दिवाळीच्या प्रत्येक सणाचं नेमकं महत्त्व काय असतं.. ?

भावांनो दिवाळी आली. शॉपिंग वगैरे झाली ना ? फटाके आणणं, आकाशकंदील अडकवणं, किल्ला करणं हि कामं आवरतच आली असतील. या गडबडीत तुमच्या जनरल नॉलेजमध्ये भर टाकण्यासाठी दिवाळीच्या फराळाबरोबरच वैचारिक फराळ असलं काय म्हणतात ते द्यावं म्हणलं.

दिवाळी जोरात साजरी करायची हे आपल्याला माहिताय पण या दिवाळीचे पाच दिवस का साजरे करायचे हे काही आपल्याला माहित नसतं. दिवाळीच्या प्रत्येक दिवसामागं पुराणकाळापासून चालत आलेल्या काही मान्यता, काही कथा दंतकथा आहेत. त्या कथांविषयीच थोडस.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी.

या दिवसाच्या नावात जरी धन हा शब्द असला तरी त्याचा संबंध धनाशी नाही बरं का. समुद्रमंथनाच्यावेळी समुद्रातून निघालेल्या धन्वंतरी या अवताराचा हा उत्सव आहे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे.

धनत्रयोदशीसंबंधी अशीही एक कथा सांगतात की, इंद्रप्रस्थाचा राजा हंस एकदा शिकारीला गेला होता. शिकारीसाठी फिरत असताना वाटेत लागलेल्या एका लहानशा राज्यातील राजा हैम यान हंसराजाच चांगल स्वागत केल. त्याच दिवशी राजा हैमला मुलगा झाला होता. त्याची जन्मकुंडली पाहून ज्योतिषान भविष्यवाणी केली की, लग्न झाल्यानंतर चौथ्याच दिवशी राजपुत्र साप चावून मरण पावेल. राजा हंसने राजा हैमच्या या राजपुत्राला वाचवण्याचा निश्चय केला.

त्यानं यमुना नदीतील एका खोल डोहात घर बांधलं. राजा हैमला छोट्या या घरात सापाचा धोका नाही, अस राजाला वाटले. राजा हैम आणि त्याचा राजपुत्र या घरात राहिले. बरीच वर्षे होऊन गेली. राजपुत्र सोळा वर्षांचा झाला, तेव्हा त्याच लग्न केल. पण ज्योतिषाने सांगितल होत ते काही चुकल नाही.

लग्नाच्या चौथ्या दिवशी अचानक एक साप त्या घरात येऊन राजपुत्राला चावला.

राजपुत्र मरण पावला.राजा हैम आणि सार राजघराणं अतिशय दुःखी झाल. राजपुत्राचा प्राण न्यायला आलेल्या यमदूतांनाही त्या साऱ्यांच दुःख पाहवेना. तेव्हा यमदूतांनी यमराजाची प्रार्थना केली आणि त्याला विनंती केली की, असं कोणाच्याही वाट्याला येऊ नये.

तेव्हा यमराजाने असे सांगितल की, दिवाळीचे पाच दिवस जे लोक दीपोत्सव करतील, त्यांच्या वाट्याला अस दुःख येणार नाही.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी.

या दिवशी सर्वजण आपले घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ करतात. भल्या पहाटे सर्वजण अभ्यंगस्नान करतात. नरक चतुर्दशी बद्दल अशी कथा आहे की, कामरूप इथं नरकासुराने सोळा हजार राजकन्यांना बंदिवासात ठेवल होत. श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध केला आणि त्या राजकन्यांना सोडवल. या नरकासुराच्या वधामुळेच नरकचतुर्दशी साजरी केली जाते.

दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे आश्विन अमावास्येचा.

या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य अस स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धार्मिक स्त्रीपुरुष असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. म्हणूनच त्यादिवशी संध्याकाळी लोक घरोघर दीपोत्सव करून समृद्धीचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीच पूजन करतात. हाच दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो.

त्यानंतर येणारा दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे कार्तिक प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा.

विक्रम संवताचा हा पहिला दिवस ‘पाडवा’ म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी व्यापाऱ्यांच नव वर्ष सुरु होत. व्यापारी वहीपूजन करून नव्या खातेवह्या सुरू करतात. या दिवशी स्त्रियां आपल्या पतीस ओवाळतात.

या दिवसाची कथा अशी आहे की पृथ्वीवर बळी नावाचा राजा होता. तो फार उदार, धर्मप्रिय आणि प्रजेचा आवडता होता. पुष्कळ यज्ञ करायचा. या यज्ञांच्या पुण्याने तो स्वर्ग जिंकून घेईल अशी देवांना भीती वाटू लागली. देव भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूने वामन नावाच्या ब्राह्मण बटूच रूप धारण केले आणि तो यज्ञ चालू असताना बळी राजाकडे गेला. बलिराजाने त्याच स्वागत केल आणि ‘हव ते माग’ अस म्हटले. बटू वामनाने फक्त तीन पावले जमीन मागितली. बळी राजान ती देण्याचे वचन दिले. आता वामनाचे रूप घेतलेल्या विष्णूने प्रचंड रूप धारण केले.

एका पावलाने पृथ्वी व्यापली, दुसर्या पावलान स्वर्ग व्यापला आणि बळी राजाला विचारले, “राजा, तिसरे पाऊल कुठे ठेवू?” बळी राजाने वामनापुढ गुडघे टेकलें आणि म्हटल, “माझ्या डोक्यावर ठेव.”

वामनाने बळी राजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून त्याला पाताळात ढकलले आणि स्वर्गावरचे संकट दूर केले.

या थोर राजाचे स्मरण ठेवणारा हा बलिप्रतिपदेचा दिवस. साडेतीन शुभ मुहूर्तामध्ये गुढीपाडवा, दसरा आणि बलिप्रतिपदा हे तीन मूहर्त आणि अक्षय्य तृतीया हा अर्धा मुहूर्त मानला जातो.

आता दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज.

या दिवशी भाऊ बहिणीकडे येतो. बहीण त्याला ओवाळते व तो आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून तिला ओवाळणी घालतो. भाऊबीजेची कथा अशी आहे की, यम आणि यमी अशी भावंड होती. यम मृत्यू पावला, तेव्हा यमी फार दुःखी झाली. तिचे दुःख काही कमी होईना.

तेव्हा देवांनी रात्र निर्माण केली. अशा काही दिवस-रात्री गेल्यावर काही काळ गेला असे वाटून यमीचे दुःख कमी झाल. या भावंडांच्या प्रेमाची आठवण म्हणून हा भाऊबीजेचा दिवस.

असा हा दीपोत्सवाचा दीपावलीचा सण. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.