भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून ‘१५ ऑगस्ट’ हीच तारीख का ठरविण्यात आली ..?

१५ ऑगस्ट १९४७.

ब्रिटीश सत्तेच्या गुलामीतून भारत स्वातंत्र्य झाला आणि लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा मानाने डोलायला लागला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अपरिमित त्यागातून आणि हौतात्म्यातून हे स्वातंत्र्य भारताला मिळालं. पण तुम्हाला कल्पना आहे का की भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट या तारखेचीच निवड का करण्यात आली आणि ही तारीख कुणी ठरवली..?

४ जून १९४७.

दिल्लीतील संसद भवनात भारताचे व्हॉईसरॉय ‘लॉर्ड माउंटबॅटन’ यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. देशविदेशातील जवळपास ३०० पेक्षा अधिक पत्रकार या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करण्याची जबाबदारी लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यासाठीच त्यांना भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

mountbatton
नेहरू, लॉर्ड माउंटबॅटन आणि जीना

आदल्या दिवशीच भारताच्या फाळणीवर शिक्कामोर्तब झालेलं होतं. भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती होणार या गोष्टीवर कुठलाही आडपडदा राहिलेला नव्हता. अशा परिस्थितीत लॉर्ड माउंटबॅटन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक महत्वाची घोषणा केली. ही घोषणा होती इंग्रज सरकारकडून भारताकडे सत्ता हस्तांतरित करण्याच्या तारखेची. अर्थातच भारताच्या स्वातंत्र्याची.

१५ ऑगस्ट १९४७  रोजी सत्तेचं हस्तांतरण केलं जाईल अशी घोषणा लॉर्ड माउंटबॅटन यांनी पत्रकार परिषदेत केली. खरं तर ही घोषणा आश्चर्यकारकच होती, कारण २६ जानेवारी १९४७ रोजी जेव्हा इंग्रज सरकारने भारताला स्वातंत्र्य द्यायचा निर्णय घेतला होता त्यावेळी ३० जून १९४८ पर्यंत भारताला स्वातंत्र्य द्यायचं असं इंग्रजांनी ठरवलं होतं.

भारतीय स्वातंत्र्याची घोषणा तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी केली पण मग प्रश्न आला की १५ ऑगस्ट हीच तारीख का..? लॉर्ड माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यामागचं कारण अतिशय वैयक्तिक होतं. माउंटबॅटन यांच्या वैयक्तिक अभिमानाशी ते जोडलं गेलेलं होतं.

१५ ऑगस्ट ही तारीख लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतःसाठी लकी मानत असत. कारण १९४५ साली ज्यावेळी दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली ती तारीख देखील १५ ऑगस्ट हीच होती. विशेष म्हणजे त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे मित्र राष्ट्रांच्या सैन्याचे प्रमुख कमांडर होते आणि त्यांनीच सिंगापूरमध्ये जपानची शरणागती स्वीकारली होती.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.