समजून घ्या ग्रामपंचायतीला मतदान का करायचं असतं…

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. बऱ्यापैकी ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. तर राहिलेल्यांसाठी उद्या मतदान होत आहे. मागच्या महिनाभरापासून पायाला भिंगरी बांधून जीव-तोड प्रचार करणाऱ्यांचं गावगाडा चालवायला मिळणार कि नाही हे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.

पण त्यासाठी आधी आपण सगळ्या मतदारांनी मतदान केंद्रांपर्यंत जावून मतदान करणं गरजेचं आहे. अगदी कोणाला पण करा. कारण ग्रामपंचातील मतदान करणं हे तेवढंच महत्वाचं आहे जेवढं आपण लोकसभा, विधानसभेला करत असतोय. काही जण उच्चशिक्षित, नोकरी-निम्मित राहायला बाहेर असतील पण मतदानाला गावात या आणि मतदान करा.

आता तुम्ही म्हणाल भिडू एवढं का तळमळीनं सांगतोय?

तर कारण समजून घ्या ग्रामपंचायतीला मतदान का करायचं असतं? निवडून दिल्यानंतर त्यांची काय काम असतात?

जशी राज्याच्या कामांची यादी आणि अधिकार सांगणारी राज्यसुची असते, केंद्राची केंद्रसूची असते अगदी त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे अधिकार आणि कर्तव्ये सांगणारी ग्रामसूची असते. त्यात नमूद केलेल्या गोष्टींचा विकास करणे हे ग्रामपंचायतीचे काम असते.

यानुसार गावातील कर गोळा करून मूलभूत सोयी सुविधा पुरवणं हे ग्रामपंचायतीचं मुख्य काम असत. आपल्या हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवरील कर, व्यवसाय कर, यात्रा कर, जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील कर असे विविध कर गोळा करायचे असतात.

पण हे नुसतं कर गोळा आपल्याकडे ठेवायचे नसतात, तर वर सांगितल्या प्रमाणे मूलभूत गोष्टी पण द्यायच्या असतात. यात गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या आणि खर्चाच्या पाण्याची सुविधा, गावातील साफ-साफई अशा गोष्टी असतात. हे केल्यानंतर देखील ग्रामपंचायतीची जबाबदारी संपत नाही.

या कामांशिवाय जलसंधारण आणि गावातील सार्वजनिक पाणवठयाची देखभाल, सार्वजिनक आरोग्य व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, पशुसंवर्धन, पर्यावरण, कुपोषण, पीक पद्धती, शेती आणि शेतकरी विकास, अतिक्रमणे आणि अवैध बांधकामे, वृक्षतोड, वनीकरण, साक्षरता आणि शिक्षण, रोजगार, सार्वजनिक मालमत्तांची देखभाल, ग्रामसुरक्षा, गावातील दारूबंदी, प्रदूषण नियंत्रण, अंधश्रद्धा निर्मूलन, बालमृत्यू रोखणं, बाजारव्यवस्था, गटशेती, सौरउर्जा अशी किती तरी कामे सांगता येतील.

आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार म्हणतात,

ग्रामपंचायत ही गावाची आई असते. तिला गावाचं संगोपन, विकास, पालनपोषण करावं लागतं. गावाचं मानसिक, बौद्धिक व भौतिक अंगाने वातावरण सांभाळावं लागतं.

ही सगळी काम फक्त सरपंच आणि ग्रामपंचायतच करू शकतो. सरपंचांची भूमिका खूप मोलाची आहे. ते केवळ मानाचं, राजकारणाचं साधन नसून गावविकासाचं किवा समाजकारणाचं प्रभावी साधन आहे हे सरपंच मंडळींनी ध्यानात घ्यायला हवं, असे ही पवार म्हणतात.

आपल्या देशात एका गावाकरता केंद्र, राज्य सरकार आणि इतर अशा मिळून जवळपास ११४० योजना असतात. आता कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, हे ते गाव कोणत्या जिल्ह्यात येतं, कोणत्या भौगोलिक क्षेत्रात येतं, यानुसार ठरतं.

निधीच म्हणाल तर जर संबंधित योजना राज्य सरकारची असेल तर १०० टक्के निधी राज्य सरकार देतं आणि केंद्राच्या बहुतांश योजनांसाठी ६० टक्के केंद्र सरकार, तर ४० टक्के राज्य सरकार देतं.

१ एप्रिल २०२० पासून १५ वा वित्त आयोग सुरू झाला आहे. त्यानुसार सरकार गावातल्या प्रति माणसी प्रति वर्षी सरकार ९५७ रुपये देत आहे. १४ व्या वित्त आयोगासाठी ही रक्कम ४८८ रुपये होती.

आता सरकार आपल्यावर प्रत्येक वर्षी ९५७ रुपये खर्च करत म्हणल्यावर त्यावरून तरी समजून घ्या कि मतदान करणं किती महत्वाचं असतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या पंचायती राज दिवसाला म्हणजेच २४ एप्रिल २०२० रोजी ‘ई-ग्राम स्वराज’ या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचं लोकार्पण केलं.

या अ‍ॅपवर गावातील प्रत्येक नागरिकाला आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काय चाललंय हे घरबसल्या समजू शकत. तिथल्या विकासकामांची, ते कुठवर आलं आहे, ग्रामपंचायतीसाठी किती निधी आला, तो निधी कुठे खर्च झाला, ही सगळी माहिती उपलब्ध असते.  

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.