मग्रूर ब्रिटिशसत्तेच्या छाताडावर पाय देऊन शिवरायांचा पुतळा उभारला होता

कोल्हापूरात अंबाबाईच दर्शन घ्यायला भवानी मंडपाच्या दिशेनं निघालो की पहिल्यांदा दर्शन होत शिवरायांच्या पुतळ्याच. या पुतळ्याच वैशिष्ट्य म्हणजे हा नेहमीप्रमाणे अश्वारूढ पुतळा नाही.

हातात तलवार घेऊन ताठ मानेने उभ्या असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्या मागे कोल्हापूरकरांच्या धगधगत्या राष्ट्रप्रेमाचा इतिहास आहे.

गोष्ट आहे 1942 सालची.

देशभरात जुुलमी इंग्रज राजवट सुरू होती. चले जाव आंदोलनाने जोर धरला होता. पश्चिम महाराष्ट्रात पत्री सरकारच्या रुपात जबरदस्त आव्हान उभं राहत होतं.

शाहूनगरी कोल्हापुरात तर प्रत्येक घराघरात क्रांतीच स्फुल्लिंग पेटलं होतं.

आज आपण शिवरायांचा पुतळा पाहतो तिथे ब्रिटिश गव्हर्नर विल्सनचा संगमरवरी पुतळा १९२९ सालापासून उभा होता. या प्रमुख चौकात टेचात उभा असलेला हा पुतळा पाहून कोल्हापूरकरांचा स्वाभिमान दुखावत होता.

काहि झालं तरी हा पुतळा हटवायचा असा चंग काही तरुणांनी बांधला पण ब्रिटिश राजवट सुरू असल्यामुळे हालचाली करण्यास बंधने येत होती.

पण यासाठी सर्वप्रथम पाऊल टाकलं महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचा वसा सांगणाऱ्या दोन रणरागिणीनी.

भगिरथीबाई तांबट आणि जयाबाई हाविरे या दोघीनी १० ऑक्टोबर १९४२ रोजी गव्हर्नर विल्सनच्या शुभ्र संगमरवरी पुतळ्यावर ऍसिड ओतले व चेहरा डांबर ओतून विद्रुप करून टाकला.

या दोघींना १६ महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली.

विशेष म्हणजे भगिरथीबाई तेव्हा गरोदर होत्या. बिंदू चौकातील कारागृहातच त्या प्रसूत झाल्या.

या घटनेनंतर विल्सनचा पुतळा झाकून ठेवण्यात आला. तिथे कायमचा एक पहारेकरी उभा करण्यात आला. पण रणरागिनींनी केलेल्या धाडसामुळे अनेकांना प्रेरणा दिली होती.

१३ सप्टेंबर १९४३ रोजी पहाटे कोल्हापुरात हाकाटी उडाली,

प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांनी विल्सनचा पुतळा फोडला.

प्रतिसरकारचे सेनापती नागनाथ अण्णा नायकवडी आणि जीडी बापू लाड तेव्हा कोल्हापुरातच होते. मात्र त्यांनी हे काम केलं नव्हतं. त्यांनी चौकशी केल्यावर कळाल की हे धाडस केल होतं,

गंगावेशीतल्या शामराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी !

त्या पहाटे चार वाजता माजी आमदार काका देसाई, शामराव पाटील हे हातात खराटा, बादली घेऊन पुतळा स्वच्छ करण्यासाठी जात असल्याचे दाखवत पुतळ्याजवळ आले.

काका देसाई हे रिव्हॉल्वर घेऊन थांबले. वडणगेचे नारायण घोरपडे आणि त्यांचा एक सहकारी पोलिस वेषात माळकर तिकटी येथे पहारा देत होते. शामराव हे झरझर शिडीवरून पुतळ्याजवळ चढले.

त्यांनी विल्सनच्या पुतळ्याच्या डोक्यावर हातोडा हाणला. त्याचे हात तोडून टाकले.

फक्त गव्हर्नर विल्सनचं नाही तर संपूर्ण ब्रिटिश सत्तेचं नाक कापलं गेलं होतं.

शामराव पाटील तिथून पळाले आणि त्यांना पकडण्यासाठी म्हणून बहुरूपी पोलीस म्हणून उभे असलेले घोरपडे व सहकारी त्यांच्या मागून धावले. काय नेमकं झालं हे कोणालाही कळले नाही. हे सगळे कार्यकर्ते गनिमी काव्याने अंतर्धान पावले.

नागनाथअण्णा नायकवडी यांनी या पराक्रमी शामराव पाटलांना प्रतिसरकार मध्ये सामील करून घेतलं. सुप्रसिद्ध धुळे खजिना लुटीमध्ये त्यांचा समावेश होता.

इकडे कोल्हापुरात झालेल्या घटनेचे पडसाद दूर इंग्लंडपर्यंत उमटले.

अपमानित झालेल्या ब्रिटिशांनी तो पुतळा तिथून हलवला. तिथे नवीन पुतळा उभरला गेला नाही.

काही वर्षांनी मात्र तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. व्ही. टी. पाटील त्याचे अध्यक्ष होते.

कोल्हापुरातील तत्कालीन राजनैतिक प्रतिनिधी कर्नल हॅरिसन यांच्याशी चर्चा करून तोंडी परवानगी मिळवली

व त्यानंतर केवळ १८ दिवसांच्या विक्रमी वेळेत हा पुतळा ओतवण्यात आला.

ज्येष्ठ शिल्पकार कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी ही जबाबदारी पार पाडली.

१३ मे १९४५ ला पुतळ्याच्या अनावरणाची तारीख जाहीर झाली; पण पुतळ्याच्या ओतकामात अचानक अडचण आली. त्या वेळच्या शुगरमिलमधील व उद्यमनगरातील तंत्रज्ञांनी ही अडचण दूर करण्यास मदत केली व अनावरणाच्या वेळेअगोदर अवघ्या काही अवधीत हा पुतळा चौथऱ्यावर चढविण्यात आला.

माधवराव बागवे, शेठ माणिकचंद चुनीलाल यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्‌घाटन झाले

या व अशा अनेक घटनांनंतर ब्रिटिशांना जाणवले की आता आपल्याला गाशा गुंडाळायची वेळ आली आहे.

आज या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. मग्रूर ब्रिटिशसत्तेच्या छाताडावर पाय देऊन शिवरायांचा पुतळा आजही ताठ मानेने उभा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.