टूथपेस्टचे आज कितीही ब्रँड आले तरी दुकानात गेल्यावर कोलगेटचं म्हणावं लागतं.

कोलगेट माहिती नसलेला माणूस शोधून सापडणार नाही. सकाळी सकाळी आपला दिनक्रम हा कोलगेटपासून सुरु होतो. आज घडीला मार्केटमध्ये टूथ पेस्टचे किती ब्रँड आले असतील पण ज्यावेळी आपण दुकानात जातो तेव्हा अमक्या अमक्या ब्रँडची टूथपेस्ट द्या असं म्हणत नाही तर आपण कोलगेट द्या म्हणतो. यावरून कोलगेटची लोकप्रियता दिसून येते.

आता कोलगेट तर आपण रोज सकाळी वापरतो म्हणजे जगातल्या १०० पैकी ७० टक्के घरांमध्ये कोलगेट असते म्हणजे असतेच पण या कोलगेटची सुरवात कशी झाली, कुणी निर्माण केली कोलगेट हे सगळं जाणून घेऊया आणि कोलगेटची यशोगाथाही बघूया.

इंग्लंडमधल्या विलियम कोलगेट यांनी कोलगेटचा शोध लावला खरा पण त्याच्याआधी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. त्यांचे वडील रॉबर्ट कोलगेट हे शेती करून घरचा उदरनिर्वाह चालवायचे. पण पुढे ते आपल्या पूर्ण परिवारासहित अमेरिकेत शिफ्ट झाले. तिथे एका व्यक्तीशी ओळख झाल्यावर त्यांनी काम सुरु केले.

हे काम होतं साबण आणि मेणबत्त्या बनवण्याचं. यात वडिलांच्या मदतीसाठी विलियम कोलगेट सुद्धा जायचे. पण दुर्दैवाने हे काम जास्त काळ टिकू शकलं नाही. आणि काही काळाने त्यांचा हा व्यवसाय बंद पडला त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली. त्यावेळी १६ वर्षाच्या विलियम कोलगेटने काम करण्याचा निर्णय घेतला.

छोटे मोठे काम करत आणि लोकांच्या ओळखीने ते न्यू यॉर्कमध्ये आले. तिथे एका साबणाच्या फॅक्ट्रीत त्यांनी काम करायला सुरवात केली. तिथे काम करत असताना त्यांनी व्यवसायाच्या बारीकसारीक गोष्टी आत्मसात केल्या. 

त्याचवेळी त्यांनी ठरवलं  होतं कि पुढे जाऊन मीही व्यवसाय करणार. त्यामुळे त्या फॅक्टरीच्या कामाचा त्यांनी अंदाज घेतला आणि लोकं कुठे चूक करतात यावर लक्ष दिलं.

दोन वर्षे त्या साबणाच्या फॅक्टरीत काम केल्यानंतर विलियम कोलगेटने ते काम सोडलं आणि स्वतःची एक फॅक्टरी सुरु केली. या फॅक्टरीतही साबण बनवू लागले आणि कंपनीला नाव दिलं विलियम कोलगेट अँड कंपनी. हा व्यवसाय त्यांचा मोठ्या जोमात चालला. यातून भरपूर फायदा त्यांना होत गेला.

पण अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे ते अंथरुणाला खिळून राहिले आणि बराच काळ त्यांना व्यवसायापासून दूर राहावं लागलं. यामुळे कंपनी घाट्यात जाऊन बरंच नुकसान झालं. पण आजारातून बरं झाल्यावर त्यांनी पुन्हा नव्याने सुरवात केली. पुढे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या तीन मुलांनी हा व्यवसाय पुढे नेला यात भर घातली ती कोलगेटची.

१८७३ साली कोलगेटने आपलं पहिलं प्रोडक्ट टूथपेस्ट बाजारात आणलं.

पण तेव्हा हे टूथपेस्ट पॅक करून येत नसे तर ते काचेच्या बाटल्यांमधून तूप जसं दिलं जात तस दिलं जायचं.पण कालानुरूप व्यवस्थित पॅकिंग करून त्याला पेस्टचं स्वरूप देण्यात आलं. १८९६ सालापासून कोलगेट टूथपेस्ट म्हणून विक्रीस सुरु झाली.

विलियम कोलगेटने साबणातून सुरु केलेली कंपनी पुढे कोलगेटही विकू लागली. पुढे परफ्युम सुद्धा त्यांनी बनवला.

आज घडीला कोलगेट हि जगातली ५९ क्रमांकाची मोठी कंपनी आहे. हजारो लोकांना कोलगेटने रोजगार दिला आहे. आजही भरपूर विक्री कोलगेट करतं. आज घडीला विको, डाबर, पतंजली अश्या मोठ्या मोठ्या ब्रॅण्डच्या कंपन्या असतानाही कोलगेटशी कुणीही बरोबरी करू शकलेलं नाही. प्रोडक्ट थेट नावानेच लोकांपर्यंत पोहचलं जाणं हे कोलगेटच्या यशाचं रहस्य म्हणावं लागेल इतकी लोकप्रियता कोलगेटने मिळवली होती.

कोलगेट हि एक मल्टिनॅशनल कंपनी असून पर्सनल केअर प्रोडक्ट तयार करून जगभरात विकते.

भारतासहित इतर ७५ देशांबरोबर कोलगेट व्यापार करते. तब्बल २०० वर्षांपासून कोलगेट घराघरात वापरली जाते. आजही कोलगेट आणी त्याच्या इतर प्रॉडक्टची आपल्या घरात खास जागा आहे. जगातला सगळ्यात जास्त विकला जाणारा ब्रँड म्हणून कोलगेट ओळखली जाते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.