मोदीच भारी! असं म्हणणाऱ्या खलीचं डोकं राजकारणात चालणार का ?
जे WWE चे फॅन्स आहेत त्यांना द ग्रेट खली हे नाव नवीन नाही. अंडरटेकर, जॉन सीना, बिग शो, ट्रिपल एच या गोऱ्या फायटर्समध्ये जेव्हा आपला एक भल्यामोठ्या धडाचा भारतीय माणूस आला आणि WWE चे जे लाखो भारतीय फॅन्स होते त्यांच्यात तुफान लोकप्रिय झाला. मात्र हळू हळू ९०च्या दशकातली पोरं मोठी होत गेली त्यांना WWE स्क्रिप्टेड शो असल्याचं कळलं आणि मग या शोची लोकप्रियता कमी झाली. पण तरीही खली हे नाव लोकांच्या स्मरणात कायमच राहिलं. मध्यंतरी अंबुजा सिमेंटच्या जाहिरातीत खली दिसला होता.
या जाहिराती नंतर त्याच्यावर त्याच्यावर आणि त्याने म्हटलेल्या ‘फिर मौसी ने कहा’ या डायलॉगवर तुफान मिम्स आले.
एवढे की खलीला त्याचा कंमेंट सेक्शन ऑफ करून ठेवावा लागला.
आता या महाबली खलीनं भाजपात प्रवेश केला आहे.
त्यामुळं तो पुन्हा चर्चेत आला आहे. द ग्रेट खलीने गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात भाजपात प्रवेश केला. राज्यसभा खासदार अरुण सिंह, राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि लोकसभा खासदार सुनीता दुग्गल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.
“भाजपमध्ये सामील झाल्याचा मला आनंद आहे… मला असे वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले कार्य त्यांना योग्य पंतप्रधान बनवते. म्हणून, मला वाटले की देशाच्या विकासासाठी त्यांच्या कारभाराचा भाग का होऊ नये. भाजपच्या राष्ट्रीय धोरणामुळे प्रभावित होऊन मी पक्षात प्रवेश केला,” असं खलीनं पक्षप्रवेशाच्या वेळी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. गेल्या वर्षी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली होती.
खलीचं खरं नाव दलिप सिंग राणा. तो मूळचा हिमाचलमधल्या सिरमौर जिल्ह्यातला.
घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि हा असा दिसायला अगडबंब. त्यानंतर खली जेव्हा बॉडी बिल्डिंग करायचा, त्याच वेळी नवीन केबल टीव्ही आला होता. जेव्हा त्याने पहिल्यांदा डब्ल्यूडब्ल्यूई (आधीच डब्ल्यूडब्ल्यूएफ) पाहिलं.यानंतर २००५ मध्ये तो डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये गेला. २०२१ च्या WWE हॉल ऑफ फेममध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. 7फुटापेक्षा जास्त उंची असेलेल्या खलीने “MacGruber,” “Get Smart” आणि “The Longest Yard” सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
त्याच्या १४ वर्षाच्या अमेरिकेच्या वास्तव्यात त्याने अमेरिकेचे नागरिकत्व घेतल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे जर पुढे खलीनं राजकारणात एकदा पद घ्यायचं म्हटलं तर वादंग होणार एवढं नक्की आहे.
हे ही वाच भिडू :
- खलीच्याही आधी wwe मध्ये गामा सिंगने भले भले पहिलवान रिंगमध्ये उचलून आपटले होते….
- तुम्ही इंस्टाग्रामवर चेष्टा करताय पण खली खरंच दगडं फोडून महाबली झालाय..
- जॉर्ज फर्नांडीस यांनी देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखली होती !