पोरांना चुना लावून, आर्यनसोबत सेल्फी काढून गायब झालेला जेम्स बॉन्ड अजून सापडलेला नाही

ऐन गांधी जयंतीच्या दिवशी शाहरुख खानच्या पोराला ड्रग्स प्रकरणात अटक झाली आणि सगळ्या देशाला चर्चेचा नवा विषय मिळाला. तसं सेलिब्रेटींना किंवा त्यांच्या पोरांना अटक होण्याची ही काय पहिली वेळ नाही. यावेळी मात्र किस्सा वेगळ्याच पद्धतीनं रंगला. आर्यन खाननं ड्रग्स घेतले किंवा नाही घेतले हे नक्की व्हायचं बाजूला राहिलं आणि सेल्फीतला माणूस कोण याचीच चर्चा शिगेला पोहोचली.

विषय असा झाला की, आर्यन खानला क्रूझवर पकडल्यानंतर त्याचा एक सेल्फी व्हायरल झाला. हा सेल्फी घेणारा माणूस एनसीबीचा अधिकारी असल्याचा बऱ्यापैकी लोकांचा समज होता. आर्यनच्या अटकेचा वाद पार नेतेमंडळींपर्यंत गेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी हा सेल्फीतला माणूस किरण गोसावी असून तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे असा गौफ्यस्फोट केला. पुणे पोलिसांनी गोसावीचा शोध घेण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी केलीये. थोडक्यात हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह साहेब फरार आहेत.

आता हा किरण गोसावी खरंच जेम्स बॉन्ड आहे का?
त्याच्या डिटेक्टिव्ह असण्याचा एकही संबंध आम्हाला सापडला नाही. जे आम्हाला सापडलं ते लई वेगळं आहे. गोसावीच्या विरोधात २०१८ मध्ये पुण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्यानं कसबा पेठेतल्या एका पोराला थेट ३ लाख ९ हजाराला चुना लावला होता. मूळचा मुंबईच्या असणाऱ्या गोसावीची KPG Dreamz Solutions नावाची कंपनी होती. ही कंपनी फेसबुकद्वारे पोरांना परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवायची. परदेशी नोकरी करण्याची स्वप्नं पाहणारी मध्यमवर्गीय पोरं याला बळी पडली. त्यानं पुण्यातल्या एका पोराला मलेशियात हॉटेलमध्ये नोकरी लावतो असं सांगून ३ लाख घेतले. मलेशियाला जायला हे पोरगं मुंबईला पोहोचलं तेव्हा एअरपोर्टवर त्याला कुणीच भेटलं नाही. तरी गडी मलेशियात पोहोचला. मलेशिया जागेवर होतं, हॉटेल जागेवर होतं, जागेवर नव्हता तो भावाचा जॉब.

आपल्याला चुना लागलाय हे भावाच्या लक्षात आलं आणि तो पुण्यात परतला. इथं आल्यावर त्यानं फरासखाना चौकीत रीतसर तक्रार दाखल केली. गोसावीचा शोध घेत भाऊ मुंबईत पोहोचला. तिथं गोसावीनं फसवलेली आणखी काही पोरं त्याला भेटली. सगळ्यांकडून पैसे घेऊन गोसावीनं कल्टी मारली होती. पोलिसांनी शोध घेतला, पण तो काय हाती लागला नाही.

त्यानंतर, गोसावी पिक्चरमध्ये आला थेट आर्यन खान प्रकरणात. आर्यनला अटक झाली तेव्हा गोसावी क्रूझवर उपस्थित होता. साहजिकच एनसीबीनं त्याला या प्रकरणात साक्षीदार घोषित केलंय. हे अटक प्रकरण आधीच लांबलेलं असताना साक्षीदाराचाच तपास सुरु आहे म्हणल्यावर, या प्रकरणात अब्बास-मस्तानच्या पिक्चरसारखे आणखी ट्विस्ट येणार हे नक्की.

फसवणूक प्रकरणात गोसावीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानं मुंबईतल्या काही पोरांनाही गंडा घातलाय, मात्र त्याबाबत अजूनतरी गुन्हे दाखल झालेले नाहीत. हे सगळं उजेडात आल्यानंतर, गोसावीनं फसवलेले आणखी काही कार्यकर्ते पुढे आले तर आजिबात आश्चर्य वाटायचं नाही. आता आधी आर्यन खान प्रकरणाचा निकाल लागतो की किरण गोसावी ताब्यात येतोय? हे पाहावं लागेल.

हे वाचून फक्त एवढं लक्षात ठेवा की, उगा फेसबुकवर जाहिराती बघून पैशे द्यायचे नाहीत आणि सेल्फी काढण्याआधी माणूस नक्की कोणाय हे तपासायचं. नायतर ना जीवाची मलेशिया होईल, ना सेल्फी व्हायरल झाल्यावर सुखानं जगता येईल!

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.