त्या एका व्यक्तीमुळे वहिदा रहमान बच्चनच्या थोबाडीत मारायला घाबरत होती…

हिंदी सिनेमाच्या ‘गोल्डन इरा’ मधील कलावंत ज्या वेळी त्यांची चरित्र किंवा आत्मचरित्र प्रकाशित होतात त्यावेळी त्या काळातील शूटिंगच्या दरम्यान झालेल्या अनेक गमती जमती वाचून रसिकांची चांगली करमणूक होते. वहिदा रहमान यांनी त्यांच्या Conversations with Waheeda Rehman या पुस्तकात ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटाची  एक आठवण सांगितली आहे.

‘रेश्मा और शेरा’ हा चित्रपटाची निर्मिती सुनील दत्तच्या अजंठा आर्ट्स ची होती. सुनील दत्त यांचा हा दिग्दर्शनातील मधील पहिलाच प्रयोग होता. या सिनेमाचे चित्रीकरण राजस्थान मधील वाळवंटात झाले होते. या चित्रपटात रेशमाची भूमिका वहिदा रहमान यांनी केले होते तर शेरा बनला होता सुनील दत्त. अमिताभ बच्चन यांची भूमिका शेराच्या भावाची होती कॅरेक्टर चे नाव होते छोटू.

‘रेश्मा और शेरा’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी बोलता न येणाऱ्या मुक्याची भूमिका केली होती!

आज आश्चर्य वाटेल आपल्या आवाजाने, डायलॉगच्या जोरावर सबंध दुनियेमध्ये नाव कमावणारे अमिताभ बच्चन यांना या सिनेमात मुक्याची भूमिका करावी लागेली! अमिताभ बच्चन यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातील हा चित्रपट असल्यामुळे त्यांना कदाचित ही भूमिका करावी लागली असेल. या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांनी सुनील दत्त यांची पत्नी नर्गिस यांच्यामार्फत वशिला लावला होता. 

नर्गीस आणि अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन या दोघी खूप चांगला मैत्रिणी होत्या. तेजी बच्चन यांनीच नर्गीस कडे अमिताभ बच्चन भूमिकेसाठी शब्द टाकला आणि अमिताभच्या वाट्याला ही भूमिका आली.

या चित्रपटाचे चित्रीकरण होत असताना स्वतः तेजी बच्चन देखील काही काळ तिथे शूटिंग लोकेशन्स वर आल्या होत्या. याच काळात एक शॉट चित्रित केला जाणार होता. ज्यामध्ये वहिदा रहमान रागाच्या भरात अमिताभ बच्चन यांच्या गालावर जोरात थप्पड मारते! शॉट चित्रीकरणाच्या पूर्वी बऱ्याच रिहर्सल झाल्या अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन मूकपणे सर्व पाहत होत्या.  

संध्याकाळी जेवताना वहिदाला त्या म्हणाल्या ,”उद्या रियल शॉट घेताना अमिताभला थोडीशी हळुवार थप्पड मार. आज बिचाऱ्याचा गाल सुजलाय!” मातेचं हृदय होतं; त्यांना तसं वाटणं साहजिक होता. पण शॉटची रिक्वायरमेंट ही जोरदार थप्पड मारण्याची  होती. वहिदाच्या समोर ‘धर्मसंकट’ उभे राहिले. काय करायचे? रात्रभर तिने विचार केला. सकाळी उठल्यानंतर तिनेच या प्रश्नाचे सोल्युशन काढले. 

वहिदा तेजी बच्चन यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली,” तुम्ही म्हणता ते, आई म्हणून ठीक आहे. पण शॉर्टची रिक्वायरमेंट आणि त्याला जर न्याय द्यायचा असेल तर मला अमिताभच्या गालावर जोरदार थप्पड मारावीच लागेल! त्यामुळे माझी आपल्याला विनंती अशी राहील की या वेळेला आपण कृपया सेटवर उपस्थित राहू नये! जेणेकरून आपल्या अनुपस्थितीमध्ये मला कंफर्टेबली हा शॉट चित्रित करता येईल!”

तेजी  बच्चन यांनी वहिदाचा सल्ला ऐकला आणि त्या दिवशी त्या सेटवर फिरकल्याच नाही. 

वाहिदाने पूर्णपणे त्या शॉर्टला न्याय देत एक जोरदार थप्पड अमिताभच्या गालावर दिली आणि शॉट ओके झाला. जाता जाता : सुनील दत्त दिग्दर्शित ‘रेश्मा और शेरा’ हा चित्रपट भारताच्या वतीने बर्लिन फिल्म फेस्टिवलला पाठवण्यात आला होता. तसेच ऑस्कर साठी देखील या सिनेमाची निवड झाली होती. हा सिनेमा अनेक कलावंतांसाठी महत्त्वाचा सिनेमा होता. 

अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राखी, अमरीश पुरी, रणजीत या सर्व कलावंतांना सिनेमाची  दारे उघडणारा हा सिनेमा होता.

 या सिनेमाला संगीत जयदेव यांचं होतं. या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेल्या दोन गाण्याने खरोखरच रसिकांना तृप्त केले. कवी बालकवी बैरागी यांनी लिहिलेले ‘तू चंदा मै चांदनी…’ तसेच कवी उद्धव कुमार यांनी लिहिलेले ’ इक मीठीसी  चुभन एक ठंडी सी  अगन..’ ही दोन गाणी म्हणजे लताच्या स्वरातील दोन रत्नजडित अलंकारच आहेत!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.