लग्नानंतर पंधराच दिवसात नवरा देशासाठी शहीद झाला, गेली ५४ वर्ष मी एकटी घर चालवते.

युद्ध व्हायला हवं, आपले मारले आपण त्यांचे मारु.

म. गांधी म्हणाले होते An eye for an eye leaves the whole world blind” पण युद्धात अशा मोठ्या लोकांच्या वाक्यांना अर्थ नसतो. युद्धात बदला घ्यावाच लागतो. त्यामुळे कुणाच्या घरातली चुल कायमची बंद होणार आहे? त्यामुळे कुणाचे संसार निम्यावर तुटणार आहेत याचा विचार दोन्ही बाजूंनी केला जात नाही. 

सामान्य नागरिकांना युद्धाच नेहमीच आकर्षण असतं. कोणत्याही राष्ट्राने आपली कुरापत काढली असेल तर ते करावं देखील. सैनिक जसा मारायला भित नाही तसाच मरायला देखील भीत नाही. पण या सर्व गोष्टींच्या मागचा इतिहास काय असतो. भारतीय हवाई दलाचे शहीद वैमानिक निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नी विजेता काल माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या,

युद्ध नकोच, युद्धामुळे काय होतं ते तुम्हाला माहित नाही. युद्धाचे परिणाम ज्यांना भोगावे लागतात त्या शहिदांच्या कुटूंबाना विचारा.

या भावना आपण समजून घेणार आहोत का? हो किंवा नाही हा नंतरचा प्रश्न पण,

अशाच एका आज्जींची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या आज्जी गोव्याच्या. आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्यासोबत बोललो त्यांनी जे आम्हाला सांगितलं ते तुमच्यापुढे. 

त्यावेळी त्यांच वय अवघं पंधऱा वर्षांच होतं. होणारा नवरा सैन्यात होता. पंधरा वर्षांच्या त्या मुलीला नवरा सैन्यात असल्याचं कौतुक होतं. तो पंधरा वर्षाचा आणि होणारा नवरा एकवीस वर्षांचा. दोघांच लग्न झालं ते वर्ष होतं १९६५ चं. लग्नाला अवघे पंधरा दिवस झाले होते. नव्या संसाराच स्वप्न ती पंधरा वर्षाची मुलगी पहात होती.

अशातच त्या २१ वर्षांच्या तरुणाला सैन्याकडून बोलावणं आलं. युद्धाला सुरवात झाली. तातडीने हजर व्हा. अवघ्या पंधरा दिवसाच्या संसाराकडे पहात तो तरुण देशासाठी निघाला. 

आपला नवरा पराक्रम गाजवून नक्कीच काही दिवसात परत येईल यावर त्या पंधऱा वर्षाच्या मुलीचा ठाम विश्वास होता. नव्या लग्नाची स्वप्न पहात ती इकडे दिवस ढकलत होती तोच एक दिवस तिच्या हातावर तार आली. तिचा नवरा युद्धामध्ये शहीद झाल्याची ती तार होती. मोठ्या शांत मनाने तीने देशासाठी म्हणून ते दूख: पचवलं. काही दिवसातच भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच पत्र आलं. तिच्या नवऱ्याच्या बलिदानाचं कौतुक करण्यात आलं होतं. 

हि सत्यकथा आहे गोव्यातल्या पेडणे गावातल्या तुकाराम गवस यांच्या बलिदानाची आणि त्यानंतर एकटीने संसार उभा केलेल्या लीलावती गवस या आज्जींची. 

नेमकं काय झालं अस विचारल्यानंतर आज्जींनी सांगितलं, 

१९६५ च्या युद्घ चालू होतं. रात्री चौकीवर असणाऱ्या तुकाराम गवस यांनी पाकिस्तानच्या रणगाड्यांचा होणार आक्रमण दिसलं. त्या रात्री तुकाराम गवस यांच्यासह चौकीवर फक्त दहा सैनिक होते. या दहा सैनिकांनी आक्रमणाची बातमी वरिष्ठांना कळवली व वाट न पहाता स्वत: पाकिस्तानी सैनिकांना रोखण्यासाठी पुढे गेले. झालेल्या चकमकीच त्यांना वीरमरण आलं. 

काही दिवस शहीद म्हणून त्यांना गौरव करण्यात आला. त्यानंतरच्या काळात लोक विसरुन गेले. पण 1965 च्या युद्धात वीरमरण आलेल्या तुकाराम गवस यांना लोक विसरले नाहीत. पडणे गावात या 15 वर्षांच्या लीलावती आज्जीने एकट्याने संसार पुढे ढकलला. आजही त्यांना पंचक्रोशीत ओळख आहे ती त्यांच्या वीरमरण पत्करलेल्या नवऱ्यामुळे, पण गेली 54 वर्ष त्यांनी एकट्याने काढलेल्या या दिवसांचा हिशोब मात्र सहजपणे युद्धाची अपेक्षा व्यक्त करणारा कोणताच व्यक्ती देवू शकणार नाही. 

त्या बोलत असताना सहज म्हणाल्या, 

मला मुलही नाही, ते असते तर.. पण घरातील, गावातील इतर मुलं हि आपलीच मुलं म्हणून दिवस ढकलले. आज कोणी त्यांना शहीद तुकाराम गवस यांच्या नावाने ओळखल की त्यांनाही बर वाटतं.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.