पश्चिम बंगालमधील हुल्ला पार्टी सुद्धा विदर्भात आलेल्या हत्तींना हुसकावून लावू शकत नाहीये

गेल्या काही महिन्यापासून पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या भागात जंगली हत्तींनी हौदोस घातला आहे. मुळात ओरिसाच्या जंगलात राहणारा हा २२-२३ जंगली हत्तींचा कळप गेल्या ४-५ महिन्यापासून विदर्भात दाखल झालाय.

या कळपाला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये पश्चिम बंगालमधील हुल्ला पार्टीला सुद्धा बोलावण्यात आलंय, पण हत्तींचा कळप महाराष्ट्रातून बाहेर जाण्याऐवजी महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे हा कळप इथेच स्थायिक होतील का अशी शंका व्यक्त केली जातेय.

दिवसेंदिवस विदर्भात हौदोस घालत असलेला हा हत्तींचा कळप महाराष्ट्रात येण्यामागे काही नैसर्गिक कारणं आहेत, त्यामुळेच ही शंका बळावली आहे. 

मध्य पूर्व भारतातील जंगलांची आणि पर्यावरणाची परिस्थिती पहिली तर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांपासून छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील जंगलात एकाच प्रकारचं वातावरण आहे. घनदाट जंगल, अधेमधे मैदान आणि भाताची शेती आणि मोहफुलाची दारू काढणारे आदिवासी. हे वातावरण पूर्व भारतातील हत्तींसाठी अतिशय पोषक आहे. 

यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या जंगलांमध्ये हत्तीचे मोठं मोठे कळप राहतात.

२०१७ च्या प्राणिगणनेनुसार ओडिशा राज्यात एकूण १,९७६ हत्ती आहेत, पश्चिम बंगालमध्ये हत्तींची संख्या अंदाजे ५०० च्या आसपास आहे तर झारखंड राज्यात ६७९ हत्ती राहतात. परंतु १९८० च्या दशकापासून झारखंड आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर खाणकाम वाढत आहे. या खाणकामामुळे हत्तींचं नैसर्गिक अधिवास धोक्यात येत असल्यामुळे हत्तींनी हळूहळू छत्तीसगढच्या जंगलात स्थलांतरण करण्यास सुरुवात केली.

१९८८ पासून ओडिशा आणि झारखंड राज्यातील हत्ती छत्तीसगढमध्ये यायला लागले. तेव्हापासून हत्तीच्या येण्याची ही प्रक्रिया सुरूच आहे. सुरुवातीची काही वर्ष हे हत्ती काही काळासाठी यायचे आणि परत मुळ जंगलात चालले जायचे. परंतु १९९५ पासून हत्ती छत्तीसगढच्या जंगलात स्थायिक व्हायला लागले.

पण आता याच हत्तींनी छत्तीसगढ ओलांडून महाराष्ट्रात मोर्चा वळवला आहे.

पूर्व विदर्भातील भरपूर पावसाचा पट्टा, नदी नाल्यांमध्ये असलेलं पाणी, उपलब्ध असलेला हिरवा चारा आणि हत्तींना आवडणारी मोहफुलाची दारू या कारणांमुळे २०१४ मध्ये पहिल्यांदा हत्तींचा कळप छत्तीसगढमधून महाराष्ट्रात आला होता. मात्र काही महिन्यानंतर हा कळप परत छत्तीसगढमध्ये चालला गेला होता. मात्र २०२१ मध्ये पुन्हा हत्तीचं कळप महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला.

या वेळेस सुद्धा हत्ती परत जातील अशी अपेक्षा होती, मात्र या कळपाने महाराष्टाच्या सीमेलगतच छत्तीसगढमध्ये वास्तव्य सुरु केलं. त्यानंतर यंदा परत हा कळप गडचिरोलीच्या जंगलात दाखल झाला. कळपाला पळवून लावण्याचे प्रयत्न करण्यात आले परंतु आता हा कळप महाराष्ट्रात आणखी आतमध्ये शिरत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून आत आलेला हा कळप आसपासच्या चारही जिल्ह्यांमध्ये फिरत आहे.  

या हत्तींना पळवून लावण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये वनविभागाने पश्चिम बंगालच्या हुल्ला पार्टीला बोलावलं.

हुल्ल पार्टी म्हणजे एक प्रकारची टोळी असते. पश्चिम बंगालमध्ये असलेले हत्ती जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये शिरून घरं आणि शेतीचं नुकसान करतात. या हल्ल्यात अनेक गावकऱ्यांचा मृत्यू देखील होतो. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू होण्यात पश्चिम बंगाल आघाडीचं राज्य आहे. अशा घटनांमध्ये मृत्यू पावणारे २५ टक्के नागरिक हे निव्वळ पश्चिम बंगालमधील आहेत.

यात सगळ्यात जास्त नागरिक हत्तीच्या हल्ल्यातच मरतात. यावर नियंत्रण करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये हुल्ला पार्टी नावाच्या टोळ्या बनवण्यात आल्या. 

हत्तीचं वावर असलेल्या दक्षिण बंगालमध्ये साधारणपणे २०-२५ हुल्ला पार्टी आहेत. हुल्ला पार्टीच्या एका टोळीमध्ये साधारणपणे २५-३० सदस्य असतात. प्रत्येक टोळीकडे टॉर्च, जळत्या मशाली, मोठे ढोल आणि फटाके असतात. जेव्हा हत्ती गावामध्ये शिरण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा वनविभागाचे अधिकारी आणि हुल्ला पार्टीची टोळी गावात दाखल होते. 

हत्तीच्या काळपाजवळच्या भागात मशाली पेटवल्या जातात, मोठमोठ्या आवाजात ढोल वाजवून फटाके फोडले जातात, या  आवाजाने हत्ती घाबरतात आणि ते परत जंगलात जातात. परंतु या आवाजामुळे बिथरलेले हत्ती आणखी आक्रमक होऊन हल्ला करतात असे निष्कर्ष अलीकडे झालेल्या अभ्यासात समोर आले आहेत. त्यामुळे फटाक्यांचा आवाज कमी करण्यावर भर दिला जातोय.

पश्चिम बंगालमध्ये हुल्ला पार्टीच्या एका टोळीत २५-३० सदस्य असतांना महाराष्ट्र वनविभागाने फक्त ६ सदस्यांची टीम बोलावलीय. 

पश्चिम बंगालच्या सेज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून म्हणजेच हुल्ला पार्टीकडून ऑगस्ट २०२२ पासून या कळपावर पळत ठेवली जात आहे. जेव्हा जेव्हा हे हत्ती गावांमध्ये दाखल होतात तेव्हा हुल्ला पार्टीचे सदस्य मशाली पेटवून हत्तींना हुसकावून लावतात आणि गावकऱ्यांना सावध करतात, पण हुल्ला पार्टीचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे दिसत नाहीये.

पूर्व विदर्भात तलावांची संख्या जास्त आहे त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, या भागात प्रामुख्याने धानाचं पीक घेतलं जातं आणि जंगलाशेजारी गावांमध्ये मोहफुलाची दारू सुद्धा काढली जाते. त्यामुळे हे हत्ती या भागात चांगलेच रमले आहेत.

गावकऱ्यांना वाटतं त्याप्रमाणे बळजबरीने हत्तींना पळवून लावता येत नाही. जर हत्तींना पळवण्यासाठी बळजबरी करण्यात आली किंवा त्यांचा मार्ग रोखण्यात आला तर ते आणखी आक्रमक होतील असं वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

पण हत्तींना छत्तीसगढमध्ये पळवून लावण्यात यश येत नसल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.

हत्तीच्या एवढ्या मोठ्या कळपामुळे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ज्याप्रमाणे हत्तीच्या हल्ल्यात पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान होतं आणि नागरिकांचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हा आकडा वाढेल का अशी भीती निर्माण झाली आहे.

नागरिकांसोबत वन्यप्राण्यांच्या बाबतीत सुद्धा समस्या निर्माण झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात असलेल्या नवेगाव नागझिरा अभयारण्यात असलेल्या वाघांमध्ये नर आणि माद्यांचं लिंग गुणोत्तर असंतुलित झालं आहे. इथे एकूण १६ वयस्कर वाघ आहेत पण त्यातील बहुसंख्य नर आहेत. यावर उपाय करण्यासाठी वनविभागाने ताडोबाच्या जंगलातील दोन माद्या नवेगाव नागझिरा अभयारण्यात सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हत्तीच्या हौदोसामुळे या मादी वाघांना अभयारण्यात सोडावं की नाही अशी समस्या निर्माण झालीय.

पूर्व विदर्भातील जंगल हे काही हततींसाठी नवीन नाही, साधारण २०० वर्षांपूर्वी या भागात हत्तीचं वावर होता याचे अनेक पुरावे आढळतात. परंतु गेल्या २०० वर्षांमध्ये हत्तीच्या शिवाय जंगलाची एक इकोलॉजी आणि समाजव्यवस्था तयार झालीय. त्यात अचानक हत्ती आल्यामुळे या व्यवस्थेत बदल होऊन मानव वन्यप्राणी संघर्ष वाढेल अशी चिंता अभ्यासक वर्तवत आहेत.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.