आता वाढदिवसाला पॅरोल मिळालाय निवडणुका आल्या की राम रहीम जेलच्या बाहेर येतोच

बाबा राम रहीम सुरवातीला आपल्याला त्याच्या लव्ह चार्जेर सारख्या गाण्यांमुळे माहित झाला. मात्र त्यानंतर त्याने त्याच्या आश्रमात केलेली कुकर्म जेव्हा बाहेर आली तेव्हा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असं तुमचं एक म्हणणं असेल. पण हा झाला तुमचा स्वतःचा अनुभव. बाबाचे जे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी तो अजूनही संतच आहे.

डेरा सच्चा सौदाचा हा प्रमुख गुरु गुरमीत राम रहीम २०१७ पासून हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगतोय. 

त्याचा एक व्यवस्थापक रणजित सिंग याच्या १९ वर्ष जुन्या खून प्रकरणात ऑक्टोबर २०२१ मध्ये विशेष केंद्रीय अन्वेषण विभागाने बाबाला आणि इतर चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर २०१७ मध्ये राम रहिमला त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसंच रामचंद्र छत्रपतीच्या हत्येप्रकरणी राम रहिमला २० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बाबा राम रहिम मात्र अधून मधून पॅरोलवर बाहेर येऊन आपला डेरा चालवतो. सत्संग घेतो आणि महत्वाचं म्हणजे त्याचे लाखो अनुयायी निवडणुकीत कोणाच्या बाजूने उभे राहतील हे सुद्धा हा बाबा बघतो. 

आता २० जुलै २०२३ रोजी अडिच वर्षात सातव्यांदा बाबा जेलमधून पॅरोलवर बाहेर आला आहे. 

१५ ऑगस्टला बाबा राम रहिमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचं कारण सांगून बाबा राम रहिमला पॅरोल मिळालाय. पण त्याला पॅरोल मिळण्यामागे आणखी एक कारण असल्याचं बोललं जातंय. तसंतर बाबाचा भक्त परिवार मोठा आहे. मोठमोठे नेते, आमदार, खासदार, मंत्री व महापौर बाबापुढे नतमस्तक होतात. याआधी हरयाणा व उत्तर प्रदेशच्या निवडणुकांआधी बाबा राम रहिम पॅरोलवर बाहेर आला होता. त्यावेळी काँग्रेसने हरयाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारवर निवडणुकीत प्रभाव टाकण्यासाठी बाबाला सोडल्याचा आरोप केला होता.

आता २०२३ या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

 मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये बाबा राम रहिमला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावेळी ३० दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आलेला बाबा राम रहिम त्याच्या अनुयायांना कोणत्या पक्षासोबत जायचं हे सांगण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचा निकाल प्रभावित करण्याची क्षमता बाबा राम रहिममध्ये आहे. 

निवडणुकांच्या आधी बाबा राम रहिम पॅरोलवर बाहेर आल्याचं याआधीच्या घटनांवरुन दिसून आलं आहे. आता पुन्हा एकदा बाबा बाहेर येऊन मतदारांना प्रभावित करु शकतो. बाबा राम रहिम बाहेर येण्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. कारण हरयाणा व उत्तर प्रदेश निवडणुकीआधी बाबा बाहेर आला होता तेव्हा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपनं आपलं सरकार स्थापन केलं होतं. 

याआधी बाबाचा पॅरोल चर्चेत आला होता तो म्हणजे पंजाब निवडणुकीच्या दरम्यान. 

त्याला 7 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत गुरुग्राममध्ये त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी 21 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. मात्र आठवाड्यभरताच पंजाबच्या निवडणुका होत्या. त्यावेळीही भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करण्यासाठी बाबाला सोडण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं होतं. पंजाबमध्ये दलित मतदारांवर आणि जवळपास ६९ मतदारसंघांवर बाबा प्रभाव टाकू शकतो असं त्यावेळी म्हणण्यात आलं होतं.

अजून एक इलेक्शनला बाबा बाहेर आला होता तो म्हणजे २०१९ च्या हरियाणा निवडणुकांपूर्वी.

२०१४ मध्ये बाबा राम रहीम याने भाजपाला ओपनली पाठिंबा दिला होता आणि त्याचा हरियाणामध्ये भाजपाला फायदा देखील झाला होता. त्यामुळे त्याला २६ जून २०१९ ला त्याला ४२ दिवसांचा घसघशीत पॅरोल देउन बाहेर सोडण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने शेती करण्यासाठी पॅरोल पाहिजे असल्याचं म्हटलं होतं.

त्यामुळे अशी नेमकी कोणती प्रोसेस असते कि ज्यामुळे बाबा राम राहिमाला असा मोठा पॅरोल मिळतो.

पॅरोल ही शिक्षा स्थगित करून कैद्याला सोडण्याची पद्धत आहे. रिलीझ सशर्त असते, सामान्यतः वर्तनाच्या अधीन असते आणि ठराविक कालावधीसाठी अधिकाऱ्यांना अहवाल देणे आवश्यक असते.हरियाणा गुड कंडक्ट प्रिझनर (तात्पुरती सुटका) कायदा, 1988 नुसार कैद्यांच्या चांगल्या वर्तनासाठी काही काळ शिक्षा भोगल्यानंतर त्यांची तात्पुरती सुटका करण्याची तरतूद आहे. कायद्याच्या कलम ३ नुसार, राज्य सरकारने कैद्याची सुटका करणार्‍या क्षेत्राच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांचा सल्ला घेऊन कैद्याची सुटका केली जाते. थोडक्यात राज्य सरकारच्या हातात असतंय की कैद्याला कधी पॅरोल द्यायचा आणि मग जे सरकार सत्तेत आहे ते सरकार अप्लाय सोयीनुसार कैद्याला बाहेर आणू शकतं किंवा त्याला तसं आमिष दाखवतं, असा आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे. आता हरयाणातल्या भाजप सरकारने मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या निवडणुकांपुर्वी बाबा राम रहिमला पॅरोल दिला असा आरोप होत आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.