Wifi ची रेंन्ज जातेय, ५ उपाय सांगतोय करुन बघा…

२०२० पासून पनवतीच लागलीय आमच्या वायफायला. सततच आपलं लॉकडाऊन.. चार सहा महिने नीट गेले तर परत लागतय लॉकडाऊन. मग घरात बसून नेटफ्लिक्स, हॉटस्टार बघावं म्हणलं तर ती पण स्कीम गंडतीय.

एकदम काहीतरी मस्त सिन चालू असतो आणि वायफायची दांडी गुल. च्यामारी या वायफायचा स्पीड कमी झाला रे झाला की, कोरोना झाल्याचा फील यायला लागतोय. जस कोरोना पेशन्टला ऑक्सिजन कमी पडल्यावर वाटत ना सेम तसंच.

मग ही वायफायची दांडी पडू नये (म्हणजेच वायफायची रेंज) आणि आपला श्वास शाबूत राहावा यासाठी जरा शोधाशोध केली तर कायतरी घावलंय..

तर वायफाय म्हणजे बेसिकली रेडियो व्हेव्ज असतात. जस तुमच्या फोनवर इंटरनेट वापरताना इलेकट्रोमॅग्नेटीक व्हेव्ज लागतात सेम तशाच. पण मोबाईलसाठी मिळणारी रेंज ही आपल्याला टॉवर थ्रू मिळते जी खूप स्ट्रॉंग असते. ज्याला AM रेडीओ टॉवर असं म्हणता येईल. तेच वायफाय राऊटरची इलेकट्रोमॅग्नेटीक व्हेव्ज ही तुलनेत कमी असते. एक १२ सेंटीमीटर लांब असेल. आणि ती जसजस त्या राऊटर पासून दूर जाऊ तसतस रेंज कमी व्हायला सुरवात होते.

पण कधी कधी वायफायच्या जवळ असून ही रेंज कमी का येते?

तर त्याच कारण असं आहे कि, जेव्हा राऊटर मधून बाहेर पडणाऱ्या इलेकट्रोमॅग्नेटीक व्हेव्ज आणि युजर यांच्यात एखादी स्थायू वस्तू (भिंत, कपाट) येते तेव्हा त्या ती रेंज त्या वस्तूकडून अक्षरशः शोषली जाते आणि आपली वायफायची एकेक दांडी गायब व्हायला सुरवात होते.

तर आपली एक एक दांडी बचाव मोहीम कशी आखाल

नंबर एक, वायफायचा राउटर आपल्या घराच्या किंवा रूमच्या बरोबर सेंटर पॉईंटला ठेवा. जेणेकरून रेंज सर्क्युलर मोशन मध्ये सगळीकडे फेकली जाईल. (शक्यतो रूमच्या मधोमध काही अडथळे नसलेल्यांसाठी हा उपाय आहे.)

नंबर दोन,

आपलं वायफाय राऊटर शक्यतो उघड्यावर ठेवा. तुम्ही ते कपाटात ठेवाल तर कपाट तुमची रेंज शोषून घेईल. तुम्ही ते शोकेस मध्ये ठेवाल तर तिथे पण रेंज शोषलीच जाईल. तर शक्यतो राऊटर एका उघड्या जागेवर एका सरळ दिशेत ठेवा. जेणेकरून युजर आणि राऊटरच्या रेंज मध्ये काही अडथळा येणार नाही.

नंबर तीन,

तुमचं राऊटर जमिनीपासून उंचावर ठेवा. आपली घरातली जमीन ही मेटल, काँक्रीट, सिमेंट अशा गोष्टींनी बनलेली असते. आणि अशा वस्तूंमधून रेंज पास होत नाही. काही राऊटर्सची रेंज फेकण्याची दिशा ही डाउनवर्ड डायरेक्शन म्हणजे खालच्या दिशेने असते. मग जर तुम्ही राऊटर जमिनीवर ठेवलात तर रेंज कमी पडणारच.

नंबर चार,

राऊटर इतर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या संपर्कात ठेऊ नका. बेसिकली आपला रेडिओ, टी. व्ही. कम्प्युटर, मायक्रोवेव्ह यांच्या आत एक मोटर असते जी राऊटर मधून निघणाऱ्या रेंजशी इंटरॅक्ट होते. आणि मग सुरवात होते दांड्या उडायला. थोडक्यात रेंज कमी पडायला लागते.

नंबर पाच,

हा फॉर्म्युला एकदम नवीन आणि झक्कास आहे. यात आपल्या राऊटरचा अँटेना एक वर आणि खाली असा सेट केला कि, 380p वर चालणारा व्हिडीओ 1080p वर चालतोय. आपल्या डिव्हाइसेसचे अँटेना जर राऊटरला पॅरलल असतील तर रेंज जास्त पकडली जाते. पण तुम्ही एकाचवेळी लॅपटॉप आणि मोबाईल वापरत असाल तर रेंज पॅरलली कनेक्ट होत नाही. आणि कसाय न मोबाईल तुम्ही कसा पकडलाय याच्यावर पण रेंज डिपेंड असते.

तर मोबाइल हा अँटेनाला समांतर धरा.. मग तुमची दांडी उडत नाही.. सीन थांबत नाही.. सगळं कस जोरात पळतय..

तरिही नाय पळत तर आम्हाला फोन करुन विचारू नका, स्वत:च्या कर्माला दोष द्या. धन्यवाद.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.