वांड पोरांचे नवे वस्ताद द्रविड गुरुजी! चालतंय का?

भारताच्या क्रिकेट टीमनं गेल्या दोन-तीन वर्षांत दणका उडवलाय. भले वर्ल्डकप नाय जिंकला, भले टेस्ट चॅम्पियनशिप हरले; पण ऑस्ट्रेलियाच्या नाकात दोनदा दम केला. इंग्लंडला इंडियात बोलवून हरवलंच परत इंग्लंडमध्ये जाऊन पण हरवलं.

ते स्टीव्ह वॉ, पॉन्टिंग, वॉर्न यांच्या टीमची कशी खुंखारमध्ये दहशत होती. तसलं आता भारताच्या टीमचं झालंय. कॅप्टन विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री या जोडीनं या टीममध्ये आक्रमकता ठासून भरली आणि ही वांड पोरं जगात कुणालाही भिडायला तय्यार झाली.

आता टी२० वर्ल्डकपनंतर शास्त्रीबुवा रिटायर होणार म्हणल्यावर तालमीला नवा वस्ताद पाहिजे. माहेला जयवर्धने, माईक हेसन अशा फॉरेनर नावांची चर्चा झाली, पण आघाडीवर नाव आलं ते एकच – राहुल शरद द्रविड. आता काही वर्षांपासून अंडर-१९ टीमचा कोच, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा हेड, इंडिया ए टीमचा कोच, लंकेला गेलेल्या टीमचा कोच हे सगळे रोल द्रविडनं पार पाडले. तरी सुरुवातीला हेड कोच होणार का विचारल्यावर द्रविड म्हटला, ‘नको की! मी आपला एनसीएचा हेड बरा.’

मग बातम्या आल्या की बीसीसीआयला वाटतंय द्रविडनं कोच व्हावं. सौरव गांगुलीला वाटतंय म्हणल्याव विषय संपला ओ! दादाला कोण नाय म्हणू शकतंय का? तर बाबा हो. दादाला एकच माणूस नाय म्हणू शकतो तो म्हणजे द्रविड. दादानं काहीतरी खळबळ केली आणि द्रविड तयार झाल्याची बातमी आली. आता फिक्स जाहीर झालं नसलं, तरी एनसीए हेडसाठी दुसरा माणूस बघतायत म्हणजे द्रविड मुख्य वस्ताद होत असतोय!

तर भिडू लोक द्रविडनं हेड कोच व्हावं का?

 तुम्ही म्हणाल काय प्रश्न विचारताय! येऊन येऊन येणार कोण? द्रविडसारखं आहेच कोण?

द्रविडसारखं कोण नाही याचं कारण म्हणजे त्याचं वागणं, बोलणं आणि क्रिकेटवरचं प्रेम. द्रविडला पाहत कुणी लहानाचं मोठं झालं, कुणाचे केस काळ्याचे पांढरे झाले; पण चिडलेला द्रविड फक्त दोनदा  पाहायला मिळाला, एकदा जाहिरातीत आणि एकदा राजस्थान रॉयल्स हरल्यावर.

हा भिडू पोराच्या शाळेत गेला तरी रांगेत उभा राहतो, निवांत रिक्षातून फिरतो, बकरा बनवायला आलेल्या पोरीची शाळा घेतो. रन्स, पैशे, प्रसिद्धी अशी सगळी श्रीमंती असूनही द्रविडला गर्वाचा ग पण टच करू शकलेला नाही.

आयपीएल, सोशल मीडिया यामुळे नवे प्लेअर्स कचक्यात श्रीमंत होतात, फॉलोअर्सची तर गणतीच नसते. त्यांचा रथ मग हवेत चालायला लागतो. अंडर-१९ टीमचा कोच, इंडिया ए टीमचा कोच असताना द्रविडनं सगळ्या नव्या पोरांना जमिनीवर राहायला शिकवलं. पोरांचे फॉलोअर्स वाढले, परफॉर्मन्स सुधारला पण एकही पोरगं गल्ली चुकलं नाही!

आज भारताची टीम असा धुव्वा करण्यामागं पण द्रविडची दूरदृष्टी आहे. पुढं दिलेली नावं वाचा आणि त्यांचा परफॉर्मन्स आठवा- वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, कार्तिक त्यागी, यशस्वी जैस्वाल. अशा लय नव्या पोरांना उभरत्या काळात द्रविडनं धडे दिलेत.

एनसीएचा हेड असताना त्यानं इंडिया ए टीमच्या टूर वाढवल्या. जिथं सिनिअर टीम जाणाराय तिथं आधीच ए टीम जाऊ लागली. प्रत्येक सिनिअर प्लेअरची रिप्लेसमेंट तयार ठेवली. त्यामुळंच भारताच्या भिडूंनी पदार्पणात पण राडा केला.

टीम इंडियाचा हेड कोच म्हणजे काय सोपा पेपर नसतोय. सध्याच्या घडीला तर नाहीच. प्रत्येक टीमचा एक ट्रान्झिशन फेज असतोय. अध्यक्ष बदलतो, जुने कार्यकर्ते जातात, नवे येतात त्यामुळं डेकोरेशनही नवं असतंय. आता नवं असलं तरी तगडं असावंच लागतंय.

वर्ल्डकपनंतर भारताला दोन वेगळे कॅप्टन असण्याची सवय करावी लागणार. टेस्ट आणि वनडेमध्ये विराट कोहली म्हणजे अंगार, टी२० मध्ये रोहित शर्मा म्हणजे बर्फ. अशावेळी ड्रेसिंग रूम आणि ग्राऊंडवर सुवर्णमध्य काढण्याची जबाबदारी द्रविडला घ्यावी लागणाराय. सोबतच काही वर्षांत अनेक मुख्य प्लेअर रिटायर होतील, त्यांची जागा घेणाऱ्या नव्या प्लेअर्सला प्रवाहात सामील करून घेण्याची जबाबदारी पण द्रविडच्याच खांद्यावर असेल.

शास्त्रीबुवा जवळपास सात वर्षं भारताचे कोच आहेत. त्यांची कोचिंगची पद्धत तशी निवांत आणि गट फिलींगवर भर देणारी आहे. तर द्रविड काहीसा प्रोसेसवर अवलंबून असतो. त्यामुळे खेळाडूंना हा बदल आपलासा होईपर्यंत त्यांच्या कलानं घेणं द्रविडला भाग आहे. अवघड सिचुएशन्समध्ये द्रविड आणखी बहरतो हे आपण क्रिकेटच्या मैदानावर पाहिलंय, आता डगआऊटमध्ये पाहायला मिळेल इतकंच.

आक्रमक विराट आणि संयमी द्रविडची भट्टी कशी जमणार हा प्रश्न लय लोकांना पडलाय. विराट मैदानाच्या बाहेर तास शांत असतो आणि द्रविड मॅन मॅनेजमेंटमध्ये पारंगत आहेच. त्यामुळे मैदानाबाहेर तर काय लोड येत नसतोय.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा हेड म्हणून द्रविडची उणीव नक्की भासणार. त्यानं केलेला सेटअप कायम ठेवला तर भारताची आणखी एक नेक्स्ट जनरेशन पद्धतशीर तयार होईल, हे नक्की. त्यामुळे द्रविडनं कोच व्हावं यात भारतीय क्रिकेटचं भलं आहे.

आणखी एक किस्सा सांगतो भिडू लोक, २०१८ मध्ये द्रविड कोच असताना भारताच्या अंडर-१९ टीमनं वर्ल्डकप जिंकला. बीसीसीआयनं द्रविडला ५० लाख आणि इतर सपोर्ट स्टाफला २० लाखाचं बक्षीस जाहीर केलं. द्रविड म्हटला, ‘सगळ्यांना सारखी अमाऊंट देत असाल तर ठीकाय. नाहीतर राहूद्या!’ बीसीसीआयनं द्रविडसकट सगळ्यांना प्रत्येकी २५ लाख दिले.

आता हा सज्जन माणूस भारताच्या वांड क्रिकेटर्सच्या खांद्यावर हात ठेवून कोचिंग करणार म्हणल्याव, भारताची टीम आणखी भारी होत असतीये. त्यामुळे द्रविड वस्ताद म्हणून चालतंय का? तर चालतंय की!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.