म्हणून जगातल्या सगळ्या बाप आयडिया बाथरूममधेच सुचतात…

आमचा एक मित्र आहे त्याला तासनतास बाथरूममध्ये बसायला आवडतं. अगदी कितीही वेळ तो आतमध्ये बसू शकतो. कसलं मनन चिंतन करतो देव जाणे पण आहे लई हुशार. ऐन ऑफिसच्या वेळात हा गडी बाहेरच येत नाही म्हणून बाकीचे घरातले कावलेले असतात.

पण भावाचं बाथरूम प्रेम  नेक्स्ट लेव्हल आहे. आता हा काही अजब शौक नाहीये. आपल्यातल्या अनेकांना ही सवय असणारे हे फिक्स. त्याही पुढे जाऊन एक भन्नाट गोष्ट सांगायची म्हणजे बाथरूममध्ये जास्त क्रिएटिव्ह आणि धमाकेदार कल्पना सुचतात.

असं आम्ही नाही एक अभ्यास सांगतो. बाथरूममध्ये तासतास भर बसून विचार करणाऱ्यांच्या या सवयीला एक कारण आहे.

हे खरं आहे चेष्टा नाहीये. आयुष्यातल्या सगळ्या बाप आयडिया या बाथरूममध्ये बसून का येतात ? हे समजून घ्यायला एक प्रयोग केला गेला होता. याला ‘शॉवर इफेक्ट’ असं सुद्धा म्हटलं जातं.

याबाबत लेटेस्ट प्रयोग केला होता झॅक एरविंग यांनी, जे युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामध्ये फिलॉसॉफी ऑफ कॉग्निटिव्ह सायन्स हा विषय शिकवतात. त्यांच्यामते अति जास्त लक्ष केंद्रित करून काम करणं क्रिएटिव्हिटीसाठी चांगलं नाही.

त्यामुळे जास्त वेळ काम करत असाल, एखादा मोठा प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करत असाल तर त्याच्या मागे सतत डोकं लावण्यापेक्षा थोडावेळ ब्रेक घेऊन बाथरूममध्ये वेळ घालवणं म्हणजे छान अंघोळ करणं एकदम फायद्याचं आहे.

याचं कारण असं की अंघोळ करताना मनात एक असा ठराविक विचार नसतो. मुक्तपणे असंख्य विचार फिरत असतात आणि त्यामुळे एका विचारावर लक्ष केंद्रित न होता मन मुक्तपणे बाकी गोष्टींचाही विचार करतं. 

यामुळे वेगळे मुद्दे डोक्यात येतात आणि वेगळीच विलक्षण वाटणारी आयडिया सुद्धा मनात येऊ शकते.

झॅक एरविंग यांच्या साथीदारांनी यासाठी दोन प्रयोग केले.

एक प्रयोग केला २२२ सदस्यांवर ज्यात बहुतांश संख्या महिलांची होती. या दोन्ही प्रयोगात लोकांना काही टास्क दिले गेले. सुरुवातीला ९० सेकंदात वीट आणि पेपरक्लिप याच्या वापराबद्दल नवीन कल्पना काढून ठेवा असं सांगितलं तर त्यानंतर टास्क दिले.

एका ग्रुपला ‘When harry met sally’ सिनेमातला एक सिन दाखवला गेला, तर दुसऱ्या ग्रुपला एक विडिओ दाखवला ज्यात एक व्यक्ती धुवायचे कपडे घेऊन रांगेत उभा आहे. हे विडिओ बघून झाल्यावर त्यांना प्रत्येकी ४५ सेकंद मिळाले ज्यात त्यांना आधीच्या टास्कमध्ये काही नव्या कलपेनची भर घालायची असेल तर ती सांगायची होती.

शेवटी प्रतिसाद्कर्त्यांना विचारल्यावर ज्यांनी धुण्याचे कपडे घेऊन उभ्या असलेल्या माणसाचा विडिओ पहिला त्यात त्यांना बोअर झालं आणि कंटाळा आला पण त्यामध्ये त्यांना भन्नाट कल्पना सुचली, तर दुसरीकडे ज्यांना सिनेमातला सीन दाखवला त्यांना फारशी कल्पकता दाखवता आली नाही कारण तो सीन जास्त लक्षवेधी होता.

दुसऱ्याही प्रयोगात असेच परिणाम समोर आले. यातून समोर आलं की जेव्हा तुमचं डोकं जेव्हा शांत असतं तेव्हा डोकं अधिक वेगाने प्रॉब्लेम सोडवू शकतं.

ज्यांना एकदम कंटाळवाणा विडिओ दाखवला त्यांच्या डोक्यात तेव्हाही नवीन कल्पनांचा विचार सुरु होता आणि त्यामुळे त्यांना पटकन कल्पना सुचली. पण लक्ष वेधून घेणाऱ्या विडिओमुळे तसं झालं नाही. डोकं शांत ठेवायला फक्त अंघोळ करणं काम करत नाही तर त्याऐवजी मेडिटेशन करणं, एखादा लॉन्ग वॉक करून येणं सुद्धा काम करू शकतं.

मानसोपचारतज्ञ रॉन फ्राईडमन हे गेले अनेक महिने वर्क परफॉर्मन्स या विषयाशी निगडित ऑनलाईन बैठक बोलवतात ज्यात जगातल्या काही प्रॉडक्टिव्हिटी विषयातल्या तज्ञांना सुद्धा निमंत्रण असतं. त्यामध्ये स्कॉट बॅरी काऊफमन या कॉग्निटिव्ह सायन्स तज्ञांनी सुद्धा असं सांगितलं की त्यांनी केलेल्या अभ्यासात असं लक्षात आलंय की ७२% लोकांना प्रॉडक्टिव्ह विचार हे बाथरूममध्ये येतात.

या अभ्यासात रिलॅक्स असण्यावर जास्त भर देण्यात आला आहे. शॉवरमध्ये एकांत, निवांतपणा आणि नॉन-जजमेंटल वातावरण असतं. असं वातावरण विचारांना मुक्तपणे फिरायला परवानगी देतात.

याच्याशी निगडित अजून बऱ्याच थिअरी आहेत.

‘SciShow Pysch’ यांच्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की. शॉवरमध्ये येणाऱ्या कल्पनांना insight solution म्हणतात. रोजच्या आयुष्यात अनेक ऍनॅलॅटिकल प्रॉब्लेम्स येत असतात जे सोडवायला सोपे असतात आणि त्यांना सोडवायला एक पद्धत असते. पण मोठे म्हणजे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतात त्याची उत्तर अचानकपणे मिळतात जेव्हा त्याचा विचार फारसा केला जात नसतो.

आपलं सुप्त मन ज्याला सबकॉन्शियस माईंड म्हणतात जिथे अशा मोठ्या प्रॉब्लेमबद्दल केलेला सततचा विचार जमा होतो आणि आपला मेंदू जाणीवपूर्वक विचार होत नसतानाही त्या मोठ्या प्रॉब्लेमवर काय मार्ग शोधता येईल असा विचार करत असतो.

त्याला मानसोपचारच्या भाषेत इन्क्युबेशन म्हणतात ज्यावर अभ्यास सुरु आहे. पण त्यातून मिळणारी प्रेरणा महत्त्वाची असते. त्या प्रेरणेतून आपल्याला पटकन उपाय मिळून जातो ज्यावर आपलं सुप्त मन सातत्याने काम करत असतं.

याविषयी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन अभ्यासकांनी १११४ प्रतिसादकर्त्यांचा अभ्यास केला ज्यात त्यांनी हे इन्साइट सोल्युशन कधी अनुभवले आहेत का यावर भर होता.

 त्यात ८०% लोकांनी हे अनुभवलं असल्याचं समजलं आणि हे जास्त करून रात्री, कामाच्या ठिकाणी, आणि शॉवरमध्ये असताना घडल्याचं त्यांना जाणवलं.

म्हणजे जगात अनेक साक्षात्कार हे बाथरूममध्ये होऊ शकतात हे काही खोटं नाहीये. आता कधीही ताण आला की शॉवरमध्ये जाऊन साक्षात्काराचं फीलिंग घ्यायला विसरू नका.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.