तृथीयपंथीयावर बलात्कार झाला तर देश पेटून उठेल का…?

रेल्वे स्टेशन, बस स्थानक गजबजलेली असतात गर्दीने आणि अचानक समोर येतो एक चेहरा. पुरुषी चेहरा मात्र वेशभूषा महिलेची. ते असतात तृथीयपंथी. ज्याला पाहून अनेकांची नाक मुरडली जातात आणि चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव उमटू लागतात. गटारीत लोळून आलेल्या कुत्र्याच्या जखमा पाहून माणसाच्या डोळ्यात आश्रू येतील. पण, एका तृथीयपंथीयासाठी कधी कोणी रडलेल ऐकल नाही.

पण, आम्हाला तुमच्या सहानभूतीची नाही तर एकसमान वागणुकीची अपेक्षा असल्याचे तृथीयपंथीयासाठी काम करणाऱ्या मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितले.

एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर त्यासाठी सारा देश पेटून उठतो. त्या तरुणीच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून मोर्चे निघतात. पण, इतक्या वर्षात तृथीयपंथी लोकांच्या संरक्षण आणि हक्कासाठी किती लोक रस्त्यावर आलेट यावर विचार व्हायला हवा.

२०१९ मध्ये तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाने आम्हाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. पण, आजही आम्ही सुरक्षित नाही हेच म्हणावे लागेल.

४ महिन्यापूर्वी मेघा नावाच्या एका तृथीयपंथीने कौटुंबिक कलह आणि मानसिक त्रास यामुळे आत्महत्या केली. त्या घटनेची नोंद पोलिसात झाली. आजही आम्ही जेव्हा त्या संबंधी काही विचारपूर करायला जातो तेव्हा पोलीस दाद देत नाहीत. आणि त्या संबंधित व्यक्तीच्या घरच्यांना घेऊन या, असे ऐकवतात. जेव्हा आम्ही मेघाच्या घरच्याकडे जातो तेव्हा ते ‘तो मरून गेला’ आता केस वैगेरे काही नको, असे सांगतात.

त्यावेळी आमच्यासाठी लढणारे कोणीच नाही, याची खंत वाटते, मयुरीताईंनी बोलून दाखवली.

आम्हाला आजही चेष्टेचा विषय म्हणूनच पाहिले जाते. एखाद्या मुलीची छेड काढली तर १० जण धावून येतात. पण एखाद्या तृथीयपंथीयाची छेड काढली तर कोणीच धावून येत नाही. महिला आणि मुलीसाठी निर्भया पथक आहे. शाळा कॉलेज मोठी ऑफिस या ठिकाणी समित्या आहेत. पण हे आमच्यासाठी असे काहीच नाही, अस का?

हे प्रश्न एक तृथीयपंथी म्हणून मनाला सतत कुरतडत असतात.

समाजात होणारी हिंसा आणि आमच्याकडे गांभीर्याने न बघणे या गोष्टी थांबायला हव्यात कारण त्या शिवाय आमच्यासारखे लोक समाजाच्या प्रवाहात येणार नाहीत. स्वत:सोबत समाजाचे आणि आमच्या समुहाचे नेतृत्व करणार नाहीत.

एखाद्या महिलेसोबत ४,००० लोकांसमोर लग्न करूनही एखादा पुरुष तिच्याशी प्रामाणिक राहू शकत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. मग आमच्यासोबत कोणी कसे प्रामाणिक राहील. एक तृथीयपंथी होती. तिच्यावर एका मुलाने एकतर्फी प्रेम केले. पण, तिने त्याचे प्रेम नाकारले. म्हणून तिच्यावर ॲसिड हल्ला केला गेला. ती आज जिवंत आहे हे तीच दुर्दैव. चेहऱ्यावर जखमा घेऊन ती जगतेय.

कोल्हापूरच्या हुपरीमधील एक तृथीयपंथी. तिच्यासोबत एका मुलाने प्रेमाचे संबंध ठेवेले. आणि दुसऱ्या मुलीशी विवाह केला. अशी फसवणूक झाल्यावर त्या तृथीयपंथीने आत्महत्या केली. हादरवून टाकतात या घटना.

तीन वर्ष पोसून तुम्ही निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देणार असाल तर याला काहीच अर्थ नाही. याउलट प्रियांका रेड्डी प्रकरणात जे काही तिथल्या सरकारने आणि पोलिसांनी केले ते योग्यच म्हणावे लागेल.

एखाद्या घटकाप्रती असलेली आपुलकीची भावनाच या कायद्यात आणि समाजात राहिलेली नाही. त्यामुळे एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय कायदे व्यवस्था कमी पडतेय. आणि त्यातही आमच्यासारखे दुर्लक्षित घटक या समाजात आहेत याचाही सगळ्यांना विसर पडला आहे. याची जाणीव ज्या दिवशी या समाजाला होईल, त्याच दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो असे म्हणता येईल, असेही मयुरी ताई म्हणाल्या.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.