पवारांचे पटनाईक कुटुंबीयांवर उपकार आहेत, पण आता राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देणार का?

आज प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्याच्या हालचालींनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं. याआधी मागच्या महिन्यात प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट घेतली होती तेव्हा देखील तिसरी आघाडी आणि शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्यासाठी तयारी चालली असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

आता आज जी राहुल गांधी-प्रशांत किशोर भेट झाली त्यात काही कॅल्क्युलेशन समोर आल्याचं सांगितले जात आहे. यानुसार,

तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात, तेलंगणा या राज्यांमध्ये विरोधकांना बहुमत आहे, सोबतच राष्ट्रीय जनता दल आणि डावे यांची देखील आपल्या राज्यांमध्ये ताकद आहे. त्यामुळे विरोधकांचं संख्याबळ होऊ शकत, मात्र अडचण आहे ती केवळ ओडिसा आणि तिथल्या बिजू जनता दलाची. ते जर विरोधी पक्षांसोबत आले तर इलेक्टोरल कॉलेज सत्ताधाऱ्यांसमोर मजबूत होऊ शकते.

प्रशांत किशोर यांच्यामते, ओडिसा एकचं राज्य पवारांसाठी ग्रे एरियामध्ये येत आहे. त्याला कारण म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची राजकीय भूमिका स्पष्ट नाही. कारण ते राज्यात भाजपच्या विरोधात आणि केंद्रात भाजपच्या बाजूने असल्याचं चित्र आहे. त्यामुळेचं पटनाईक आता शरद पवारांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देणार का? असा प्रश्न विचारला जातं आहे.

मात्र इतिहासात आपण पाहिल्यास शरद पवार यांचे पटनाईक कुटुंबीयांवर मोठे उपकार आहेत, त्यामुळे इतिहासातील या मैत्रीवर पटनाईक पवारांना पाठिंबा देऊ शकतात असे आडाखे बांधले जातं आहेत.

शरद पवारांचे ओडिसाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्याशी फार जुने आणि मैत्रीपूर्ण संबंध. दोघांच्या वयात जवळपास २४ वर्षांचं अंतर होतं, पण ते अंतर मिटवून दोघांची जिव्हाळ्याची मैत्री झाली होती. पवार त्यांना आदराने ‘बिजूदा’ म्हणतं.

शरद पवार युवक काँग्रेसमध्ये सक्रिय असताना भुवनेश्वरला झालेल्या ‘काँग्रेस’ च्या अधिवेशनात पवारांनी दिग्गज बिजूदांना आणि ओडिसामधील त्यांच्या ताकदीला पाहिलं होतं, अनुभवलं होतं.

त्यानंतर या दोघांच्या ओळखीचं आणि मैत्रीचं निमित्त ठरलं होतं ते बिजू पटनाईक यांचा मुलगा प्रेम. शरद पवारांच्या तरुणपणात ते दिल्लीला गेल्यानंतर हमखास उद्योजक ललितमोहन थापर यांच्या घरी जात असतं. त्यांच्याकडेच पवारांची प्रेमसोबत मैत्री झाली होती. प्रेम आणि एकूणच पटनाईक परिवाराचं थापर यांच्याकडे कायम येणं-जाणं होतं.

प्रेमनेच पुढे पवारांची बिजूदांशी ओळख करून दिली होती. मुलग्याचा मित्र असल्यानं बिजूदा देखील पवारांशी मायेनंच वागत.

स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असलेल्या बिजूदांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सोबतच ‘कलिंग स्टील’ आणि ‘कलिंग एव्हिएशन’ अशा दोन कंपन्या देखील सुरू केल्या. पुढे राजकारणासाठी पैसा हवा म्हणून त्या कंपन्या विकूनही टाकल्या. आपल्या याच राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर बिजू पटनाईक १९६१ साली ओडिसाच्या मुख्यमंत्री पदावर पोहोचले होते.

बिजूदा आणि इंदिरा गांधी यांचंही नातं देखील जिव्हाळ्याचं होतं. इतकं की ते इंदिरा गांधींना ‘इंदू’ अशी हाक मारायचे. मात्र १९६७ च्या निवडणुकांपूर्वी बिजू पटनाईक यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप झाले. विरोधात प्रचार झाला आणि त्यातुन बिजूदा निवडणूक हरले. हा त्यांच्यासाठी मोठा पॉलिटिकल सेटबॅक मानला जातं होता.

मात्र बिजूदा शांत बसणाऱ्यातील नव्हते. त्यांनी सहा महिन्यांमध्ये राजनगर इथून पोटनिवडणूक जिंकली. मात्र सत्तेवर आलेल्या जन काँग्रेस स्वतंत्र पक्षाने बिजूदांवर चौकशी समिती नेमली. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी बिजूदांच्या बाजूने कोणतीही भूमिका न घेतल्यानं त्यांना काँग्रेसमध्ये डावलले जातं असल्याची भावना तयार झाली.

या भावनेवर कळस चढवला तो १९६९ सालच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि राज्यसभा तिकिटाच्या मुद्द्यावरून. त्यावर्षीच्या इंदिरा गांधी यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवार उतरवल्यानंतर बिजूदांनी इंदिरा गांधींना विरोध सुरु केला. सोबतच इंदिरा गांधींनी त्यावेळी आदिवासी मंत्री असलेल्या टी. संगमा यांना राज्यसभेचं तिकीट दिले.

इंदिरा गांधींशी झालेल्या याच सगळ्या वादातून १९६९ साली बिजूदांनी काँग्रेस सोडली. यानंतर त्यांनी उक्तल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र पुढे आणीबाणीच्या काळात बिजूदा यांना अटक करण्यात आली. एकेकाळी राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कसलेला राजकारणी आणि हरहुन्री व्यक्तिमत्व असलेल्या बिजूदा यांना तुरुंगात मात्र बराच त्रास देण्यात आला.

अगदी त्यांना छळछावणीचा अनुभव येऊ लागला होता. या तुरुंगवासात काँग्रेसकडून मिळत असलेल्या या वागणुकीमुळे ते पूर्णच कोलमडून गेले. मात्र या ठिकाणी शरद पवार बिजूदांच्या मदतीला धवले.

याविषयीची आठवण शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात सांगितली आहे.

त्यावेळी राज्यात मंत्री असलेल्या पवारांनी बिजूदांची अवस्था पहिली आणि थेट इंदिरा गांधींना भेटले. इंदिरा गांधी यांनी बिजूदांना सोडावं यासाठी पवारांनी भावनिक आवाहन केलं, पवार म्हणाले,

‘बिजूदांचा तुमच्यावर एवढा जीव होता, त्यांची तुरुंगातून सुटका करा.’

यानंतर इंदिरा गांधींनी देखील लगेच नाही पण पुढे बिजूदांची सुटका केली. त्यामुळे एकप्रकारे शरद पवार यांच्यामुळे बिजूदांची छळछावणीतून सुटका होऊ शकली होती.

पवार पुढे सांगतात,

तुरुंगात असताना बिजूदांचा जीव एवढा कोंडला गेला होता, की सुटकेनंतर कुठेतरी काही दिवस निवांतपणे घालवावेत, असं त्यांना वाटत होतं. त्यांनी दहा दिवस काश्मीरला जाण्याचं ठरवलं आणि मलाही आमंत्रण दिलं. ते दहा दिवस माझ्यासाठी आयुष्यातला अविस्मरणीय ठेवा आहे.

अनेक विषयांवर आमच्या विस्तारानं गप्पा झाल्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या पुष्कळ घटना,
प्रसंग मला आपलेपणानं सांगितले. माझ्यासाठी तो समृद्धीचा ठेवा होता. इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्याला हातभार लावणारा त्यांनी सांगितलेला अनुभव तर थक्क करणारा होता.

एकूणच या आणीबाणीच्या काळात पवार आणि पटनाईक कुटुंबीयांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. पुढे आणीबाणी संपल्यानंतर बिजूदांनी आपला पक्ष जनता पक्षात विलीन केला. या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. निकालानंतर ते विजयी झाले आणि केंद्रात स्टील मंत्री देखील बनले.

पुढे १९९० साली जनता दलाच्या माध्यमातून ‘बिजूदा’ ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणून परतले. त्यावेळी देखील पवारांचे बिजू पटनाईक यांच्याशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध राहिले.

१९९७ ला बिजूदांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा नवीन पटनाईक यांनी बिजू जनता दलाची स्थापना केली आणि २००० साली ओडिशाच्या मुख्यमंत्री पोहोचले ते आज २१ वर्षानंतर देखील या पदावर कायम आहेत. या दरम्यान शरद पवार यांनी नवीन पटनाईक यांच्यासाठी २००९ च्या निवडणुकीदरम्यान ओडिसामध्ये जाऊन प्रचार देखील केला होता.

मात्र २०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर नवीन पटनाईक काहीसे भाजपच्या जवळ गेल्याचं पहायला मिळालं. राज्यात जरी त्यांच्यासाठी भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष असला तरी ते नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात.

त्यामुळेच आता इतिहासातील मैत्रीवर कि वर्तमानातील परिस्थितीवर नवीन पटनाईक नेमका काय निर्णय घेणार? शरद पवारांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देणार का हे बघणं महत्वाचं आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.