यंदा खैरे येणार काय रे ?

औरंगाबादच्या सुपारी मारुतीपासून शिवसैनिक म्हणून सुरु झालेली कारकीर्द. पिठाच्या मिलमध्ये काम करणारे खैरे थेट सेनेची पहिल्यांदा सत्ता येताच मंत्री झाले. आणि गेल्या चार टर्म ते सलग औरंगाबादचे खासदार म्हणून निवडून येताहेत. लाट कुठलीही असो चंद्रकांत खैरे निवडून येतात. बरं त्यांच्या विरोधात किती दिग्गज माणसं लढली याचा इतिहास पण बघायला पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून येताना कुणाचा पराभव केला होता ?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंतुले यांचा. एकदा नगरसेवक, दोनदा आमदार आणि चारदा खासदार म्हणून निवडून आलेल्या या माणसाच्या यशाचा गाडा कुणी रोखू शकला नाही.

अशी काय जादू आहे खैरेंच्या व्यक्तीमत्वात ?

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खैरे आपल्या कारकीर्दीच्या म्हणजे साधारण १९८५ च्या काळापासून कट्टर शिवसैनिक आहेत. एवढ्या दीर्घ काळ सेनेत फक्त कार्यकर्ते उरलेत. मंत्री किंवा आमदार केंव्हाच इतर पक्षात गेलेत. प्रदीप जैस्वाल यांना सेनेने आमदारकी दिली. खासदार केलं. पण ते सेना सोडून गेले होते. किशनचंद तनवाणी महापौर होते सेनेत. त्यांनी पण सेना सोडली. ते आता बीजेपीत आहेत. गजानन बारवाल पण बीजेपीत गेले. ज्यांनी शिवसेना मराठवाड्यात उभी केली ते सुभाष पाटील मनसे पासून बराच प्रवास करत आहेत. अशावेळी चंद्रकांत खैरे हे महत्वाचं नाव आहे जे कायम सेनेसोबत राहिलं. एकनिष्ठ. आणी त्यांच्या एकनिष्ठेचं फळ सेनेने त्यांना अगदी सुरुवातीपासून दिलं.

खैरे यांच्याकडे सगळ्यात मोठा गुण काय आहे ? तर ती आहे त्यांची निष्ठा. ते मराठवाड्यातले कट्टर निष्ठावान सैनिक आहेत यात शंका नाही. आणि केवळ निष्ठेच्या जोरावर मोठे झालेले फार दुर्मिळ नेते आहेत. निष्ठा असूनही आयुष्याचं वाटोळ झालेले कित्येक कार्यकर्ते, नेते आपण पाहिलेत. पण खैरे यांच्यात निष्ठे व्यतिरिक्त असं आणखी काहीतरी आहे ज्यामुळे त्यांच्या यशाची कमान नेहमी चढती राहिलीय. काय आहे असं त्यांच्यात?

खैरे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. अगदी लोकांवर धावून जाऊ शकतात हिंदुत्वासाठी. खैरे सुपारी मारुती पासून भद्रा मारुती पर्यंत सगळीकडे असतात. त्यांच्यासारखा श्रद्धाळू नेता मराठवाड्यात नसेल. कुठल्याही समस्येवर त्यांच्याकडे धार्मिक कार्य हा हमखास उपाय असतो. औरंगाबादमधल्या मंदिराना, भंडारे वाल्यांना, भागवत सप्ताह वाल्यांना खैरे यांच्यासारखा दानशूर नेता नाही. खैरे साहेबांकडे गेल्यावर रिकाम्या हाती परत येण्याची शक्यता नाही असं प्रत्येक वर्गणी मागणाऱ्या माणसाला माहित आहे. खैरेंची आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती म्हणजे खैरे जवळपास प्रत्येक फोनला उत्तर देतात. प्रत्येक जवळच्या लग्नात उपस्थित राहतात. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात तण मन धनाने सहभागी होतात.

याबाबतीत खैरेंशी स्पर्धा करणारा नेता औरंगाबादमध्ये नाही हे अगदी खर आहे. पण हे पुरेसं आहे का?

निवडून येण्यासाठी खैरेना ही पुण्याई आजवर पुरलेली आहे. पण विकासाच्या बाबतीत मात्र औरंगाबादची बोंब आहे. पाणीप्रश्न असो किंवा कचरा प्रश्न असो. औरंगाबाद वैतागलेल आहे. आणी या प्रत्येक प्रश्नाला खैरे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जवाबदार आहेत. खैरे गेली कित्येक वर्ष औरंगाबाद महापालिका आपल्या ताब्यात ठेवून आहेत. महापौर कुणीही असो निर्णय खैरे घेतात हे आता औरंगाबादमध्ये प्रत्येकाला माहित आहे. खैरेंची शिवसेना आणी भाजप पहिल्यापासून युतीत सत्तेत आहेत. पण बीजेपीचा कुठलाही नेता खैरेना तुल्यबळ ठरला नाही. अगदी आज विधानसभेचे सभापती असलेले हरिभाऊ बागडे सुद्धा खैरेना आव्हान देऊ शकले नाहीत. ते ग्रामीण औरंगाबादमध्ये अडकून राहिले.

हे ही वाचा – 

खैरेंना विरोध करणारा नेता विरोधी पक्षात निर्माण झालाच नाही. म्हणून शेवटी बीजेपीला किशनचंद तनवाणी यांच्या रूपाने खैरेंच्या जवळचा माणूस आयात करावा लागला. पण त्याचा फारसा फायदा होणार नाही. बाकी कॉंग्रेसकडे काही मोठी माणसं होती. पण खैरेंनी टप्प्या टप्प्याने त्यांना आसमान दाखवलं. खैरेनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली तेंव्हा कॉंग्रेसचे जावेद हसन विरोधात उभे होते. निवडणूक अवघड होती. कॉंग्रेस अधिक मुस्लीम मतदार असं तुल्यबळ पारडं होतं जावेद हसन यांचं. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक सभा खैरेना निवडून आणण्यात यशस्वी ठरल्या. त्यानंतरच्या विधानसभेला राजेंद्र दर्डा खैरेंच्या विरोधात उभे होते. लोकमत सारखं वृत्तपत्र पाठीशी असलेले दर्डा खैरेना पाडू शकले नाहीत. खैरे थेट मंत्री झाले. बाळासाहेबांची आवडती गरिबांना घरं देण्याची योजना कुणाच्या हातात होती? खैरे मंत्री होते. नंतर खैरे लोकसभेत गेले. कॉंग्रेसने अंतुलेंना आयात केलं. अंतुले पडले. पुन्हा मराठवाड्यात फिरकले नाही. मग पुढच्या वेळी रामकृष्ण बाबा पाटील कॉंग्रेसकडून उभे होते. रामकृष्ण बाबा तोपर्यंत कुठल्याच निवडणुकीत पडले नव्हते. दोन कधीच पराभव न पाहिलेल्या उमेदवारांमध्ये लोकसभा लढली गेली.

खैरेंनी आपला कधीच पराभूत न होण्याचा विक्रम अबाधित ठेवला.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खैरेंच्या विजयात दर्डांच्या लोकमतचा हात मोठा होता. नंतरच्या निवडणुकीत सगळ्यात मोठी कसोटी होती. शांतिगिरी महाराज खैरेंच्या विरोधात होते. थेट अध्यात्मिक आणि धार्मिक बाबा उभे होते  मराठवाड्यातल्या सगळ्यात धार्मिक आणि श्रद्धाळू नेत्याविरोधात. तसे सगळे खैरेना शांतीगिरी महराजांचे भक्त समजायचे. पण भक्ताने आपल्या बाबाला पराभव दाखवला. यानंतर लोकांना लक्षात आलं की खैरेना हरवणं सोपं नाही. कॉंग्रेसने खैरेंच्या विरोधात एकदा नितीन पाटील यांनासुद्धा उमेदवारी दिली. त्यावेळी गल्लीतले लहान मुलं सुद्धा खैरे निवडून येणार हे सांगत होते. कॉंग्रेसची राजकीय जाण किती रसातळाला गेली होती याचा हा पुरावा.

खैरे यावेळी निवडून येणार का हा महत्वाचा मुद्दा आहे.

यावेळी खूप आधीपासून शिवसेनेचे अंबादास दानवे नावाचे जिल्हाप्रमुख खासदारकीचे उमेदवार असतील अशी हवा तयार होत होती. खैरेना तिकीट मिळणार नाही किंवा त्यांना ते नकोय असं वारं होतं. पण नेमकं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनात अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला मारहाण केल्याची क्लिप राज्यभर व्हायरल झाली. दानवे यांच्यावर मराठा समाज प्रचंड नाराज झाला. त्यामुळे त्यांचं नाव सेना पुढे करणार नाही असं चित्र आहे. त्यात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण खैरेंच्या विरोधात लढायला उत्सुक आहेत. खैरेंनी जिल्ह्यासाठी पिठाची गिरणी तरी आणली का असा त्यांचा आरोप आहे. पण मुद्दा असा आहे की कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या जागावाटपात ठरेल खैरेंच्या विरोधात लढणार कोण?

पण सध्यातरी ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्रित सभेला मिळालेला प्रतिसाद बघता त्यांचा उमेदवार ही कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठी त्रासदायक ठरणार आहे. ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी शक्यता उभी करणे ही खैरेंची जमेची बाजू आहे. मग हिंदुत्वाच्या नावाने नेहमीप्रमाणे एकगठ्ठा मतदान होऊन ते निवडून येऊ शकतात. अर्थात सेना भाजपची युती होणार की नाही हा मुद्दा पण महत्वाचा आहे. या सगळ्या शक्यता झाल्या. पण जिल्ह्यात भाकरी फिरवायची वेळ आलीय हे आता विरोधकांपेक्षा स्थानिक शिवसेनेला जास्त वाटतंय हे लपून राहिलेलं नाही.

चंद्रकांत खैरे पंचवीस तीस वर्षानंतर सेनेचे उपनेते झाले. दसरा मेळाव्यात व्यासपीठावर ठळकपणे दिसले. स्थानिक राजकारणातले सगळे प्रश्न ते सहज सोडवतात. अगदी पालकमंत्री असलेले रामदास कदम पण त्यांनी हट्टाने बदलायला लावले. पण औरंगाबादला असलेल्या कचराप्रश्नाचं, पाणी प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना सापडलेलं नाही. हे प्रश्न त्यांना त्रास देतील का पुन्हा हिंदुत्व त्यांना तारून नेईल?

सध्या तरी प्रत्येकजण एवढच विचारतोय यंदा खैरे येणार काय रे ?

Leave A Reply

Your email address will not be published.