकू आपल्याकडं आलेल्या इतर काकवांना गिफ्ट देतात, त्यालाच म्हणतात वाण.

देन व्हॉट अबाऊट इतिहास? सांगतोय दम धरा… संक्रांतीच्या काळात शेतात वाटाणे, गाजर, ऊस, हरभरे, बोरं, शेंगा यांचं पीक शेतात नुकतंच आलेलं असतं. हे सगळं एका मातीच्या बोळक्यात भरलं जातं. त्याला सुगड असंही म्हणतात. ही वाणं सवाष्णीला दिली जातात. तसंच एक देवाजवळ, एक तुळशीजवळ आणि तीन सवाष्णींना घरी बोलवून हे वाण दिलं जातं. लग्नानंतरची पहिली पाच वर्ष ‘पाटावरची वाणं’ देतात. सुगड, तिळगूळ, हळदी-कुंकू या वस्तू तीन सवाष्णींच्या घरी जाऊन देवासमोर पाट मांडून त्यावर ठेवतात.

नवंनवं लग्न झालेल्यांची संक्रांत एकदम जोरात असते. नवी साडी, हलव्याचे दागिने, गिफ्ट, फोटोशूट असं लय काय काय असतं. लग्नानंतरची पाच वर्ष तर, कुंकवाची डबी, कंगवा, आरसा, बांगड्या, काळे मणी असं सौभाग्याचं लेणं समजलं जाणाऱ्या गोष्टी देतात. मग त्यानंतर सुरू होतो गिफ्टचा सिलसिला. हेअरबँड, चांदीची वाटी, मोबाईल कव्हर, पर्स, भारीतल्या प्लेट, ग्लास असं काय काय बायका देतात.

या सगळ्या पिक्चरमध्ये तुळशीबाग कुठं येते, याचं उत्तर लई सोपं आहे. तुळशीबागेत मिळत नाही, अशी जगात एकही गोष्ट नाही. त्यामुळं जानेवारी महिना सुरू झाला, की बायकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज पडायला सुरुवात होते. कोण काय वाण लुटणार, कोण कधी हळदी कुंकू ठेवणार हे चर्चेचे विषय असतात. आणि हा सगळा विषय पक्का बसतो, तो फक्त तुळशीबागेतच. त्यामुळं तुळशीमागेत खरेदी करायला बायकांची गर्दी होते.

या १५-२० दिवसांच्या काळात तुळशीबागेतलं वातावरण कसं असतं, याबाबत बोल भिडूने गेल्या १० वर्षांपासून तुळशीबागेत दुकान असणाऱ्या ओंकार गायकवाड या व्यापाऱ्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ”दरवर्षी जानेवारी महिन्याच्या चार-पाच तारखेपासून तुळशीबागेत गर्दी व्हायला सुरुवात होते. हेअरबँड, स्टाईलिश पिन्स, टिकल्या, प्लेट्स, ड्रेस, पर्स, बॅग्स अशा कित्येक गोष्टींची खरेदी तुळशीबागेतून होते. त्यामुळं संक्रांत आली की तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांमध्ये आनंद असतो. जणू काही ही दुसरी दिवाळीच असते. यंदा मात्र कोविडच्या लाटेमुळं फारशी गर्दी नाहीये, येत्या काही दिवसांत हळदी कुंकू सुरू झालं की कदाचित गर्दी होईल.” थोडक्यात सध्या नेहमीची गजबज नाही, मार्केट जरा निवांत आहे.

आमच्या आजीला एक प्रश्न पडला होता की कोविड नसता तर कतरीना आणि विकी कौशलनं पहिली संक्रांत दणक्यात केली असती का? आता आपल्याला काय लग्नाला बोलावलं नव्हतं, त्यामुळे संक्रांतीचं आमंत्रण येण्याची शक्यताही कमी, म्हणून फिक्स उत्तर देऊ शकलो नाही. 

पण हा एक आहे, ही जोडी पुण्यातल्या पेठांमध्ये किंवा सहकारनगर, कोथरूड, सिंहगड रोड या परिसरात राहत असती… तर कॅट आपल्या पहिल्या सणाची शॉपिंग करायला तुळशीबागेतच आली असती हे फिक्स.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.