देशाच्या राजकारणात नितीशकुमार पुन्हा एकदा पलटूराम ठरणार का?

देशाच्या संसदेत पेगाससच्या मुद्द्यावर एवढं घमासान माजलयं कि काही बोलू नका. भाजपच्या विरोधात असणाऱ्या सर्वच पक्षांनीच या मुद्द्यांवर कंबर कसलीय. आणि अक्षरशः सरकारला सळो की पळो करून सोडलंय. आता हे तर सगळ्यांनाच टीव्हीवर, पेपरमध्ये दिसतय. पण एनडीएत भाजपचे सोबती असणारे ही जर याविषयावर रान उठवत असतील मग विषय गंभीर आहे. आणि त्याकडे आता लक्ष द्यायलाच लागतंय.

खरं तर विषय आहे नितीशकुमारांचा.. पलटू  सोबती असणाऱ्या नितीशकुमारांचा

पेगाससच्या मुद्द्यावर आता नीतीश कुमारांनी पण गळा काढायला सुरुवात केलीय. नितीश कुमार म्हणतायत याविषयीचा निकाल लागलाच पाहिजे. म्हणजे पेगाससची चौकशी झालीच पाहिजे. आता नितीशकुमार बिहारमध्ये भाजप बरोबर संसार करतायत तरी पण ते हा सूर आळवतायत तर मग अवघड आहे भाजपचं. पण त्यांची हि काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पण समर्थन दिल होत. त्या व्यतिरिक्त त्यांनी जातीआधारित जनगणनेच्या बाजूने कौल दिलाय.

पण मग सुखाचा संसार चालला असताना नितीश असं का वागतायत, हे समजायला मार्ग नाही. काही वृत्तपत्रांच्या मते हल्लीच मोदींच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे नितीश कुमार नाराज आहेत. 

मागच्या महिन्यामध्ये केंद्रातील मोदी कॅबिनेटचा विस्तार करण्यात आला. मात्र यामध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला केवळ एकच मंत्रिपद मिळालं आहे. अस सांगितलं जातं की, नितेश कुमार हे मोदींकडे ३ ते ४ मंत्रीपदांची मागणी करत होते. पण एकाच मंत्रिपदावर भाजप ठाम होते.

याआधी २०१९ मध्ये मोदी सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी नितीश कुमार यांच्या जनता दलाने २ ते ३ मंत्रिपदाची मागणी केली होती. पण भाजपने त्यावेळी देखील जनता दलाला एक पेक्षा जास्त मंत्रीपद देण्यास तयारी दर्शवली नव्हती. यातूनच नाराज होत नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळात मध्ये सामील होण्यास विरोध दर्शवला होता.

हे झालं आत्ताच, पण आगामी निवडणुकांमध्ये नितीशकुमार जर विरोधकांच्या तंबूत गेले तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नसणारे, कारण नितीशकुमार पलटू आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहेत. ते कस ? आता त्यांचा इतिहास सांगावाच लागेल.

खरं तर त्यांच्या या पलटूराम स्वभावाची प्रचिती येते, जॉर्ज फर्नांडिस यांची साथ सोडल्यावर.

म्हणजे नितीश कुमार ज्यांच्या हाताला धरुन राजकारणात आले ते जॉर्जच होते. सोबतच आज ज्या जेडीयूचे प्रमुख ते आहेत त्या पक्षाचे संस्थापक आणि प्रमुख एकेकाळी जॉर्ज फर्नांडिस हेच होते.

ही गोष्ट १९७४ सालची. देशातील अनेक पक्ष आणि नेते इंदिरा गांधींच्या विरोधात एकत्र येत होते. त्यावेळी नितीशकुमार, जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून जेपी आंदोलनाशी जोडले गेले आणि इथूनच त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला.

याच आंदोलनादरम्यान नितीश यांची कर्पूरी ठाकूर, राम मनोहर लोहिया, व्हीपी सिंग आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या राजकीय दिग्गजांची भेट झाली. नितीश – जॉर्जची जोडी इथेच जमली.

आपल्या करियरची सुरुवात एका वर्तमानपत्रातील प्रूफ रीडर म्हणून करणारे जॉर्ज फर्नांडिस आणि  नितीश यांच्या राजकारणाने बिहारची सगळी समीकरणच बदलली.

नितीश यांच्यासमवेत समता पक्षाची स्थापना

१९७५ नंतरच्या काळात हे दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसू लागले. फरक इतकाच की जॉर्ज राष्ट्रीय राजकारणात होते. तर नितीश यांना राज्याच्या राजकारणात इंट्रेस्ट होता. दोन वेळा विधानसभेला पराभूत होवून देखील ते पुन्हा उभे राहून निवडून आले होते.

१९८९ नंतर नितीश देखील लोकसभेत गेले. आणि राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली. यानंतर दोघांच्यातील सलोखा वाढतच गेला. १९९४ मध्ये प्रथमच या दोघांनी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली.

नितीश कुमार आणि १४ खासदारांना सोबत घेत जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता दलाशी फारकत घेतली. आणि १९९४ मध्ये जनता दल (जॉर्ज) ची स्थापना केली. त्याच वर्षी या पक्षाचे नाव बदलून समता पक्ष करण्यात आले.

पुढच्याच वर्षी म्हणजे १९९५ च्या बिहार विधानसभेच्या निवडणुका समता पक्षाने स्वबळावर लढवल्या, परंतु लालूंच्या समोर समता पक्ष केवळ ७ जागा जिंकून पिछाडीवर पडला.

आणि इथंच नितीशकुमारांनी पहिली पलटी मारली. 

म्हणजे झालं असं की, दोघांनी पण काळाची पावले ओळखली होती. आणि यातूनच फारकत घेतलेल्या  जॉर्ज यांनी १९९६ मध्ये भाजप सोबत युतीसाठी हात पुढे केला. समता पक्षाने एनडीएत प्रवेश केला आणि केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांचा कार्यभार संभाळला.

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत समता पक्षाला ८ जागा मिळाल्या, तर १९९८ मध्ये १२ जागा मिळाल्या. वाजपेयींनी जॉर्ज यांना संरक्षणमंत्री केले. संरक्षणमंत्री म्हणून जॉर्ज दिल्लीच्या वातावरणात होते. या काळात नितीश राज्याच्या राजकारणात आपले स्थान घट्ट करत होते.

अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पटेल जनता दलाचे नेते होते आणि या निर्णयामुळे पक्षात मतभेद वाढले. त्यामुळे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा जनता दलापासून वेगळे झाले आणि त्यांनी जनता दल सेक्युलर पक्षाची स्थापना केली.

कारण देवेगौडा यांना कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांपासून दूर रहायचे होते. यानंतर जनता दलाचे नेते शरद यादव झाले.

१९९९ च्या निवडणूका पुन्हा जिंकल्या.

१९९९ च्या निवडणूका NDA ने पुन्हा जिंकल्या. अटलबिहारी कॅबिनेटमध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि शरद यादव यांना प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी दिली होती. नितीश कुमार हे रेल्वेमंत्री, कृषीमंत्री तर जॉर्ज संरक्षण मंत्री होते. या तिन्ही नेत्यांची वाजपेयी मंत्रिमंडळात महत्वाची भूमिका होती

नितीशकुमार मुख्यमंत्री झाले

सन २००० मध्ये भाजपाच्या मदतीने नितीश कुमार पहिल्यांदा ८ दिवसासाठी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पोहोचले. पण विश्वास ठरव जिंकू न शकल्यामुळे राजीनामा द्यावा लागला आणि पुन्हा केंद्रातील मंत्रीमंडळात स्थान मिळाले.

नंतर २००३ मध्ये शरद यादव यांच्या नेतृत्वातील जनता दल, जॉर्ज फर्नांडिस आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील समता पक्ष आणि लोकशक्ती पक्ष यांनी एकत्रित येत जेडीयूची स्थापना केली. आणि बघता बघता २००५ च्या निवडणूकांमध्ये सर्वात जास्त जागा जिंकत जॉर्ज यांनी नितीशना बिहारचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवले.

आता नितीशकुमारांनी दुसऱ्यांदा पलटी मारायची तयारी सुरु केली. म्हणजेच त्यांनी जॉर्ज यांची साथ सोडली.

काही ठिकाणी असे ही वाचायला मिळते की लालकृष्ण आडवानी यांनी २००५ च्या निवडणूकांमध्ये नितीशना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केले. जे की जॉर्ज यांना खटकत होते. त्यामुळेच नंतरच्या काळात नितीश आणि जॉर्ज यांच्या दरम्यान बिनसायला सुरुवात झाली. वादाचे प्रसंग उद्भवत गेले.

दोन वर्षात एक वेळ अशी आली की ज्या पक्षाला त्यांनी बनवले होते त्याच पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक ते यादव यांच्या हातून हारले. पण या मागील खरी खेळी नितीश यांचीच असल्याचे बोलले जाते. त्यांनी जॉर्जना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन दुर करण्यासाठी शरद यादव यांना मदत केली.

आणि मग त्यावेळेपासून जॉर्ज राजकारणातुन साईडलाईन झाले.

पुढे २००९ मध्ये पक्षाने जॉर्जना निवडणूकीचे तिकीट देखील दिले नाही. प्रकरण इथेच थांबले नाही. जॉर्जनी पक्ष सोडत मुजफ्फरपुरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. परंतु जेडीयुच्या उमेदवाराकडूनच पराभव स्विकारावा लागला. यानंतर ते सार्वजनिक आयुष्यातुन देखील दिसेनासे होत गेले. या पराभवानंतर परिस्थिती अशी आली की दिल्लीमध्ये राहण्याची देखील सोय नव्हती. मित्रांनी भाड्याचे घर शोधण्यास सुरुवात केली.

आता पलटी मारायची ही त्यांची तिसरी वेळ होती : परत जॉर्ज यांच्या सोबत 

मात्र याच दरम्यान नितीश यांना काय प्रचिती आली, त्यांनी जॉर्जना राज्यसभेवर पाठवले. पण त्याच दरम्यान त्यांना अल्जायमरने गाठले. आणि पुन्हा सार्वजनिक आयुष्यातुन दूर होत एकटेपणा वाट्याला आला.

परंतु एक गोष्ट मात्र खरी की राजकीय जीवनात फर्नांडिस सर्वात जास्त नितीश कुमारांसोबत राहिले आणि त्यांच्यामुळेच ते आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये एकटे पडत गेले.

चौथ्यांदा पलटी : भाजपची साथ सोडली 

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकांत महागठबंधन करण्यात आले होते. यात कायम भाजप सोबत असणाऱ्या नितीशकुमारांनी लालूंशी गटबंधन केले होते. या आघाडीला १७८ सीट्स मिळाल्या होत्या. या महागठबंधन मध्ये जनता दल यूनाइटेड (जदयू), राष्ट्रीय जनता दल (राजद), कांग्रेस, जनता दल, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, इंडियन नॅशनललोक दल और समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय) हे पक्ष सामील होते. आता त्यांनी एवढ्यावरच भागवल नाही बरं..

त्यांनी पाचव्यांदा पलटी मारत २०१७ मध्ये जेडी(यू) च्या महागठबंधन पासून वेगळं होऊन भाजपा सोबत संसार सुरु केला. तो आजअखेर सुरूय. पण आता ते सहाव्यांदा पलटी मारायच्या तयारीत आहेत. त्याबद्दल तुम्ही सुरुवातीला वाचलंच आहे.  

त्यामुळे आता विश्वासाचा साथीदार म्हणून बिहारच राजकारण त्यांच्याकडे बघत नाही हे ही तितकंच खरं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.