फोन बंद असताना देखील रिंग वाजल्याचा भास का होतो ? 

घरात शांतता आहे. आवाज येण्यासारख काहीच नाही. कोपऱ्यातल्या फोनकडे कधी नव्हे ते तुमचं लक्ष नाही अचानक फोनची रिंग वाजते तुम्ही भानावर येता तर रिंग गायब. कुणाचा फोन होता म्हणून फोन घेता तर एकपण मिस्डकॉल नाही. साधा मॅसेज पण नाही.

गाडीवरुन चाललाय. खिश्यात फोन आहे. अचानक फोन वाजतो. तुम्ही गाडी बाजूला घेता. खिश्यातून फोन काढतां. एकपण रिंग नाही. मग कुणाचा फोन वाजला.

होतं अस कधीकधी म्हणून तुम्ही एकतर वेळ मारून नेता. नाहीतर आपल्याला येड लागलय म्हणून शांत बसता. कधीकधी मित्रांना आपलं दूख सांगायचा प्रयत्न करता. पण मित्र येडा ठरवतील म्हणून सुमडीत कुंबडी करता. शांत डोक्यानं रात्रीच्या अंधारात आपल्याला येड लागलय का याचा विचार करु लागता तोच पुन्हा फोन वाजण्याची शक्यता असते. अस सारखं सारखं होत असेल तर एक लक्षात घ्या तूम्ही येडे नाहीत. जगातल्या ८० टक्के ( ही टक्केवारी बोगस आहे. कुठही ८० टक्के अस उत्तर आलं तर विश्वास ठेवू नका आपण दहावीचे पण मार्क तितकेच सांगितले होते हे लक्षात असू द्या ) तर जगातल्या ८० टक्के लोकांना असा भास होतो.

नेमकं अस का होतं ?

का होतं या प्रश्नाच्या अगोदर हे चांगल आहे की वाईट आहे ते महत्वाचं आहे. तुम्हाला जर असा भास होतं असेल तर तुमचं डोकं ठिकाणावर आहे अस समजून जा. या प्रकाराला परसेप्चुअल जजमेंट अस म्हणलं जातं. म्हणजेच तुमचा मेंदू आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पर्यायातून एक पर्याय अनपेक्षीतपणे निवडू पाहतो. या प्रकाराला फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम अस देखील म्हणतात.

डोक्याचे डॉक्टर या प्रकाराची तुलना सिग्नल डिटेक्शन थेअरी बरोबर करतात. म्हणजेच तुम्ही एखाद्या गोष्टीचा सारखा विचार करु लागला तर मेंदू त्याला उत्तर देवू लागतो. म्हणजेच माझा फोन वाजतोय काय ? असा प्रश्न तुम्हाला पडतो तेव्हा मेंदू अनपेक्षीत पणे नाही अस उत्तर तुम्हाला पाठवतो. पण काही वेळा मेंदू कडवा होतो. म्हणजे जाणुनबुजून म्हणा किंवा तुमच्या सारखं प्रश्न पडण्याच्या सवयीमुळे म्हणा मेंदू तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी होय अस उत्तर देखील पाठवतो. थोडक्यात हा मेंदूचा केमिकल लोचा पण आहे आणि कांड पण.

त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुमचा फोन वाजेल आणि तुम्ही तो हातात घेतला तर डिस्प्लेवरती काहीच दिसलं नाही तर टेन्शन घेवून नका. आपल्या मेंदूने केलेलं हे कांड आहे म्हणा आणि मेंदूला माफ करा. 

Leave A Reply

Your email address will not be published.