राज्यसभेची सहावी जागा जिंकणं म्हणजे महाडिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरतेय ती म्हणजे राज्यसभा निवडणूक..त्यातली ६ वी जागा ही राजकीय घडामोडींच्या केंदस्थानी आहे. याच ६ व्या जागेवर शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उतरवलं तर भाजपने देखील कोल्हापूरच्या धनंजय महाडीकांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं राज्यसभेचा सामना आता कोल्हापूरच्या दोन पैलवानांमध्ये रंगणार आहे. 

राज्यसभेच्या या आखाड्यात कोणते पैलवान मैदान मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  

बरं ही लढत फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नसून महाडिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. 

कोल्हापुरात सद्या बंटी पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यात महाडिक गट कमजोर पडलाय. आता जर का महाडिकांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर धनंजय महाडिकांना राज्यसभेची ही निवडणूक जिंकणं खूप महत्वाचं आहे. 

त्याचं कारण स्पष्ट आहे ते म्हणजे २०१४ नंतर महाडिक गटाला उतरती कळा लागलीये..कशी ? टप्या-टप्याने बघूया…

महाडिक कुटुंब म्हणजे एकेकाळी ३ पक्ष घरात ठेवून असलेलं कुटुंब. 

२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात महाडिक कुटुंबियांच्या घरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडी असे ३ पक्ष आणि एक स्थानिक आघाडी होती. महादेवराव उर्फ आप्पा महाडिक हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार होते.  

तर त्याचवेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अप्पा महाडिकांचे पुतणे धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोल्हापूरचे खासदार झाले. तर २०१४ मधेच अप्पा महाडिक यांनी आपला मुलगा अमल महाडिक यांना भाजपकडून आमदार बनविले.  

पुढे आप्पा महाडिक यांची सून शौमिका महाडिक या भाजपकडूनच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या.

अशाप्रकारे २०१४ पर्यंत महाडिकांचे चांगले दिवस चालू होते. 

त्यानंतर महाडिकांच्या कारकिर्दीला उतरती कळा सुरु झाली आणि त्याला कारणीभूत ठरला महाडिक विरुद्ध बंटी पाटील हा संघर्ष.

कोल्हापूरचं राजकारण नेहमी बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक असंच एकमेकांच्या कुरघोडीचं राहिलं.  

२०१४ ला मोदी लाट आली अन राजकीय समीकरण बदलू लागली. मोदी लाट असतानाच राष्ट्रवादीने कोल्हापूरातून मुन्ना महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली. अशा वेळी बंटी पाटलांनी सर्वांना आश्चर्यात टाकणारा निर्णय घेतला, तो म्हणजे मुन्ना महाडिकांना लोकसभेसाठी मदत करण्याचा.

मुन्ना महाडिकांना खासदार बनवायला मदत करायची म्हणजे ते नंतर आपल्याला आमदारकीला मदत करतील असं ते नियोजन होतं. 

असा निर्णय घेणं हा बंटी पाटलांसाठी आत्मघातकी निर्णय ठरू शकतो असं म्हणलं जात होतं. पण तरीही बंटी पाटलांनी तयारी केली. त्यांनी महाडिकांना पाठिंबा जाहिर केला आणि कोल्हापूरातून मुन्ना महाडिक खासदार झाले. 

त्यांनतर लगेच ६ महिन्यात २०१४ च्या विधानसभेच्या निवडणूका लागल्या. आत्ता विधानसभेच्या निवडणुकांसाठी महाडिक बंटी पाटलांना आमदार म्हणून निवडून यायला मदत करणार होते, हे जगजाहिर होतं. 

पण राजकारणाला असं काही वळण मिळालं अन महाडिक गटाने बंटी पाटलांना पाठिंबा न देता अमल महाडिकांना भाजपकडून मैदानात उतरवले आणि बंटी पाटलांचा पराभव केला.

इथेच बंटी पाटील चिडले अन यानंतर बंटी पाटील विरुद्ध महाडिक असं राजकारण सुरु झालं.. 

जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद. जोडीला दोन आमदारकी आणि एक खासदारकी घेवून महाडिक घराणे कोल्हापूरच्या राजकारणात प्रस्थापित झालं अन बंटी पाटील संपले अशा चर्चा कोल्हापूरात सुरू झाल्या होत्या… 

अशातच २०१५ ची विधानपरिषदेची निवडणुक लागली. अप्पा महाडिक विरुद्ध बंटी पाटील अशी थेट लढत होती.

अप्पा महाडिक म्हणजे महाडिक घराण्याचा कणा. ते विधानपरिषदेवर सलग १८ वर्ष आमदार होते. विधानपरिषदेवर निर्विवादपणे निवडून येण्यात त्यांची ख्याती होती.  २०१५ च्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अप्पा महाडिक विरुद्ध बंटी पाटील अशा लढतीत बंटी पाटलांचा विजय झाला. १८ वर्ष निर्विवाद निवडून येणारे अप्पा महाडिक बंटी पाटलांच्या समोर हरले. 

या वेळी महाडिक घराण्यातून एक आमदारकी गेली होती. घरात एक खासदारकी आणि एक आमदारकी शिल्लक राहिली होती. 

त्यात २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूका लागल्या.  बंटी पाटलांनी नारा दिला,“आमचं ठरलंय” असं म्हणत महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग राज्यात कोल्हापूरात करण्यात आला. बंटी पाटलांनी उघडपणे सेनेच्या संजय मंडलिक यांचा प्रचार केला आणि राष्ट्रवादीच्या मुन्ना महाडिक यांचा पराभव झाला. मुन्ना महाडिक हरले अन महाडिकांच्या हातातली खासदारकी पण गेली. 

२०१९ च्या ऑगस्ट मध्ये माजी खासदार असलेले धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये गेले.

त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बंटी पाटलांनी अमल महाडिक यांचा पराभव करत आपले पुतणे ऋतुराज पाटलांना निवडून आणलं आणि महाडिकांच्या ताब्यात असलेली आणखी एक आमदारकी गेली.  त्या पाठोपाठ महाडिकांच्या हातातून जिल्हा परिषदही गेली.

२०२१ च्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील बंटी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. कधीकाळी अप्पा महाडिक इथून बिनविरोध निवडून आलेले तिथे बंटी पाटील निवडून आले होते..

आमदारकी गेली, जिल्हा परिषद गेली पण तरीही आप्पा महाडिक शांत होते कारण गोकुळ हा आप्पांचा किल्ला होता.. 

गेली ३० वर्षे एक हाती सत्ता ठेवणारे महाडिक या संस्थेवर कब्जा करून होते. ज्याच्या हाती गोकुळ त्याच्या हाती जिल्ह्याची सत्ता असते आणि तोच जिल्ह्यातील राजकारणात किंगमेकर असतो. कोल्हापुरात असं म्हंटल जायचं की, जोपर्यंत गोकुळ आहे तो पर्यंत आप्पा महाडीकांच्या सावलीलाही धक्का लागणार नाही.. पण बंटी पाटलांनी गोकुळही सोडलं नाही.  

‘आमचं ठरलंय आता गोकुळ उरलंय’ असं म्हणत बंटी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोकुळकडे कूच केली.

हा घाव आप्पांना वर्मी बसला अन गोकुळही महाडिकांच्या ताब्यातून गेलं…

त्यानंतर २०२२ च्या एप्रिलमध्ये कोल्हापूर उत्तरची निवडणूक लागली. महाडिकांचे भाचे सत्यजीत कदम आणि काँग्रेसच्या जयश्री जाधव  अशी ही लढत होती. सत्यजित कदम यांना निवडून आणण्याचा महाडिक गटाने पुरेपूर प्रयत्न केला मात्र बंटी पाटीलच सरस ठरले अन जयश्री जाधव निवडून आल्या आणि हि देखील संधी महाडिकांच्या हातून गेली.

थोडक्यात २०१९ पासून कोल्हापूरात एकूण ९ निवडणूका झाल्या. त्यातील कोल्हापूर लोकसभेची एक, विधानसभेच्या ४, विधानपरिषदेची शिक्षक मतदारसंघाची १, कोल्हापूर विधानपरिषेदेची बिनविरोध एक, गोकुळची आणि कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक अशा एकूण ९ निवडणूका बंटी पाटलांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या आणि त्या सर्व जागा बंटी पाटलांनी जिंकल्या. मात्र महाडिकांच्या हाती काहीच लागलं नाही. 

त्यामुळे महाडिक गट कमजोर कमजोर होत गेला..

आत्ता राज्यसभेच्या निवडणुकीचं बोलू…धनंजय महाडिक यांना भाजपने ६ व्या जागेसाठी उमेदवारी घोषित केली. ६ व्या जागेची भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची लढत आहे मात्र या लढतीच्याही पुढे जाऊन खरी लढत ही महाडिकांच्या अस्तित्वाची आहे. कोल्हापुरात कधीकाळी स्ट्रॉंग असलेल्या महाडिकांना आपलं अस्तित्व राखून ठेवायचं असेल आणि  स्वतःचे कार्यकर्ते देखील टिकवून ठेवायचे असतील तर सत्ता महत्वाची आहे..

लोकसभा-विधानसभा -विधानपरिषद आणि गोकुळ सुद्धा हातातून गेलेल्या महाडिक गटाला स्वतःची ताकद पुन्हा मिळवायची असेल तर हातात पद आवश्यक आहे.   

त्यात येत्या काळात कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच २०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक येतायेत.. 

या निवडणूका जर महाडिकांच्या रूपाने भाजपला जिंकायची असेल तर आणि कोल्हापूरात जर भाजपला टिकून राहायचं असेल तर पक्षाने महाडिक गटाला ताकद देणं गरजेच झालेलं आहे. या सगळ्या मध्ये खरी परीक्षा महाडिकांची आहे राज्यसभेच्या ६ व्या जागेची निवडणूक हि त्यांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आता ते खासदार म्हणून निवडून येतील का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.