उद्धव ठाकरेंची फोन न उचलण्याची निंजा टेक्निक, ज्यानंच सरकार आलं आणि संकटात पण सापडलं

शिवसेना आमदारांच्या बंडांचं काय होणार ? याचं उत्तर आता विधानसभेत होणाऱ्या बहुमत चाचणीमधून मिळमन्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडे असलेलं संख्याबळ, त्यांना भाजपचा मिळणारा साहजिक पाठिंबा पाहता महाविकास आघाडीसाठी ही अग्नीपरीक्षा असणार आहे, हे नक्की.

सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सगळे पर्याय चाचपडून पाहणार यात मात्र दुमत नाही. हे पर्याय चाचपडण्यासाठी येत्या २४ तासात झपाट्यानं बैठका होतील आणि तितक्याच झपाट्यानं फोनही फिरतील.

आमदारांचे फोन नॉट रिचेबल होण्यापासून ते आता बहुमत चाचणीसाठी फोन फिरवण्यापर्यंत एका आठवड्यात शिवसेनेत बरीच खळबळ झाली. 

उद्धव ठाकरे यांनी २८ जुनला पुन्हा आमदारांना परतण्याचं, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचं आवाहन केलं होतं. मात्र ना आमदार आले, ना त्यांचा फोन. त्यातच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला मात्र फडणवीसांनी फोन उचललाच नाही, अशी बातमीही आली.

२१ जुनला जेव्हा एकनाथ शिंदे सुरतला मुक्कामी होते, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांना फोन केल्याची बातमी आली आहे. 

पण, फडणवीस यांनी फोन उचलला नाही. उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा फोन केला पण तरीही फडणवीस यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही असं सांगितलं जात आहे.

अशा मोक्याची प्रसंगी फोन न उचलून फडणवीस यांनी २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी फोन न उचलण्याच्या प्रकरणाचा पुरता हिशेब चुकता केल्याचं दिसतं. 

२०१४-१९ युतीनं पाच वर्षी एकत्रीत सत्ता भोगली होती. मात्र भाजपच्या सततच्या खच्चीकरणामुळे नाराज शिवसेना नाराज झाली होती. 

शिवसेना भाजपमध्ये एकत्र निवडणूक लढवूनही सत्ता स्थापनेसाठी चर्चा चालू होत्या. 

मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही या मुद्यावर चर्चा फिस्कटली. भाजपच्या वरच्या नेत्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं तर असा कोणताही शब्द दिला नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं. 

चर्चा फिस्कटल्यानंतर  उद्धव ठाकरे यांनी आपलं सगळ्यात जबरी हत्यार बाहेर काढलं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे फोन उचलणंच बंद केलं. देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेसाठी उत्सुक असल्याने त्यांच्याकडून फोन सुरूच होते, मात्र ठाकरे आपल्या खेळीवर ठाम होते आणि त्यांनी फडणवीस यांचा फोन उचललाच नाही. 

नंतर राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी फोन उचलला असता तर काही मार्ग निघाला असता असं म्हटलं होतं. 

ज्यांचा शब्द आम्ही कधी मोडला नाही त्यांनी माझा फोन उचलण्यास नकार दिल्यानं प्रचंड दुःख झाल्याचं म्हटलं होतं. अगदी फोन करण्याचं टायमिंग देउन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी चार वेळा फोन करून देखील फोन उचलला नाही.

उद्धव ठाकरे यांच्या या फोन न उचलण्याच्या कृतीचा भाजपने चांगलाच धसका घेतला.

उद्धव ठाकरेंनी जर पंतप्रधान मोदी, अमित शहा यांचा फोन उचलला नाही तर तो त्यांचा अपमान ठरला असता. 

त्यामुळं या मोठ्या नेत्यांनी तेव्हाच्या वाटाघाटींमध्ये भाग घेतला नव्हता असंही फडणवीस यांनी नंतर  सांगितलं होतं.

या एका फोन न उचलण्याने राजकारणाला कलाटणी मिळाली आणि महविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने चर्चेला वेग आला. 

सरकार स्थापन देखील झालं. मात्र आता हे सरकार पडण्यामागंसुद्धा उद्धव ठाकरे यांचं फोन न उचलण्याचं एक कारण पुढं आलं.

आम्हाला उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू दिले जात नव्हते. त्यांना अनेक फोन करावे लागायचे. मात्र अनेकदा  ते फोन उचलले जात नव्हते, असा आरोप आमदारांनी केला आहे. उद्धव ठाकरेंशी आमदारांचा रोडवलेला संपर्क हे आमदारांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या नाराजीमागील प्रमुख कारण असल्याचं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलं आहे.

मात्र या मधल्या काळात अनेकदा असे प्रसंग घडले आहेत ज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं फोन न उचलण्याचं धोरण वेळोवेळी कायम ठेवलं आहे.

शिवसेना सोडल्यानंतर ज्या नेत्यांना शिवसेननं अजूनही माफ केलं नाही त्यामध्ये एक नाव आहे नारायण राणे. 

त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांचा फोन उचलला नसल्याची तक्रार केली होती.
”मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची दररोज विचारपूस करतो. त्यांना फोन करतो, पण ते फोन घेत नाहीत.” असं नारायण राणे म्हणाले होते. २०२१ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे यांनी फोन केला होता.

अजून एकदा मुख्यमंत्री यांनी फोन न उचलला नसल्याचं अलीकडच्या काळातलं अजून एक उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका.

या निवडणुकीत सुरवातीला अपक्ष उमेदवार म्हणून संभाजी राजे छत्रपती यांनी फॉर्म भरला होता. त्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं होतं पण नंतर त्यांनी फोनच उचलला नाही. शेवटी संभाजीराजेंना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली.

हे अलीकडचेच काही प्रसंग असले तरी उद्धव ठाकरेंचं फोन न उचलण्याचं कल्चर जुनंच असल्याचं सांगितलं जातं. मातोश्रीवरून होणाऱ्या एकांगी संभाषणाचाच हा एक भाग असल्याचं दिसतं. मातोश्रीवरून आदेश येणार आणि तो कोणताही प्रतिप्रश्न न विचारता शिवसैनिकांनी पाळायचा अशी शिवसेनेची जुनी परंपरा आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी काही सुधारणा केली आहे. 

मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राग ,नाराजी, अबोला ते नकार या सगळ्यांसाठीच या फोन न उचलण्याचा स्ट्रॅटजीचा उपयोग केल्याचं सांगण्यात येतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.